–
आजच्या डिजिटल युगात कर्ज घेणे पूर्वीपेक्षा खूप सोपे झाले आहे. मोबाईलवर काही क्लिकमध्ये ‘इन्स्टंट लोन’ मिळते, कागदपत्रांची फारशी गरज नसते आणि पैसे लगेच खात्यात जमा होतात. पण या सोयीमागे एक मोठा धोका लपलेला आहे — फसवे डिजिटल लोन अॅप्स.
आजकाल स्मार्टफोन असलेल्या प्रत्येकाच्या मोबाईलवर कधीतरी असा मेसेज येतो : “तुम्हाला रु. ५०,००० चे Pre-Approved Loan मिळालंय! आत्ताच घ्या!” तेव्हा जर तुमची आर्थिक गरज असेल तर अशा वेळी हा मेसेज खूपच आकर्षक वाटतो. पण हा मेसेज म्हणजे मदतीचा हात नसून बहुतेकदा सायबर गुन्हेगारांनी रचलेला एक सापळा असतो, फसव्या डिजिटल लोन अॅप्सचा सापळा.

अनेक लोक या अॅप्सच्या जाळ्यात अडकून आर्थिकच नव्हे तर मानसिक त्रासही सोसत आहेत. आमच्या पाहण्यातील एक घटना तर आत्महत्येच्या प्रयत्नांपर्यन्त देखील गेलेली आहे. म्हणूनच या ब्लॉगमध्ये आपण या फसवणुकीपासून कसे सुरक्षित राहायचे हे समजून घेऊयात.
हे ॲप्स नक्की कसे काम करतात?
सुरुवात अगदी सोपी असते. ॲप डाउनलोड करा, काही माहिती द्या, आणि मिनिटांत पैसे खात्यात जमाही होतात. पण बारीक अक्षरांत लपलेली खरी गोष्ट वेगळीच असते. फसवे लोन अॅप्स सुरुवातीला खूप आकर्षक ऑफर्स देतात — कमी व्याजदर, त्वरित कर्ज मंजुरी, कमी कागदपत्रे !! पण एकदा तुम्ही अॅप डाउनलोड करून माहिती दिल्यावर पुढील समस्या सुरू होतात: खूप जास्त व्याजदर आणि लपवलेले चार्जेस, वेळेपूर्वी परतफेडीचा दबाव, तुमच्या कॉन्टॅक्ट्सना धमकीचे कॉल किंवा मेसेज, वैयक्तिक माहितीचा गैरवापर.
यातील सर्वात मोठा धोका असतो : तुमच्या मोबाईल डेटाचा ऍक्सेस
ॲप इन्स्टॉल करताना ते तुमच्याकडे तुमच्या मोबाईल वरील बरीच माहिती / डेटा मागतात. उदा. 📂 Contacts, 📷 Camera, 🖼️ Photos, 📞 Call Logs यांची माहिती. हे सगळं ते का बरं मागत असतील? कर्ज द्यायला यापैकी काहीही लागत नाही. पण पैसे वेळेत भरले नाहीत तर सायबर गुन्हेगारांकडुन वरील डेटाचा गैरवापर सुरु होतो : तुमचे आई ,वडील, बॉस, मित्र — सगळ्यांना फोन तुमच्या कर्ज परिस्थिती बद्दल फोन केले जातात / “हा माणूस फसवेगिरी करतो” असे मेसेजेस पाठवले जातात / तुमच्या फोटो गॅलरीतील (विशेषतः महिला वर्गाचे) फोटो वापरून घरातील व्यक्तींची सोशल मीडियावर बदनामी केली जाते.
हे सर्व बंद व्हावे या भीतीपोटी कर्जदार आणखी नवीन कर्ज घेत रहातो आणि सायबर गुन्हेगारांच जाळं आणखी घट्ट होत जातं.
सावध कसे राहुयात ? फसवे अॅप ओळखण्याचे काही संकेत आहेत. खालील गोष्टी दिसल्या तर सावध राहा:
अॅप Google Play Store किंवा Apple App Store वर नसणे
डेव्हलपर कंपनीची स्पष्ट माहिती नसणे
RBI (भारतीय रिझर्व्ह बँक) नोंदणी नसणे
खूपच जलद आणि सोपी कर्ज मंजुरी असणे
अनावश्यक परवानग्या (Contacts, Gallery, Messages) मागणे
हे सर्व धोके / परिस्थिती टाळण्यासाठी पुढील गोष्टी नक्की करा
✅ डिजिटल लोन ॲप RBI Registered आहे का ते तपासा — rbi.org.in वर NBFC यादी पाहून हे तपासता येते.
✅ ॲपला APR : Annual Percentage Rate किती आहे हे आधीच विचारा. ३०% पेक्षा जास्त असेल तर सावध व्हा.
✅ तुमच्या मोबाईल डेटाला Permissions द्यायला नकार द्या — Contacts आणि Photos चा ॲक्सेस कोणत्याही लोन ॲपला देऊ नका. त्यांचा गैरवापर होऊ शकतो.
✅ घाई करू नका — “ऑफर फक्त 2 तासांसाठी!” . अशी घाई / आमिष दाखवणं हीच सायबर गुन्हेगारांची युक्ती असते
✅ ॲपचे रिव्ह्यू आणि रेटिंग वाचा: इतर लोकांचे अनुभव वाचा. कमी रेटिंग किंवा नकारात्मक रिव्ह्यू असल्यास ॲपचा वापर टाळा.
फसवणूक झाली तर काय करायचं? धमकी आली, पैसे अडवले किंवा बदनामी झाली तर पुढील प्लँटफॉर्मवर लगेच तक्रार करा:
RBI Sachet Portalsachet.rbi.org.in
Cyber Crime Portalcybercrime.gov.in
National Consumer Helpline1800-11-4000
निष्कर्ष :
गरज असली तरी घाईत घेतलेलं कर्ज, शांतपणे घेतलेल्या निर्णयापेक्षा नेहमीच महागात पडतं. “इन्स्टंट लोन” ही सोय आहे, पण ती योग्य पद्धतीने वापरली नाही तर मोठा सापळा ठरू शकते. थोडी सावधगिरी, योग्य माहिती आणि विचारपूर्वक निर्णय घेतल्यास तुम्ही या फसवणुकीपासून स्वतःला वाचवू शकता. लक्षात ठेवा, सोपी ऑफर दिसली की त्यामागे धोका असण्याची शक्यता जास्त असते!
पुढच्या वेळी “इन्स्टंट लोन” असा मेसेज आला तर काय कराल ? — Delete Message !
–टीम SWS
संपर्क : श्री. विक्रांत राठोड
75078 84477

