–
आपण आयुष्यभर कष्ट करून संपत्ती निर्माण करतो. पण आपल्या पश्चात ही संपत्ती योग्य व्यक्तींपर्यंत किती सहज आणि किती लवकर पोहोचेल याचाही विचार गुंतवणूकदारांनी केला पाहिजे. आजही अनेक कुटुंबांमध्ये मालमत्तेच्या हस्तांतरणासाठी वर्षानुवर्षे न्यायालयीन प्रक्रिया, वारसांमधील मतभेद, कागदपत्रांची गुंतागुंत आणि अनावश्यक खर्च यांचा सामना करावा लागतो. विशेषतः स्थावर मालमत्ता (Real Estate) किंवा इतर काही मालमत्तांमध्ये ही प्रक्रिया वेळखाऊ ठरू शकते ज्यात वेळ, ऊर्जा आणि मानसिक शांतता यांचा कस लागताना आपण पाहत असतो.
गुंतवणूक माध्यमांची या कसोटीवर तुलना केली असता म्युच्युअल फंडातील गुंतवणूक ही संपत्ती हस्तांतरणाच्या दृष्टीने अधिक सोपी, जलद आणि पारदर्शक ठरते.

म्युच्युअल फंडातील नामनिर्देशन
म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करताना गुंतवणूकदाराला एक किंवा अधिक नामनिर्देशित (Nominees) व्यक्ती नियुक्त करण्याची सुविधा उपलब्ध असते. यातील सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे प्रत्येक नामनिर्देशित व्यक्तीस नेमका किती टक्के (Percentage Share) हिस्सा द्यायचा हे स्पष्टपणे नमूद करता येते.
उदाहरणार्थ –
पत्नी – ५०%
मुलगी – ३०%
मुलगा– २०%
असे सुस्पष्ट नामनिर्देशन करणे याबाबत शक्य असते. अशा स्पष्ट वाटपामुळे भविष्यात कोणताही संभ्रम राहत नाही.
ताजे उदाहरण !
स्रोतात दिलेल्या linkedin पोस्टनुसार अलीकडेच रु. १०० कोटींच्या म्युच्युअल फंड गुंतवणुकीच्या Transmission प्रक्रियेबाबतचे उदाहरण ताजे आहे. या प्रक्रियेतील विशेष बाब म्हणजे प्रत्येक नामनिर्देशित व्यक्तीचा हिस्सा आधीच निश्चित टक्केवारीत नमूद करण्यात आला होता. त्यामुळे कोणताही वाद, संभ्रम किंवा निर्माण झाला नाही आणि संपूर्ण प्रक्रिया अत्यंत सुरळीतपणे पूर्ण झाली.
मजबूत नियामक व्यवस्था
भारतात म्युच्युअल फंड उद्योग SEBI (Securities and Exchange Board of India) आणि AMFI (Association of Mutual Funds in India) यांच्या नियामक चौकटीखाली कार्यरत आहे. गेल्या काही वर्षांत वारसांकडे (Transmission) गुंतवणूक हस्तांतरित करण्यासाठी प्रक्रिया अधिक प्रमाणित (Standardized) करण्यात आली आहे. तसेच डिपॉझिटरीज, RTAs आणि इतर संबंधित संस्थांकडून एकसमान कार्यपद्धती अवलंबली जात असल्यामुळे योग्य कागदपत्रांच्या आधारे हस्तांतरणाची प्रक्रिया अधिक कार्यक्षम आणि सुलभ झाली आहे. AMFI च्या अलीकडील मानक प्रक्रियांमुळे Nominee कडून कायदेशीर वारसांकडे युनिट्स हस्तांतरित करण्यासाठीही स्पष्ट मार्गदर्शक तत्त्वे उपलब्ध आहेत.
जर आपण म्युच्युअल फंडात गुंतवणूक केली असेल, तर स्वतःला हे प्रश्न विचारा—
- माझ्या सर्व फोलिओमध्ये Nomination केले आहे का?
- एकापेक्षा अधिक Nominees असल्यास त्यांची टक्केवारी स्पष्ट आहे का?
- कुटुंबातील बदलांनुसार Nomination अद्ययावत केले आहे का?
निष्कर्ष
संपत्ती निर्माण करणे महत्त्वाचे आहे; पण ती योग्य व्यक्तींपर्यंत योग्य वेळी आणि कमीतकमी अडचणींमध्ये पोहोचणेही महत्त्वाचे आहे. म्युच्युअल फंडातील योग्य Nomination आणि स्पष्ट Percentage Allocation हे Wealth Transmission अधिक सोपे, वेगवान आणि सुव्यवस्थित बनवणारे प्रभावी साधन आहे.
आजच आपल्या सर्व म्युच्युअल फंड गुंतवणुकीतील Nomination तपासा. कारण योग्य नियोजन म्हणजे आपल्या कुटुंबासाठी दिलेली खरी आर्थिक सुरक्षितता.

श्री.ऋषभ सोनावणे
75078 80008
–टीम SWS

संदर्भ (References)
