Money चे अंतरंग

Financial Literacy Initiative by SWS


किती म्हणजे पुरेसे?

–

आपण सर्वजण आयुष्यात प्रगती करू इच्छितो. अधिक कमाई, अधिक बचत, अधिक गुंतवणूक, अधिक सुरक्षितता – हे सर्व स्वाभाविक आहे. प्रत्येक पालकाला आपल्या मुलांचे भविष्य सुरक्षित हवे, असे वाटत असते. प्रत्येक कुटुंबाला स्थैर्य हवे असते. त्यामुळे संपत्ती निर्माण करणे चुकीचे नाही उलट ते आवश्यकच आहे.

पण या सगळ्यात एक प्रश्न आपण स्वतःला क्वचितच विचारतो – “किती म्हणजे पुरेसे?”

गुंतवणुकीच्या जगात एक समज पक्का झालेला आहे – अधिक म्हणजे नेहमीच चांगले. पण ते खरेच तसे आहे का?

वर्तनात्मक वित्त (Behavioral Finance) आपल्याला सांगते की अनेकदा आपण आर्थिक निर्णय आकड्यांवर नाही, तर आपल्या भावना, भीती आणि सवयींवर घेत असतो. पैसा कमावणे हे तांत्रिक कौशल्य असू शकते; पण पैसा कसा वापरायचा आणि तो किती असणे पुरेसे आहे, हे समजणे ही मानसिक परिपक्वतेची गोष्ट आहे.

पैसा – साधन की अंतिम उद्दिष्ट?

पैसा हा जीवन जगण्यासाठी आवश्यक साधन आहे. तो आपल्याला संधी देतो, सुरक्षितता देतो, स्वाभिमान देतो. योग्य नियोजन, शिस्तबद्ध बचत आणि संतुलित गुंतवणूक ही आर्थिक स्थैर्याची पायाभूत तत्त्वे आहेत. परंतु जेव्हा पैसा साधन न राहता उद्दिष्ट बनतो, तेव्हा समस्या सुरू होते. आपण साठवत राहतो, वाढवत राहतो, इतरांशी आर्थिक तुलना करत राहतो. पण क्षणभर थांबून विचार करत नाही –

  • हा पैसा कशासाठी?
  • तो माझ्या जीवनाला काय मूल्य देतो?
  • पैसा वाढतो आहे; पण त्यासोबत आनंद वाढतो आहे का तणाव?

जर संपत्ती वाढत असेल आणि मनःशांती कमी होत असेल, तर आपण काहीतरी मूलभूत चुकत आहोत असे समजावे.

“अधिक” ची भूक का वाढते?

तीन मानसिक प्रवृत्ती आपल्याला सतत अधिक साठवायला भाग पाडतात.

१. भीती : भविष्य अनिश्चित आहे. आरोग्य, नोकरी, व्यवसाय – काहीही बदलू शकते. त्यामुळे आपण म्हणतो, “थोडं अजून साठवूया.” पण “थोडं” कधी “पुरेसे” होईल , हे आपण ठरवत नाही.

२. तुलना: आपल्या आसपासचे लोक मोठी घरे घेतात, महागड्या गाड्या घेतात, परदेशात फिरतात. नकळत आपण स्वतःची त्याच्या बरोबर तुलना करू लागतो. आणि मग आपल्यालाही हे सर्व हवेसे वाटते.

३. सवय: साठवणे आणि वाढवणे हीच यशाची खूण आहे, असा समज तयार होतो. त्यामुळे साठवणे हीच सवय बनते – त्यामागील उद्देश बाजूला पडतो.

म्हणूनच असे सांगावेसे वाटते की समस्या रकमेची नसते; असते ती स्पष्टता नसण्याची.

आपण घरात कुटुंबियांशी चर्चा करून आपली आर्थिक उद्दिष्टे लिहून काढवीत आणि आर्थिक सल्लागाराच्या मदतीने त्यांचे संगोपन करावे हे श्रेयस्कर ! शिक्षणासाठी किती रक्कम लागेल, निवृत्तीनंतर किती खर्च अपेक्षित आहे, आपत्कालीन निधी किती हवा, घरातील एखादे कार्य केव्हा आहे आणि यासाठी किती पैसे लागतील इ. उद्दिष्टये लिहिल्याने या सर्वांसाठीच “पुरेसे” किती याची स्पष्टता येते. त्यामुळे शिस्तबद्ध गुंतवणूक करण्यासाठी आराखडा मिळतो. मात्र जे कधी लिहिलेच गेले नाही, चर्चिलेच गेले नाही त्याबाबत “किती पुरेसे ?” ही समस्या अखंड राहते. जर उद्दिष्ट स्पष्ट असेल, तर “पुरेसे” ही संकल्पना स्पष्ट होते. पण उद्देशच अस्पष्ट असेल, तर “अधिक”ची शर्यत कधीच संपत नाही.

विनोबा भावे यांच्या दृष्टांताचा वापर करून डॉ. आनंद नाडकर्णी लिहितात –

“जगण्याची होडी पैशाच्या पाण्यावरून चालवावी हे इष्ट; पण म्हणून काही पाण्याला होडीत साठवायचे नाही. तसे केले तर होडी बुडेल.” म्हणजेच पाणी नसले तर होडी चालणार नाही. पण तेच पाणी जर होडीत साठवले, तर ती बुडेल हे लक्षात घ्यायला हवे.

तसेच धनसंचयाच्या याबाबतीतही म्हणता येईल. जीवनाला आनंदी बनविण्यासाठी पैसा आवश्यक आहे. परंतु तोच पैसा जर भीतीपोटी, अतिआसक्तीने किंवा स्पष्ट उद्देश्याशिवाय साठवला, तर तो जीवनात ताण, चिंता आणि अस्वस्थता निर्माण करू शकतो.

कबीरदास यांनीही याच विचाराला प्रभावी शब्द दिले आहेत:

जो जल बाढ़े नाव में, घर में बाढ़े दाम।
दोऊ हाथ उलीचिए, यही सयानो काम।।

अर्थ : ज्याप्रमाणे नावेत पाणी वाढू लागले तर ती बुडण्याचा धोका असतो, म्हणून शहाणे लोक ते पाणी बाहेर काढतात. त्याचप्रमाणे घरात किंवा जीवनात गरजेपेक्षा जास्त धन साठले, तर तेही नुकसान करू शकते. म्हणून शहाणे लोक अतिरिक्त संपत्ती योग्य ठिकाणी वापरतात.

आपण स्वतःला प्रामाणिकपणे विचारू शकतो –

  • माझी गुंतवणूक मला शांत झोप देते का?
  • पैसा वाढतो आहे; पण त्यासोबत समाधान वाढते आहे का चिंता?
  • मी पैशाचा उपयोग जीवन समृद्ध करण्यासाठी करतो आहे का फक्त साठवण्यासाठी?

जर संपत्ती असूनही मन अस्वस्थ असेल, तर कदाचित आपण होडीत पाणी साठवत आहोत.

निष्कर्ष

धनसंचय ही फक्त परताव्याची शर्यत नाही तर ती संतुलनाची प्रक्रिया आहे. पैसा आवश्यक आहे, पण त्याच्या वापराबाबत स्पष्टता असावी.

–टीम SWS

संपर्क : श्री. विक्रांत राठोड
75078 84477


Discover more from Money चे अंतरंग

Subscribe to get the latest posts sent to your email.



Subscribe Here

About Us

Welcome to SWS Fintech Services Pvt. Ltd. – Your Trusted Partner in Financial Well-being!

Established in 1995, SWS has been committed to empowering individuals, families, and businesses through sound investment services. With over three decades of experience, our team of qualified financial professionals brings together expertise in investment services.

At SWS, we believe that financial success is built on informed decisions, disciplined investing, and long-term relationships. Our goal is to simplify financial complexities, enhance financial literacy, and help our clients confidently pursue their financial aspirations.

Through this blog, we share insights, practical tips, and perspectives to help you make informed financial decisions.

Explore more about us at: https://www.swsfspl.com/

SWS Fintech Services Pvt Ltd
AMFI Registered Mutual Fund Distributor- ARN- 90746
ARN Renewal Date- 25th July 2028
APMI Registered Distributor- APRN01157
APRN Renewal Date- 11th Jan 2029

Discover more from Money चे अंतरंग

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading