Money चे अंतरंग

Financial Literacy Initiative by SWS


आजची बचत : उद्याच्या स्वप्नांना पंख!

–

(जागतिक बचत दिनानिमित्त विशेष लेख)

घरात सापडलेली एखादी जुनी कागदपत्रांची पेटी, घरातील पैशांचा गल्ला किंवा वहीत काळजीपूर्वक लिहिलेला घरखर्चाचा हिशेब अचानक कधी सापडतात. ते बघून जाणवते कि या साध्या गोष्टींमधून अनेकांनी बचतीचे आपले पहिले धडे घेतले असतील. काय दिसते ? दरवेळी बाजूला ठेवलेली रक्कम मोठी नसे पण गरजेच्या वेळी तिचा आधार मोठा वाटायचा. कधी शाळेची फी भरायला, कधी अचानक आलेला खर्च भागवायला, तर कधी घरातील एखादी छोटी इच्छा पूर्ण करायला हीच बचत उपयोगी पडायची.

आज पैशांचे व्यवहार बदलले आहेत. मोबाइलवरून काही क्षणांत पैसे पाठवता येतात, खरेदी करता येते आणि गुंतवणूकही करता येते. पैसे खर्च करण्याच्या वाटा वाढल्या आहेत. या तांत्रिक सोयींच्या काळात एक प्रश्न मात्र प्रत्येकाने स्वतःला विचारायला हवा—”आजच्या गरजा भागवताना मी उद्यासाठी काही तरतूद करतो आहे का?” आजचा ‘जागतिक बचत दिन’ आपल्याला याच प्रश्नाकडे लक्ष द्यायला सांगतो.

जागतिक स्तरावर ३१ ऑक्टोबर रोजी, तर भारतात ३० ऑक्टोबर रोजी ‘बचत दिन’ पाळला जातो. इटलीतील मिलान येथे १९२४ मध्ये झालेल्या पहिल्या आंतरराष्ट्रीय बचत परिषदेत या दिनाची सुरुवात झाली. बचतीच्या माध्यमातून आर्थिक सुरक्षितता आणि स्वावलंबन वाढविणे हा त्यामागील उद्देश होता. २०२६ मध्ये या दिनाच्या स्थापनेला १०२ वर्षे पूर्ण होत आहेत. काळ बदलला, साधने बदलली तरी भविष्याची तयारी करण्याची गरज कायम आहे. बचत आपल्याला अडचणीच्या काळात आधार देते आणि काही गुंतवणुक संधी समोर आली तर तिचा विचार करण्याचे बळही देते. उत्पन्नात खंड पडल्यास या बचतीमुळे थोडा दिलासा मिळतो. वाटलेच तर काही नवीन कौशल्य शिकता येते. मुलांचे शिक्षण, स्वतःचे घर किंवा निवृत्तीनंतरचे जीवन यांसाठी तयारी करता येते. आपल्या हाताशी असलेली तरतूद निर्णय घेताना आत्मविश्वास देते.

बचत एखाद्या स्वप्नाला कशी साथ देऊ शकते, याचे प्रेरणादायी उदाहरण म्हणजे सुधा मूर्ती आणि इन्फोसिसच्या सुरुवातीची गोष्ट.

१९८१ साल. नारायण मूर्तींना सहकाऱ्यांसोबत स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी उभी करायची होती. त्यांच्याकडे कल्पना होती, ध्येय होते आणि ते साकार करण्याची जिद्दही होती. या स्वप्नासाठी सुरुवातीच्या भांडवलाची जुळवाजुळव करायची होती. याच निर्णायक टप्प्यावर सुधा मूर्ती त्यांच्या सोबत खंबीरपणे उभ्या राहिल्या. सुधा मूर्तींच्या आईने त्यांना एक साधा, पण आयुष्यभर उपयोगी पडणारा सल्ला दिला होता—आपत्कालीन गरजांसाठी पैसे बाजूला ठेव. त्यानुसार सुधा मूर्ती दर महिन्याला काही रक्कम साठवत होत्या. त्यांच्याकडे ₹१०,२५० इतकी बचत जमली होती. नारायण मूर्तींनी कंपनी सुरू करण्याची कल्पना मांडली, तेव्हा त्यांनी स्वतःजवळ ₹२५० ठेवून उरलेले ₹१०,००० त्यांना दिले. ही रक्कम इन्फोसिसच्या स्थापनेसाठी सुरुवातीचे भांडवल ठरली. हा अनुभव सुधा मूर्तींनी स्वतः मुलाखतींमध्ये सांगितला आहे. त्या काळात ₹१०,००० ही त्यांच्यासाठी महत्त्वाची रक्कम होती. ती देताना परतीची जोखीम असल्याचीही त्यांना जाणीव होती. पुढे कंपनी यशस्वी होईल का, याची खात्री नव्हती. पण नारायण मूर्तींच्या कष्ट करण्याच्या तयारीवर त्यांचा विश्वास होता. पुढे संस्थापकांची दूरदृष्टी, सहकाऱ्यांचे योगदान आणि अनेक वर्षांच्या परिश्रमांतून इन्फोसिसने जगभरात आपले स्थान निर्माण केले. त्या मोठ्या प्रवासाच्या सुरुवातीला एका कुटुंबात जपून ठेवलेल्या बचतीचा मोलाचा हातभार होता.

या गोष्टीतून बचतीचे सामर्थ्य दिसते. आज बाजूला ठेवलेली रक्कम उद्या एखाद्या संधीचे दार उघडू शकते. प्रत्येकाच्या बचतीतून मोठी कंपनी उभी राहीलच असे नाही. पण त्यातून एखाद्याचे शिक्षण पूर्ण होऊ शकते, नवीन कौशल्य शिकण्याची संधी मिळू शकते, छोटा व्यवसाय सुरू करता येऊ शकतो किंवा संकटाच्या काळात कुटुंबाला आधार मिळू शकतो. आपल्या आयुष्यातील या गोष्टीही तितक्याच महत्त्वाच्या असतात.

प्रत्येकाची आर्थिक परिस्थिती सारखी नसते. काही कुटुंबांना दैनंदिन गरजा भागवतानाच मोठी कसरत करावी लागते. त्यामुळे बचत/गुंतवणुक कमी होते म्हणून स्वतःला किंवा इतरांना दोष देणे योग्य नाही. आपल्या परिस्थितीचा प्रामाणिक आढावा घेऊन, शक्य असेल तिथून सुरुवात करावी. दहा रुपये असोत, पन्नास रुपये असोत किंवा त्याहून अधिक—आपल्याला झेपेल अशी रक्कम नियमितपणे बाजूला ठेवण्याची सवय महत्त्वाची आहे.

अनेकदा आपण म्हणतो, ‘महिन्याच्या शेवटी पैसे उरले, तर बचत करू.’ पण छोटेमोठे खर्च होत राहतात आणि बचत/गुंतवणुक पुढे ढकलली जाते. म्हणून आवश्यक घरखर्च, कर्जाचे हप्ते आणि इतर जबाबदाऱ्या लक्षात घेऊन बचतीचीही आधीच तरतूद करावी. आपल्या परिस्थितीला अनुरूप आणि टिकवता येईल अशी बचतीची सवय घडवणे अधिक महत्त्वाचे आहे. बचतीला एखादे नाव दिले, तर तिचा उद्देश अधिक स्पष्ट होतो. ‘पैसे साठवायचे आहेत’ यापेक्षा ‘पुढील वर्षीच्या शिक्षणासाठी’, ‘नवीन कौशल्य शिकण्यासाठी’ किंवा ‘आपत्कालीन गरजांसाठी’ पैसे बाजूला ठेवायचे आहेत, असे ठरविल्यास नियोजन सोपे होते. किती रक्कम लागेल आणि ती कधीपर्यंत जमवायची आहे, याचाही विचार करता येतो.

बचतीसोबत खर्चाकडेही जागरूकपणे पाहायला हवे. एखादी वस्तू खरेदी करण्यापूर्वी स्वतःला विचारून बघा .. ‘मला या वस्तूची खरंच गरज आहे का?’, ‘ ही वस्तू आधीपासून घ्यायची होती का? की फक्त सवलत दिसल्यामुळे खरेदी करण्याची इच्छा झाली?’ मितव्यय म्हणजे आपल्या साधनसंपत्तीचा विवेकाने वापर करणे. आरोग्य, पौष्टिक आहार, आवश्यक उपचार किंवा शिक्षण यांवर अयोग्य काटकसर करणे टाळावे. कुटुंबासोबतचा आनंद आणि भविष्यासाठीची तयारी यांचा समतोल साधता आला, तर बचतीची सवय दीर्घकाळ टिकू शकते.

२०२६ च्या जागतिक बचत दिनाच्या मोहिमेची संकल्पना आहे—“AI Advises, Human Decides.” अर्थात, “कृत्रिम बुद्धिमत्ता सल्ला देते, निर्णय माणसाने घ्यावेत.” आर्थिक माहिती आणि नियोजनासाठी तंत्रज्ञान मदत करू शकते. पण निर्णय घेताना स्वतःचा विवेक वापरणे आवश्यक आहे, हा आशय आहे. मोबाइलवरील जाहिरात, समाजमाध्यमांवरील व्हिडिओ किंवा कृत्रिम बुद्धिमत्तेने दिलेले उत्तर विश्वासार्ह वाटले, तरी त्यावर लगेच आर्थिक व्यवहार करू नयेत. माहितीचा स्रोत, संबंधित जोखीम आणि आपल्या गरजांशी त्या पर्यायाचा संबंध तपासावा. घाईने निर्णय घेण्यास भाग पाडणाऱ्या किंवा अवास्तव फायद्यांचे आश्वासन देणाऱ्या संदेशांबाबत सावध राहावे.

आर्थिक शहाणपणाचे हे धडे घरातील संवादातून पुढील पिढीपर्यंत पोहोचू शकतात. मुलांना खाऊच्या पैशांचा हिशेब ठेवायला शिकवणे, एखाद्या खरेदीसाठी वाट पाहण्याचा अनुभव देणे आणि स्वतःच्या बचतीतून छोटी इच्छा पूर्ण करू देणे, यातून त्यांना पैशांचे मोल समजते. आई-वडील किंवा आजी-आजोबांना विचारता येईल.. ‘तुम्ही केलेली बचत कोणत्या महत्त्वाच्या वेळी उपयोगी पडली?’ अशा खऱ्या अनुभवांतून मुलांना बचतीचा अर्थ अधिक सहजपणे समजू शकतो. ज्येष्ठांनी आपले अनुभव सांगावेत आणि तरुणांनी सुरक्षित डिजिटल व्यवहारांची माहिती द्यावी. कुटुंबातील सर्व प्रौढ सदस्यांनी आर्थिक चर्चेत सहभागी व्हावे.

SWS ब्लॉगच्या वाचकांनी या बचत दिनाच्या निमित्ताने बचतीची/गुंतवणुकीची एक छोटी कृती निवडावी आणि ती सातत्याने करावी. आपल्या क्षमतेनुसार केलेल्या नियोजनातून स्वतःच्या गरजा, कुटुंबाची सुरक्षितता आणि सामाजिक योगदान यांसाठीही जागा निर्माण होऊ शकते.

वाचकांसाठी कृतीसूची

१. ३० दिवस खर्चाची नोंद ठेवा. रोख, कार्ड आणि मोबाइलवरून झालेले सर्व खर्च लिहा. महिन्याच्या शेवटी आवश्यक आणि टाळता येण्यासारखे खर्च ओळखा.
२. एक आर्थिक उद्दिष्ट निश्चित करा. कशासाठी पैसे हवेत, किती रक्कम लागेल आणि ती कधीपर्यंत जमवायची आहे, हे लिहून काढा.
३. परवडणाऱ्या नियमित बचतीची सुरुवात करा. आवश्यक खर्च आणि जबाबदाऱ्या लक्षात घेऊन दर आठवड्याला किंवा दर महिन्याला ठरावीक रक्कम बाजूला ठेवा.
४. आपत्कालीन निधीचा आढावा घ्या. अचानक खर्च आला किंवा उत्पन्नात खंड पडला, तर कोणते पैसे वापरता येतील, हे तपासा. गरजेनुसार त्यात भर घालण्याची योजना करा.
५. अनियोजित खरेदीपूर्वी २४ तास थांबा. तातडीची गरज नसलेल्या वस्तूची खरेदी पुढील दिवसापर्यंत थांबवा. त्यानंतरही ती आवश्यक वाटते का, ते पाहा.
६. एक अनावश्यक नियमित खर्च कमी करा. वापरात नसलेले सदस्यत्व, अनावश्यक खरेदी किंवा वाया जाणाऱ्या वस्तू यांकडे लक्ष द्या. वाचलेली रक्कम प्रत्यक्ष बचतीत जमा करा.
७. मुलांसोबत ‘खर्च, बचत आणि मदत’ हा उपक्रम करा. खाऊच्या पैशांचे या तीन उद्देशांसाठी वाटप कसे करता येईल, यावर चर्चा करा. मुलांच्या छोट्या बचतीचे कौतुक करा.
८. कुटुंबातील बचतीची एक खरी कथा/अनुभव जाणून घ्या. आई-वडील किंवा आजी-आजोबांना त्यांच्या अनुभवाबद्दल विचारा. तो अनुभव मुलांसोबत शेअर करा.
९. कुटुंबाची छोटी आर्थिक बैठक घ्या. महिन्याचा खर्च, येणाऱ्या गरजा आणि बचतीची प्रगती यांवर सर्व प्रौढ सदस्यांनी शांतपणे संवाद साधा.
१०. एका ज्येष्ठ व्यक्तीला सुरक्षित डिजिटल व्यवहार समजावून सांगा. संशयास्पद संदेश ओळखणे आणि पिन-ओटीपी गुप्त ठेवणे यांचे महत्त्व स्पष्ट करा. त्यांची गोपनीय माहिती स्वतःकडे घेऊ नका.
११. ३० दिवसांनंतर आढाव्याची तारीख ठरवा. किती बचत झाली, कोणता खर्च कमी झाला आणि कोणती सवय पुढे चालू ठेवता येईल, याची नोंद करा.

आज स्वतःला एक प्रश्न विचारूया—“माझी आजची बचत उद्या कोणत्या स्वप्नाला आधार देऊ शकेल?” त्या उत्तराच्या दिशेने आज टाकलेले छोटे पाऊलही मोलाचे ठरेल.


श्री. नीरज अडबे,
असोसिएट डायरेक्टर.
(83088 33724)


Discover more from Money चे अंतरंग

Subscribe to get the latest posts sent to your email.



Subscribe Here

About Us

Welcome to SWS Fintech Services Pvt. Ltd. – Your Trusted Partner in Financial Well-being!

Established in 1995, SWS has been committed to empowering individuals, families, and businesses through sound investment services. With over three decades of experience, our team of qualified financial professionals brings together expertise in investment services.

At SWS, we believe that financial success is built on informed decisions, disciplined investing, and long-term relationships. Our goal is to simplify financial complexities, enhance financial literacy, and help our clients confidently pursue their financial aspirations.

Through this blog, we share insights, practical tips, and perspectives to help you make informed financial decisions.

Explore more about us at: https://www.swsfspl.com/

SWS Fintech Services Pvt Ltd
AMFI Registered Mutual Fund Distributor- ARN- 90746
ARN Renewal Date- 25th July 2028
APMI Registered Distributor- APRN01157
APRN Renewal Date- 11th Jan 2029