Money चे अंतरंग

Financial Literacy Initiative by SWS


आर्थिक सल्लागाराचे महत्त्व !

आर्थिक निर्णय घेताना आपण स्वतःला अत्यंत तर्कशुद्ध, अभ्यासू आणि विचारपूर्वक वागणारे समजतो. परंतु वास्तव थोडे वेगळे आहे. “वर्तनात्मक अर्थशास्त्र” (Behavioral Finance) आपल्याला सांगते की, माणूस हा पूर्णपणे तर्कशुद्ध वागतोच असे नाही. तो भावनिक असतो. त्याचे निर्णय अनेकदा भीती, लोभ, अति-आत्मविश्वास, टाळाटाळ, किंवा “मला काही होणार नाही” अशा मानसिकतेवर आधारित असतात.

माणूस भावनेच्या आधारे निर्णय घेतो. परंतु वित्तीय संस्था व्यवहार करताना केवळ कागदपत्रे, नियम आणि प्रक्रिया पाहतात. तेथे व्यावहारिक आणि कायदेशीर बाजू पूर्ण तपासल्याशिवाय एक रुपयाही कोणालाही देणे शक्य नसते. इथेच भावना आणि व्यवहार यातील मूलभूत फरक स्पष्ट होतो.

आता आम्ही घेतलेला एक अनुभव पाहुयात.

आमचे एक अत्यंत बुद्धिमान, तंत्रज्ञानात पारंगत असे ग्राहक होते. त्यांनी आपली म्युच्युअल फंडातील बहुतेक गुंतवणूक ऑनलाइन, डायरेक्ट पद्धतीने केली होती. म्युच्युअल फंड, शेअर्स आणि इतर सर्व गुंतवणूकही – सर्व काही स्वतःच्या अभ्यासावर आधारित. ते आमच्याकडे (SWS) फक्त वाहन विमा, आरोग्य विमा आणि जीवन विमा एवढ्यापुरतेच व्यवहार करत असत. त्यांना वाटत होते की गुंतवणुकीसाठी सल्लागाराची आवश्यकता नाही. माहिती सहज उपलब्ध आहे, प्लॅटफॉर्म सोपे आहेत आणि त्याबाबत निर्णय घेण्यास आपण स्वतः सक्षम आहोत.

गुंतवणूक करताना त्यांनी फंड निवडले, परतावा पाहिला, जोखीमही समजून घेतली. पण एक छोटासा, तरी अत्यंत महत्त्वाचा भाग – नामनिर्देशन (Nomination) – काही ठिकाणी पूर्ण केला गेला नाही. “नंतर करू”, “आत्ता वेळ नाही”, “काही विशेष नाही” – ही टाळाटाळ म्हणजेच “Procrastination Bias” / चालढकल करण्याची मानसिकता.

दुर्दैवाने, त्यांचा अचानक हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला.

कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. अशा वेळी कुटुंबीय भावनिक अवस्थेत असतात. त्यांना वाटते – “वारसा हक्काने हे आमचेच तर पैसे आहेत, मग अडचण कशाची येणार?” पण इथेच भावना आणि व्यवहार यातील फरक ठळकपणे समोर येतो.

AMC ला किंवा म्युच्युअल फंड हाऊसला हे पैसे देण्यासाठी नियम पाळावे लागतात. नामनिर्देशन नसेल, तर ते थेट रक्कम देऊ शकत नाहीत. त्यांना कायदेशीर वारस कोण आहे, हे सिद्ध करणारी कागदपत्रे लागतात. त्यासाठी वारस प्रमाणपत्र, उत्तराधिकार प्रमाणपत्र, प्रतिज्ञापत्रे, कोर्ट प्रक्रिया, बँक पडताळणी – अशा अनेक औपचारिकता पूर्ण कराव्या लागतात. ही प्रक्रिया काही आठवड्यांची नसते. काही प्रकरणांमध्ये एक ते दोन वर्षे लागू शकतात. त्यात वेळ, खर्च आणि मानसिक ताण उद्भवतो तो तर वेगळाच.

जर या ग्राहकाने सर्व गुंतवणुकींमध्ये नामनिर्देशन व्यवस्थित केले असते, तर ही प्रक्रिया काही दिवसांत किंवा आठवड्यांत पूर्ण झाली असती. एका छोट्याशा दुर्लक्षित बाबीमुळे सर्वच कुटुंबाला मोठा त्रास सहन करावा लागला.

इथेच सल्लागाराचे खरे महत्त्व अधोरेखित होते.

ऑनलाइन प्लॅटफॉर्म किंवा वेब पोर्ट्लस/ मोबाईल अँप्स व्यवहार पूर्ण करतात. पण सल्लागार नियोजन पूर्ण करतो. प्लॅटफॉर्म तुम्हाला “गुंतवणूक” करून देतो. पण सल्लागार तुम्हाला “सुरचित आर्थिक आराखडा उभा करायला मदत करतो.

गुंतवणूक माध्यम देतांना,सल्लागार फक्त परतावा पाहत नाही. कुठे काही चूक राहू नये, सर्व प्रक्रिया अचूक व्हावी यासाठी तो तुम्हाला अनेक प्रश्न विचारतो. उदा. – ‘नामनिर्देशन केलेले आहे का?’, ‘कुटुंबाला सर्व गुंतवणुकींची माहिती आहे का?’, ‘इच्छापत्र केलेले आहे का?’, ‘अचानक काही घडल्यास आपत्कालीन निधी ठेवलेला आहे का ?’ इ.

आर्थिक सल्लागार ग्राहकाच्या सर्वोत्तम हितासाठी (Best Interest) काम करतो. अनेक वेळा ग्राहकांना असे वाटते की हा अतिरिक्त खर्च आहे किंवा वेळकाढू प्रक्रिया आहे. पण प्रत्यक्षात हे सर्व भविष्यातील अडचणींपासून दोन हात लांब राहण्यासाठी गरजेचे असते.

माणूस भावनिक असतो – त्याला वाटत असते की माझ्या माहितीप्रमाणे सर्व काही सुरळीत चालू राहील. परंतु वित्तीय संस्था व्यावहारिक असतात. त्यांना नियम आणि कायदे पाळावेच लागतात. या दोन जगांमध्ये दुवा साधणारा व्यक्ती म्हणजे आर्थिक सल्लागार.

या घटनेत SWS टीमने , त्या कुटुंबाला सर्व प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी मदत केली आणि त्यांचे पैसे त्यांना परत मिळवून दिले. पण जे काम, काही मिनिटांत होऊ शकले असते, ते दीर्घ, गुंतागुंतीच्या प्रक्रियेतूनच पार पडले.

हा लेख वाचणाऱ्या सर्व वाचकांना एक मनापासून आवाहन आहे — तुमची संपूर्ण गुंतवणूक सल्लागाराकडे असेल, किंवा विशेषतः काही गुंतवणूक सल्लागाराकडे आणि काही ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर असेल, तर सर्व गुंतवणुकींना नामनिर्देशन (Nomination) केले आहे का हे आजच, आत्ताच हा लेख वाचून झाल्यानंतर तपासून घ्या.

आर्थिक शहाणपण म्हणजे केवळ जास्त परतावा नव्हे; तर योग्य नियोजन, कायदेशीर स्पष्टता आणि कुटुंबाची सुरक्षितता — हेही तितकेच महत्त्वाचे आहे.


टीम SWS

संपर्क : श्री. विक्रांत राठोड
75078 84477


Discover more from Money चे अंतरंग

Subscribe to get the latest posts sent to your email.



Subscribe Here

About Us

Welcome to SWS Financial Solutions Pvt Ltd, a leading financial advisory firm established in 1995, with a commitment to providing our clients with sound financial advice and personalized financial solutions. Our team of Certified Financial Planners (CFPs), Registered Investment Advisors (RIAs), Chartered Financial Analysts (CFAs), and Chartered Accountants (CAs) are dedicated to providing comprehensive financial planning and wealth management services to individuals, families, and businesses. Read more @ https://www.swsfspl.com/