–
भारताच्या आर्थिक व्यवहारांचे स्वरूप / सवय बदलण्यात UPI – Unified Payments Interface ने अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली आहे. ऑगस्ट २०१६ मध्ये सुरू झालेल्या UPI ने ऑगस्ट २०२६ मध्ये आपल्या कार्यकाळाचे यशस्वी दशक पूर्ण केले. UPI च्या या दहा वर्षांच्या प्रवासानिमित्त जाणून घेऊया—एका साध्या डिजिटल पेमेंट सुविधेने भारतीयांच्या आर्थिक व्यवहारांची भाषा कशी बदलली आहे त्याबद्दल…

(Picture Source: Internet)
काही वर्षांपूर्वी एखाद्या छोट्या दुकानात चहा घेतल्यानंतर दहा-वीस रुपये देण्यासाठी पाकिटातून रोख पैसे काढावे लागत. सुट्टे पैसे नसतील तर दुकानदाराकडे विचारणा व्हायची, कधी चॉकलेट स्वीकारावे लागायचे तर कधी ‘पुढच्या वेळी बघू’ असे म्हणत व्यवहार होत असत. आज त्याच दुकानादारासमोर एक छोटासा QR Code असतो. मोबाईल काढला, कोड स्कॅन केला, PIN टाकला आणि काही सेकंदांत आर्थिक व्यवहार पूर्ण होऊ लागले आहेत! ही केवळ पैसे देण्याची नवी पद्धत नाही; ही भारताने उभी केलेली डिजिटल सार्वजनिक पायाभूत क्रांती आहे – UPI. National Payments Corporation of India (NPCI) ने विकसित केलेली ही Interoperable /परस्पर-सुसंगत व्यवस्था आहे. वेगवेगळ्या बँका आणि वेगवेगळे UPI Apps वापरणारे ग्राहक एकमेकांशी सहज व्यवहार करू शकतात. यामुळे डिजिटल पेमेंटचा अनुभव सर्वसामान्यांसाठी एकसंध झाला आहे.
खरी क्रांती लहान व्यवहारांद्वारे झाली आहे !
UPI चे यश समजून घेताना केवळ हजारो किंवा लाखो रुपयांच्या व्यवहारांकडे पाहून चालणार नाही. त्याची खरी क्रांती रस्त्याच्या कडेला दिसते – भाजी विक्रेता, चहावाला, फळविक्रेता, रिक्षाचालक, किराणा दुकानदार, पानटपरी आणि फेरीवाला यांच्या हातातही QR Code पोहोचला आहे. यामुळे तंत्रज्ञानाचे एक प्रकारे लोकशाहीकरण झाले. मोठ्या व्यापाऱ्याला उपलब्ध असलेली डिजिटल पेमेंटची सुविधा अगदी छोट्या विक्रेत्यापर्यंत आली आहे. कार्ड मशीन किंवा स्वतंत्र पेमेंट सुविधे शिवाय QR Code च्या माध्यमातून डिजिटल पेमेंट स्वीकारणे शक्य झाले. UPI ने डिजिटल व्यवहार हे केवळ मोठ्या शहरांतील किंवा तंत्रज्ञान जाणणाऱ्या लोकांचे साधन न ठेवता सर्वसामान्यांच्या दैनंदिन जीवनाचा भाग बनवले.
दहा वर्षांतील डेटा वास्तव
2016-17 मध्ये UPI अजून प्रयोगाच्या आणि स्वीकाराच्या सुरुवातीच्या टप्प्यावर होते. पुढील दहा वर्षांत व्यवहारांची संख्या आणि मूल्य दोन्ही विलक्षण वेगाने वाढले. खालील MIS मध्ये डिजिटल पेमेंट मधील UPI चा शेअर हा Transaction Volume च्या दृष्टीने दाखवला आहे.
UPI वार्षिक MIS : 2016-17 ते 2025-26
| आर्थिक वर्ष | वार्षिक व्यवहार (कोटी) | सरासरी व्यवहार / महिना (कोटी) | वार्षिक व्यवहार मूल्य (₹ लाख कोटी) | सरासरी मूल्य / महिना (₹ लाख कोटी) | Digital Payments मधील UPI वाटा* | सरासरी व्यवहार मूल्य |
| 2016-17 | 1.78 | 0.15 | 0.07 | 0.006 | ~0.25% | ₹3,903 |
| 2017-18 | 91.52 | 7.63 | 1.10 | 0.09 | ~4% | ₹1,200 |
| 2018-19 | 535.34 | 44.61 | 8.77 | 0.73 | ~17% | ₹1,638 |
| 2019-20 | 1,251.86 | 104.32 | 21.32 | 1.78 | ~27% | ₹1,703 |
| 2020-21 | 2,233.07 | 186.09 | 41.04 | 3.42 | ~40% | ₹1,838 |
| 2021-22 | 4,595.61 | 382.97 | 84.16 | 7.01 | ~52% | ₹1,831 |
| 2022-23 | 8,371.44 | 697.62 | 139.15 | 11.60 | ~64% | ₹1,662 |
| 2023-24 | 13,112.95 | 1,092.75 | 199.95 | 16.66 | 79.6% | ₹1,525 |
| 2024-25 | 18,586.60 | 1,548.88 | 260.56 | 21.71 | ~81% | ₹1,402 |
| 2025-26 | 24,161.69 | 2,013.47 | 314.23 | 26.19 | ~84% | ₹1,301 |
*टीप: UPI share हा transaction volume च्या दृष्टीने आहे. विविध अधिकृत publications मध्ये “total digital payments” आणि “retail digital payments” यांच्या व्याख्येत फरक असल्याने सुरुवातीच्या वर्षांतील share अंदाजे/rounded आहेत. 2023-24, 2024-25 आणि 2025-26 साठी उपलब्ध अधिकृत संदर्भांतील आकडे अधिक स्पष्ट आहेत.
आकड्यांमागची खरी गोष्ट
या मधील सर्वांत प्रभावी बाब म्हणजे व्यवहारांची संख्या आणि व्यवहार मूल्य दोन्ही वाढले, पण सरासरी व्यवहार मूल्य दीर्घकाळात कमी झाले. याचा अर्थ UPI व्यवहार मोठ्या फ़ंड ट्रान्सफर पुरते मर्यादित राहिले नाही. चहा, भाजी, रिक्षा, किराणा, छोट्या दुकानातील खरेदी अशा दैनंदिन लहान -व्यवहारांमध्ये ते खोलवर पोहोचले. 2016-17 मध्ये महिन्याला सरासरी सुमारे 15 लाख UPI व्यवहार होत होते. 2025-26 मध्ये महिन्याला सरासरी 2,013 कोटी व्यवहार झाले. म्हणजे एका दशकात UPI हा एक पेमेंटचा पर्याय न राहता भारताच्या दैनंदिन व्यवहारांचा मुख्य डिजिटल रेल बनला.
समजण्यासाठी काही अतिरिक्त MIS
| MIS | 2016-17 | 2025-26 | यातून काय दिसते? |
| वार्षिक व्यवहार संख्या | 1.78 कोटी | 24,161.69 कोटी | व्यवहारांच्या संख्येत अभूतपूर्व विस्तार |
| सरासरी मासिक व्यवहार | 0.15 कोटी | 2,013.47 कोटी | UPI रोजच्या व्यवहारांचे प्रमुख माध्यम बनले |
| वार्षिक व्यवहार मूल्य | ₹0.07 लाख कोटी | ₹314.23 लाख कोटी | डिजिटल अर्थव्यवस्थेतील scale प्रचंड वाढला |
| सरासरी दैनिक व्यवहार | ~4.9 लाख | ~66.2 कोटी | दैनंदिन वापरातील खोलवर पोहोच स्पष्ट होते |
| सरासरी व्यवहार मूल्य | ~₹3,903 | ~₹1,301 | लहान retail payments मोठ्या प्रमाणात UPI कडे वळले |
| Digital payments मधील UPI share | नगण्य | ~84% | UPI भारतातील dominant digital payment mode झाला |
| UPI ecosystem मधील banks | ~44 | 700 पेक्षा अधिक | banking ecosystem आणि interoperability मोठ्या प्रमाणात वाढली |
| जागतिक real-time payments मधील भारताचा वाटा | – | ~49% (2025) | भारताचा real-time payment scale जगात अग्रस्थानी |
भारताने वेगळा मार्ग का निवडला?
जगातील अनेक देशांमध्ये डिजिटल पेमेन्टचा विकासक्रेडिट किंवा डेबिट कार्ड यांच्या माध्यमातून झाला. भारताने मात्र मोबाईल, बँक खाते, Instant Payment Infrastructure आणि Interoperability यांना एकत्र आणत वेगळा मार्ग स्वीकारला. IMPS सारख्या आधीच्या पेमेंट रेल्स, वाढते मोबाईल वापरकर्ते आणि
डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा यांच्या पायावर UPI उभे राहिले. या मॉडेलची खासियत म्हणजे वापरकर्त्याला एखाद्या विशिष्ट बँकेच्या ॲप किंवा पेमेंट कंपनीच्या प्रणालीपुरते मर्यादित राहावे लागत नाही. UPI ID, QR Code आणि मोबाईल क्रमांक यांच्या साहाय्याने विविध बँक आणि ॲप परस्पर व्यवहार करू शकतात. यामुळे नेटवर्क प्रभाव वेगाने वाढला.
UPI ने काय बदलले?
सर्वांत महत्त्वाचा बदल म्हणजे व्यवहारातील फ्रिक्शन / अडचणी कमी झाल्या आहेत. ₹20 असो किंवा ₹20,000 – आता रोख रक्कम जवळ असण्याची गरज भासत नाही, सुट्ट्या पैशांची समस्या भेडसावतनाही, ATM शोधण्याची गरज अनेकदा उरत नाही आणि व्यवहाराची डिजिटल नोंद तयार होते आहे. यातून आणखी एक महत्त्वाची गोष्ट घडली – छोट्या व्यवहारालाही डिजिटल ओळख मिळाली. आर्थिक समावेशनाच्या दृष्टीने याचे महत्त्व मोठे आहे. डिजिटल व्यवहाराची सुविधा समाजाच्या तळागाळापर्यंत पोहोचल्याने औपचारिक आर्थिक व्यवस्थेशी नागरिकांचे नाते मजबूत झाले. कदाचित UPI ची सर्वांत मोठी उपलब्धी हीच आहे की त्याने अत्यंत गुंतागुंतीचे तंत्रज्ञान सर्वसामान्यांसाठी इतके सोपे केले की आपण आता त्याला ‘तंत्रज्ञान’ म्हणूनही पाहत नाही. ते आपल्या दैनंदिन जीवनाचा स्वाभाविक भाग झाले आहे.
जगासाठी भारताचा धडा
UPI च्या प्रवासातील सर्वांत महत्त्वाचा धडा तंत्रज्ञानापेक्षा विचारपद्धतीचा आहे. मोठी समस्या सोडवण्यासाठी नेहमीच महागडे किंवा क्लिष्ट तंत्रज्ञान आवश्यक नसते. तंत्रज्ञान सोपे, परवडणारे, Interoperable / परस्पर-सुसंगत आणि मोठ्या प्रमाणावर वापरता येण्याजोगे केले, तर त्याचा परिणाम किती व्यापक होऊ शकतो, याचे UPI हे उत्तम उदाहरण आहे. भारतासारख्या प्रचंड लोकसंख्या, विविध भाषा, आर्थिक विषमता आणि ग्रामीण-शहरी अंतर असलेल्या देशात एक डिजिटल पेमेंट प्रणाली सर्वसामान्यांच्या सवयीचा भाग बनणे ही उल्लेखनीय बाब आहे. 2025 मध्ये भारताचा जगातील रिअल-टाइम पेमेंट व्यवहारांमध्ये सुमारे 49% वाटा असल्याचे सरकारी माहितीत नमूद करण्यात आले आहे. भारताचे UPI तंत्रज्ञान अनेक देशांशी जोडली जात असून तिचा आंतरराष्ट्रीय वापरही वाढत आहे.
सोयीबरोबर जबाबदारीही
UPI च्या वाढत्या वापराबरोबरच डिजिटल आर्थिक साक्षरता आणि सायबर सुरक्षेविषयी जागरूकतेचे महत्त्वही वाढत आहे. UPI PIN हा पैसे पाठवताना वापरायचा असतो, पण पैसे स्वीकारण्यासाठी PIN सांगण्याची आवश्यकता नसते, OTP, PIN किंवा Banking माहिती कोणाशीही शेअर करू नये, अनोळखी क्यूआर कोड, स्क्रीन शेअरिंग ॲप्स, बनावट ग्राहक सेवा कॉल्स आणि संशयास्पद पैसे भरण्याच्या कॉल्सपासून सावध राहणे अत्यंत आवश्यक आहे. डिजिटल अर्थव्यवस्था जितक्या वेगाने वाढेल, तितक्याच वेगाने डिजिटल आणि सायबर साक्षरताही वाढली पाहिजे.
UPI कडे केवळ पेमेंट सुविधा म्हणून पाहणे त्याच्या प्रभावाला कमी लेखणे ठरेल. ही व्यवस्था भारताच्या डिजिटल परिवर्तनाची महत्त्वाची पायाभूत सुविधा बनली आहे. 2016-17 मधील 1.78 कोटी व्यवहारांपासून 2025-26 मधील 24,161.69 कोटी व्यवहारांपर्यंतचा प्रवास हा केवळ UPI चा नाही; तो बदललेल्या भारताचा प्रवास आहे.

- श्री. संदीप देशमुख,
डायरेक्टर, SWS
संदर्भ / Sources
- National Payments Corporation of India (NPCI) – UPI Product Statistics and Retail Payment Statistics.
- Reserve Bank of India (RBI) – Payment System Reports / Annual Reports / Digital Payments publications.
- Press Information Bureau (PIB), Ministry of Finance, Government of India – UPI growth, digital payment share and international real-time payment data.
- टीप: काही सुरुवातीच्या वर्षांसाठी digital payment share विविध स्रोतांतील definitions मुळे rounded/indicative स्वरूपात दिला आहे.
