–

कोणतीही सवय लहान वयात पटकन लागते किंवा वाईट सवय मोडायची झाली तरी लहान वयातच मोडावी लागते. गुंतवणुकीबाबत हाच नियम लागू होतो. आपण एकमेकांना भेटवस्तू देतो, कोणी वस्तू देण्यापेक्षा पैशाचे पाकीट देतात म्हणजे समोरची व्यक्ती तिच्या आवडीची वस्तू घेऊ शकेल. मोठ्यांच्या बाबतीत हे ठीक आहे पण लहान मुलांना पैशाचे मोल समजत नाही. त्यांना खेळणी, गेम्स, पुस्तकं, कपडे, खाऊ अशा भौतिक गोष्टींमध्ये अधिक रस असतो. वास्तविक मुलांना भेट म्हणून मिळालेल्या पैशाचा विनियोग पालकांनी सजगपणे केल्यास त्या भेटीचे सार्थक होऊ शकते. पूर्वी मातीच्या पिगी बँकमध्ये मुलं पैसे ठेवायची आणि गरज पडल्यास हे मातीचं भांडं तोडून पैसे काढले जायचे. आता पिगी बँक फोडण्याची गरज नसते तर कुलूपकिल्ली असलेल्या धातूच्या छान रंगीत पिगी बॅंक्स मिळतात, भेट म्हणून किंवा खाऊसाठी म्हणून मिळालेले पैसे या पिगीबँक मधे टाकण्याची सवय मुलांना लावता येते.
मुलांच्या दृष्टीने एखादी मोठी किंवा महाग वस्तू घ्यायची असल्यास आपले किती पैसे जमले हे मधून मधून मोजल्यामुळे मुलांना खर्चाचा अंदाज घेण्याचे शिक्षण आपोआप मिळत जाते. आणि पैसे खर्च करून टाकण्यापेक्षा साठवत गेलो तरच आपण आपल्याला हवी ती वस्तू लवकर घेऊ शकू हे भान येते. ही अशी छोटी बचत पेटी मुलांना आणून दिल्यावर तशीच छोटी नोंदवही सुद्धा आणून द्यावी. म्हणजे जमाखर्च वही लिहिण्याचा बालसंस्कार होतो. सुजाण पालक लहान मुलांचे बँक खाते उघडून देतात. थोडी थोडी रक्कम जमा झाल्यावर मुलांना बँकेत जाऊन पैसे भरण्याची सवय लावता येते. मग अगदी शंभर दोनशे पाचशे रुपयांना सुद्धा खूप जास्त मोल येते. मुलांची बँकेच्या वातावरणाची, व्यवहारांची तोंडओळख करून दिली जाऊ शकते.

आता त्याही पुढे जात थोड्या मोठ्या वयाच्या मुलांचा विचार करूया. खूप पूर्वी पॉकेटमनी ही संकल्पनाच अस्तित्वात नव्हती. मात्र हल्ली मुलं शाळा-कॉलेज क्लासच्या कारणाने बरेच तास घराबाहेर असतात, त्यामुळे मुलांच्या पाकिटात काही रक्कम असणे गरजेचे होऊन बसते. प्रत्येक वेळेस चैन म्हणून नव्हे तर अचानक समोर आलेल्या खर्चाला तोंड देण्याकरता म्हणून मुलांकडे पैसे असणे आवश्यक आहे. पालकांनी मुलांवर करायच्या संस्कारांपैकी एक महत्वाचा संस्कार म्हणजे अर्थसंस्कार. मुलांच्या हाती पैसे किंवा एटीएम कार्ड देताना पालकांनी तारतम्य ठेवणं अतिशय महत्वाचं असतं. मुलाच्या गरजा काय आहेत, पैकी आपण कोणत्या गरजा थेट भागवू शकतो आणि कोणत्या गोष्टीसाठी मुलाच्या हाती पैसा द्यायचा हे पालकांनी ओळखलं पाहिजे. मुलाचा हाती पैसे देताना हे पैसे नेमके कोणत्या हेतूने दिले आहेत याचा खुलासासुद्धा करायला हवा. हाती आलेला पैसा आणि त्यातून भागवायचे खर्च किंवा गरजा याचे आडाखे बांधण्याची सवय मुलाला लागू शकेल. बाजारात चार ठिकाणी जाऊन चौकशी करून मग वस्तू खरेदी करणे किंवा इंटरनेटवर शोध घेत कुठे काय चांगलं आणि वाजवी पैशात मिळतं याचा अभ्यास करण्याची सवय लावता येईल. हे प्रत्यक्ष जीवनातून मिळणारं थेट शिक्षण असतं. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे मुलाने घेतलेल्या प्रत्येक योग्य निर्णयाची दखल घेत त्याचं कौतुक करणं हेही पालकांचं कर्तव्य आहे. बरेचदा खिशात असलेला पैसा मुलं वापरतही नाहीत पण आपल्या खिशात पैसा आहे याचा आधार आणि यातलं सुख आकड्यात मोजण्याच्या पलीकडचं असतं.
मुलांच्या हाती पैसा देणं म्हणजे मुलाच्या व्यक्तिमत्वाचा एक स्वतंत्र व्यक्ती म्हणून स्वीकार करणं. याचा मुलाच्या मानसिक आणि वैचारिक वाढीवर सकारात्मक परिणाम होऊ शकतो. मुलांना दिलेल्या पैशातून काही पैसे मजेसाठी वापरावे पण काही पैसे बचत किंवा गुंतवणूक म्हणून सुद्धा बाजूला ठेवण्याचे शिक्षण द्यावे. हे शिक्षण किशोर वयात दिलं गेलं तर अनेक मुलांसाठी त्यात करिअर संधी सुद्धा सापडू शकतात. किशोर वयातील मुले जाणीवपूर्वक गुंतवणूक करताना दिसणे हे चित्र सरसकट सर्वत्र बघायला मिळाले तर ते एक आनंदपर्व असेल. अर्थसाक्षरतेचे आनंदपर्व आणि तेही उगवत्या उमलत्या पिढीच्या बाबतीत.. म्हणजेच संत तुकारामांच्या शब्दात.. ‘जोडुनिया धन, उत्तम व्यवहार‘.. शिकवणे.

स्मिता गानू जोगळेकर.
9892551950
smita_dj@hotmail.com
