–
आज डिजिटल व्यवहारांचा वापर झपाट्याने वाढत आहे. त्याचबरोबर सायबर गुन्हेगारही नवनवीन मार्गांनी आर्थिक फसवणूक करत आहेत. आजकाल ‘घरबसल्या नोकरी’ किंवा ‘फक्त बँक खाते वापरा आणि पैसे कमवा’ अशा जाहिराती सोशल मीडिया आणि व्हॉट्सअँपवर सर्रास दिसतात. या मागे लपलेला धोका म्हणजे — ‘मनी म्यूल फसवणूक’. अनेक वेळा सामान्य नागरिकांना आपण गुन्हेगारांच्या साखळीचा भाग बनलो आहोत, याची कल्पनाही नसते.
या लेखात आपण मनी म्यूल म्हणजे नेमकं काय, फसवणुकीचा हा सापळा नक्की कसे काम करतो आणि यापासून स्वतःला सुरक्षित कसे ठेवायचे हे सोप्या भाषेत समजून घेऊया.

(Image source: Instagram Page: Reserve Bank of India)
मनी म्यूल म्हणजे काय?
मनी म्यूल म्हणजे अशी व्यक्ती जी नकळत किंवा जाणूनबुजून सायबर गुन्हेगारांनी फसवणुकीतून मिळवलेल्या पैशांची एका खात्यातून दुसऱ्या खात्यात ने-आण करते.
गुन्हेगार स्वतःच्या खात्यात पैसे न घेता इतरांच्या बँक खात्यांचा वापर करतात, त्यामुळे तपास यंत्रणांना मूळ गुन्हेगारांपर्यंत पोहोचणे कठीण होते.
मनी म्यूलची साखळी कशी काम करते?
१. आकर्षक आमिष :
सायबर गुन्हेगार सोशल मीडियावर किंवा मेसेजद्वारे अशा ऑफर्स देतात. उदारहणार्थ..
- “घरबसल्या पार्ट-टाईम जॉब”
- “फक्त पैसे ट्रान्सफर करा आणि कमिशन मिळवा”
- “तुमचे बँक खाते वापरू द्या, महिन्याला ₹१०,००० मिळवा”
२. तुमच्या खात्यात पैसे जमा होतात.
अनोळखी व्यक्तीकडून अचानक मोठी रक्कम तुमच्या खात्यात जमा होते.
३. पैसे पुढे पाठवण्यास सांगितले जाते.
तुम्हाला सांगितले जाते – “यातील ९०% रक्कम या खात्यावर किंवा UPI वर पाठवा. उरलेली रक्कम तुम्हाला कमिशन म्हणून मिळेल !”
४. पैशांचा मागोवा लपवला जातो.
अशा प्रकारे पैसे अनेक खात्यांमधून फिरवले जातात आणि शेवटी गुन्हेगारांपर्यंत पोहोचतात. त्यामुळे मूळ स्रोत शोधणे कठीण होते.
याचे गंभीर परिणाम
अशा प्रकारात सहभागी झाल्यास पुढील अडचणी उद्भवू शकतात. जसे की..
- कायद्याची कारवाई – मनी लॉन्डरिंग किंवा सायबर गुन्ह्यांशी संबंधित कायद्यांनुसार चौकशी व कारवाई होऊ शकते.
- बँक खाते गोठवले जाऊ शकते – व्यवहारांवर निर्बंध येऊ शकतात.
- आर्थिक विश्वासार्हतेवर परिणाम – भविष्यात कर्ज किंवा इतर बँकिंग सुविधांवर परिणाम होऊ शकतो.
- “मला माहिती नव्हते” हा बचाव नेहमीच पुरेसा ठरत नाही – संशयास्पद व्यवहारांची जबाबदारी खातेदारावरही येऊ शकते.
स्वतःचे संरक्षण कसे कराल?
✔ कोणत्याही अनोळखी व्यक्तीसाठी आपल्या खात्यात पैसे स्वीकारू नका.
✔ “फक्त पैसे ट्रान्सफर करण्याचे काम” अशा आकर्षक ऑफर्सपासून दूर राहा.
✔ आपल्या बँक खात्याची माहिती, ATM कार्ड, UPI PIN, OTP किंवा नेटबँकिंगची माहिती कोणालाही देऊ नका.
✔ चुकून अनोळखी रक्कम खात्यात आल्यास ती पुढे पाठवू नका. त्वरित आपल्या बँकेशी संपर्क साधा आणि आवश्यक असल्यास राष्ट्रीय सायबर हेल्पलाइन १९३० वर तक्रार नोंदवा.
थोड्याशा कमिशनच्या मोहापायी आपण नकळत आर्थिक गुन्ह्याचा भाग बनू शकतो. त्यामुळे कोणताही संशयास्पद आर्थिक व्यवहार करण्यापूर्वी त्याची खात्री करून घ्या.
SWS चा मित्रत्वाचा सल्ला:
आपले बँक खाते ही केवळ व्यवहाराची सुविधा नसून आपल्या आर्थिक ओळखीचा महत्त्वाचा भाग आहे. त्याचा वापर नेहमी स्वतःच्या आणि कायदेशीर व्यवहारांसाठीच करा. सुरक्षित आर्थिक व्यवहार हीच सर्वोत्तम आर्थिक सवय आहे.
आपल्याला किंवा आपल्या परिचितांना अशा प्रकारचा अनुभव आला आहे का? जागरूकता वाढवण्यासाठी हा लेख नक्की शेअर करा.

श्री. विवेक ओहोळ,
SWS पुणे शाखा.

