–
दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या ‘सैराट’ या चित्रपटाने मराठी चित्रपटसृष्टीत इतिहास रचला. ग्रामीण जीवनाचे कच्चे वास्तव, भेदक कथानक आणि उत्स्फूर्त अभिनय यांमुळे हा चित्रपट केवळ बॉक्स ऑफिसवर नाही, तर करोडो मनांमध्येही रुजला. या चित्रपटाने अनेक कलाकारांना अचानक मोठ्या प्रसिद्धीच्या झोतात आणले — त्यापैकी एक होते ‘बाळ्या’ या भूमिकेने घराघरात पोहोचलेले अभिनेते तानाजी गळगुंडे.
मात्र प्रसिद्धीच्या या लाटेवर स्वार होताना आलेल्या पैशाचे व्यवस्थापन करणे तितके सोपे नव्हते. त्यांनी अनुभवलेल्या आर्थिक चुका आणि त्यातून शिकलेले धडे — हे केवळ एका कलाकाराची कहाणी नाही, तर प्रत्येक कमावत्या माणसासाठी एक उदाहरण आहे.
पैसा आणि भावनिक निर्णय
लोकसत्ता, महाराष्ट्र टाइम्स आणि लोकमत यांसारख्या प्रमुख माध्यमांना दिलेल्या मुलाखतींमध्ये तानाजी यांनी मनमोकळेपणाने सांगितले — सैराटनंतर पैसे यायला लागले, आयुष्य बदलले. पण त्याचवेळी काही जवळच्या मित्रांनी व्यवसाय आणि गुंतवणुकीच्या नावाखाली मदत मागितली. “आपलेच लोक आहेत” या भावनेतून, कोणताही लेखी करार न करता त्यांनी पैसे दिले.
पुढे काय झाले? हेच मित्र संपर्क टाळू लागले. फोन उचलेनासे झाले. काहींनी थेट ब्लॉकच केले. परिणाम — आर्थिक नुकसान, मानसिक धक्का आणि विश्वासाचा भंग.
ही घटना Behavioral Finance च्या दृष्टीकोनातून समजावून घेऊयात.
पारंपरिक अर्थशास्त्र सांगते की माणूस नेहमी तर्कशुद्ध निर्णय घेतो. पण वास्तव वेगळे आहे. व्यवहारात्मक अर्थशास्त्र (Behavioral Finance) हे सांगते की आपले आर्थिक निर्णय बहुतेक वेळा भावना, विश्वास, सामाजिक दबाव आणि क्षणिक आनंद यांनी प्रभावित होतात.
या कहाणीतून दोन मुद्दे प्रकर्षाने पुढे येतात.
१. Overconfidence Bias (अति आत्मविश्वास):
एकदा पैसा यायला लागला की तो कायम तसाच येत राहील, असा भ्रम निर्माण होणे. कलाकारांचे उत्पन्न मात्र प्रकल्पाधारित आणि अनिश्चित असते. आज मोठी रक्कम येते, पण उद्या काम नसेल तर उत्पन्न थांबते.
२. Emotional Bias (भावनिक पूर्वग्रह):
जवळच्या माणसांवर आंधळा विश्वास ठेवणे आणि भावनिक दबावाखाली पैशाचे निर्णय घेणे — या प्रवृत्तीमुळे अनेक जण मोठ्या अडचणीत सापडतात. नाते महत्त्वाचे असले, तरी व्यवहारात स्पष्टता त्याहूनही महत्त्वाची असते.
लेखी व्यवहार : भारतीय समाजाचा न सुटलेला प्रश्न आहे का ?
भारतीय संस्कृतीत मित्र आणि नातेवाईकांमध्ये पैशाचे व्यवहार करताना करार लिहिण्याची प्रथा फारशी रुजलेली नाही. “अरे, त्याच्यासाठी कागद कशाला?” — हा विचार अनेकदा महागात पडतो. पैशाचा व्यवहार लेखी असणे म्हणजे अविश्वास नाही — ती परिपक्वता आहे. लेखी करार नाते कमकुवत करत नाही, उलट भविष्यातील गैरसमज आणि दुरावा टाळतो.
उत्पन्नाचे विविधीकरण (Diversification) : सुज्ञ मार्ग
या अनुभवानंतर खचून न जाता तानाजी यांनी स्वतःला सावरले. त्यांनी शेतीकडे वळण्याचा विचार केला, डिजिटल माध्यमांतून ते चाहत्यांशी जोडलेले राहिले आणि पर्यायी उत्पन्नाचे स्रोत निर्माण करण्याचा प्रयत्न केला.
हेच Diversification — म्हणजे उत्पन्नाचे विविधीकरण —यशदायी आर्थिक प्रवासाचे महत्वाचे ठरतात. एकाच उत्पन्न स्रोतावर/ गुंतणवूक माध्यमावर अवलंबून न राहणे हे केव्हाही श्रेयस्कर !
निष्कर्ष
ही गोष्ट प्रत्येक कमावत्या व्यक्तीसाठी पाच मूलभूत तत्त्वे सांगते.
१. आपत्कालीन निधी तयार ठेवा : किमान दोन ते तीन वर्षांचा खर्च भागेल इतकी रक्कम सहज उपलब्ध स्वरूपात असावी.
२. प्रत्येक आर्थिक व्यवहार लेखी असावा: मित्र असो वा नातेवाईक — पैशाची देवाण-घेवाण नेहमी कागदावर नोंदवा.
३. भावनिक दबावाखाली आर्थिक निर्णय घेऊ नका: “नाही” म्हणणे शिका. दीर्घकालीन स्थैर्यापुढे तात्पुरती मानसिक अस्वस्थता स्वस्तात पडते असे म्हणायला हवे.
४. तज्ज्ञ आर्थिक सल्लागाराची मदत घ्या: तुमच्या आर्थिक प्रवासात गुंतवणूक, कर नियोजन आणि विमा यांसाठी पात्र सल्लागाराशी बोला — स्वतःच्या अंदाजांवर नव्हे तर अनुभवामुळे अर्जित माहितीवर निर्णय घ्या.
‘सैराट’ने अनेकांना स्वप्ने दिली. पण स्वप्नांसोबत वास्तवाचे भानही असणे आवश्यक आहे. पैसा कमावणे हे पहिले पाऊल आहे. तो टिकवणे आणि वाढवणे — हे खरे आव्हान आहे. तानाजी गळगुंडे यांचा अनुभव सांगतो की भावनांवर आधारित असणारे आर्थिक निर्णय आयुष्यभराची किंमत मोजायला लावू शकतात. व्यवहारातील शहाणपण आत्मसात केले, तर अल्पकालीन प्रसिद्धीचे रूपांतर दीर्घकालीन सुरक्षिततेत होऊ शकते.
–टीम SWS
संपर्क : श्री. विक्रांत राठोड
75078 84477

स्रोत: लोकसत्ता, महाराष्ट्र टाइम्स, लोकमत
