Money चे अंतरंग

Financial Literacy Initiative by SWS


एका बँकरचे अनुभव खाते : भाग १६: बँकिंग संस्कार

–

नवा ऑफिसर रुजू झाला आहे. जयराम कुमार. वय साधारण सत्तावीस अठ्ठावीस वर्ष. बिहारी आहे. किंचित लाजरा, थोडा बावचळलेला, खेड्यातून आल्यामुळे शहरात बिचकून वागतो. बारीक आवाजात अगदी मोजकं बोलतो. काही अडचण आली कि हळूच येऊन किरट्या सानुनासिक आवाजात आधी हाक मारतो “मॅsssम”. मग माझ्यातला अव्वल शिक्षक जागा होतो. समस्या पाचव्या टप्प्यावरची असली तरीही मी पहिल्या टप्प्यावरून सुरु करते. मुली लहान असताना त्यांचा गृहपाठ करून घेताना प्रत्येक विषयाचे बेसिक पक्कं करून घ्यायचे अगदी तसं वाटतं मला.

म्हणजे अगदी Debit what comes in, credit what goes out किंवा debit the receiver/ credit the giver इथपासून सुरुवात असते. सिस्टमनी तयार केलेले नंबर रीड कसे करायचे, वाचताना सुद्धा हा नंबर सलग न वाचता त्याचे भाग कसे करायचे, वीस – पंचवीस आकडी रेफ़रन्स नंबर कसे बनतात, एखादी एंट्री रिव्हर्स करताना काय काळजी घ्यायची वगैरे सांगणं चालू असतं.

मधेच माझं पालुपद अर्थातच असतं “जो भी कर रहे हो, समझके करो। कोई कह रहा है इसलिए वैसे के वैसे मत करो ।” किंवा, समजलं नसेल तर परत विचार वगैरे. कधी मधी आमचा आवडता डायलॉग येतो.. ‘तुझी उमर सुद्धा नाहीये एवढी आमची नोकरी झालीये’.. वगैरे. आणि आम्ही सगळे पन्नाशी पार त्यावर हसतो सुद्धा.

रुटीन पेक्षा काही वेगळे काम काढलं तर मी त्याला (किंवा खरंतर सगळ्याच नव्याने जॉईन झालेल्या ऑफिसर्स किंवा कॅशिअर मंडळींना सुद्धा) हाक मारते “जयराम…बीना ..बनजीत, मै अमुक तमुक कर रही हुं, देखना है तो आ जाओ ।”


तर त्या दिवशी सुद्धा जयरामला विचारलं “हे अमुक कसं करतात माहिताय का? कधी करताना बघितलंय का?
त्याने नकारार्थी मान हलवली.
“नही? फिर चेअर खींच लो ।”
आणि तोही चेअर खेचत टुपुक्कन शेजारी येऊन बसला.
मग पुन्हा बेसिक पासून त्याला सगळं सांगितलं. कोणतेही ट्रान्झॅक्शन त्या वेळेपुरतं मारून न्यायचं नाही, तर त्याचे पुढे कुठे कुठे काय काय परिणाम होऊ शकतात याचाही विचार करायचा. आपण बँकेत आहोत, आकड्यांशी खेळ असतो, एक शून्य जरी जास्त झाले किंवा इथलं तिथे गेलं तर गंभीर परिणाम होऊ शकतात वगैरे बडबड एकीकडे चालू असतेच. तर ते ट्रान्झॅक्शन किंवा प्रोसिजर तो लक्षपूर्वक बघत होता. स्टेप बाय स्टेप जाताना मी मधेच त्याला विचारलं,
“आसान है ना?” पुन्हा सानुनासिक आवाज तो पटकन म्हणाला “आप बताती है, सिखाती है तो आसान हो जाता है ।” फार छान वाटलं त्याचं हे उत्तर.

दुसरी सखी माझ्या कानाला लागली “शिकून घेण्याची बात आली कि त्याला तुझ्याकडून शिकून घ्यायला फार आवडतं ..असं तो कोणालातरी सांगत होता”. चला म्हणजे लेकींचं शिक्षण झालं, नात हाताशी यायला अजून वेळ आहे, तोवर या अशा विद्यार्थ्यांवर हौस भागवून घ्यावी.

हा किस्सा जुना झाला. जयराम बदलून दुसऱ्या झोनला गेला. आता पुन्हा दोन नवीन मुलं आलीयेत, बाकी कहाणी तीच आहे. खूप जास्त सेन्सिटिव्ह डिपार्टमेंट्स कशी हाताळायची, लोन देताना किंवा नवीन अकाऊंट उघडताना काय काय बारकाईने बघायचं, लॉकर अकौंट ऊघडताना कायकाय “सावधानी बरतें” वगैरे मनापासून सांगत राहते. आता बऱ्याचशा गोष्टी सिस्टममध्ये रेडिमेड फीड केलेल्या मिळतात, आम्ही सगळं मॅन्युअली कसं करायचो, म्हणजे इ एम आय सुद्धा वर्ष किती लोन किती आणि व्याजदर किती हे सगळं कागदावर मांडून कॅल्क्युलेट करणं, दिवसांचे महिन्याचे व्याज प्रत्यक्ष त्रैराशिक मांडून करणं हे सगळं काम आम्ही हाताने करायचो हे कौतुक सांगणं एकीकडे चालू असतं.

मास्तरीण बाईंना नवनवे विद्यार्थी मिळतच राहतात. संस्कारांचा वारसा आधीच्या पिढीकडून नव्या पिढीकडे हस्तांतरित होतो म्हणतात तसा हा बँकिंग मधल्या व्यावहारिक ज्ञानाचा वारसा सुद्धा योग्य पद्धतीने पुढच्या पिढ्यांपर्यंत पोहो चावा हीच तळमळ असते. जसं युट्युब च्या रेसिपी बघून कोणी शेफ होईलही पण आई आजीने दिलेल्या छोट्या छोट्या टिप्स मुळे त्याच पदार्थाला एक वेगळीच लज्जत खुमारी मिळते, तसं बँकिंग सुद्धा कितीही डिजिटल किंवा ऑटोमेटेड झालं तरीही या अशा सांगण्यात शिकवण्यात वेगळी गोडी असते … देणाऱ्या साठी आणि घेणाऱ्या साठी सुद्धा.

स्मिता गानू जोगळेकर.
9892551950
smita_dj@hotmail.com


Discover more from Money चे अंतरंग

Subscribe to get the latest posts sent to your email.



Subscribe Here

About Us

Welcome to SWS Fintech Services Pvt. Ltd. – Your Trusted Partner in Financial Well-being!

Established in 1995, SWS has been committed to empowering individuals, families, and businesses through sound investment services. With over three decades of experience, our team of qualified financial professionals brings together expertise in investment services.

At SWS, we believe that financial success is built on informed decisions, disciplined investing, and long-term relationships. Our goal is to simplify financial complexities, enhance financial literacy, and help our clients confidently pursue their financial aspirations.

Through this blog, we share insights, practical tips, and perspectives to help you make informed financial decisions.

Explore more about us at: https://www.swsfspl.com/

SWS Fintech Services Pvt Ltd
AMFI Registered Mutual Fund Distributor- ARN- 90746
ARN Renewal Date- 25th July 2028
APMI Registered Distributor- APRN01157
APRN Renewal Date- 11th Jan 2029

Discover more from Money चे अंतरंग

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading