–

खेळाच्या मैदानात प्रतिस्पर्ध्याला धुळ चारणे सोपे असते, पण आयुष्याच्या मैदानात जेव्हा आपलाच माणूस पाठित खंजीर खुपसतो, तेव्हा सावरणे कठीण होते. अशीच एक धक्कादायक कहाणी सध्या समोर आली आहे. टेनिसप्रेमींना अरांत्सा सांचेझ विकारिओ हे नाव सुपरिचित असेल. ही स्पेनची माजी जागतिक क्रमांक १ टेनिसपटू आणि चार ग्रँड स्लॅम विजेती. तिने अलीकडेच आपल्या आर्थिक आयुष्याविषयी धक्कादायक अनुभव शेअर केला आहे. आपल्या खेळाच्या कारकिर्दीत तिने अंदाजे ६० दशलक्ष डॉलर्स (सुमारे रु. ५०० कोटींपेक्षा अधिक) संपत्ती कमावली होती. मात्र तिचे आर्थिक व्यवहार पूर्णपणे पतीवर..जोसेप सांताकानावर सोपवले आणि तिची जवळपास संपूर्ण संपत्ती हातातून गेली !! एकेकाळी टेनिस जगतावर राज्य करणाऱ्या आणि करोडोंची मालकीण असलेल्या या खेळाडूला आज आपल्याच चुकीमुळे आर्थिक दिवाळखोरीचा सामना करावा लागत आहे.
सांचेझने आपल्या सुवर्णकाळात टेनिसमधून शेकडो कोटींची संपत्ती कामवाली. तिचे आर्थिक व्यवहार जोसेप बघत होता. त्याच्यावर संपूर्ण (आंधळा ?) विश्वास ठेवल्याने तो तिच्या पैशांचे नक्की काय करतो आहे ? कुठे गुंतवणूक करतो आहे ? याविषयी तिने काहिही माहिती ठेवली नव्हती. हाच विश्वास तिच्या आयुष्यातील मोठी चूक ठरला. पती जोसेप यांनी तिच्या संपूर्ण संपत्तीचा गैरवापर केला आणि तिला कंगाल केले. त्याच्या व्यवहाराविषयी संशय येताच त्यांच्यात मालमत्ता, कर्ज आणि आर्थिक व्यवहारांशी संबंधित वाद निर्माण झाले. नंतर उघडकीस आले कि हा केवळ कौटुंबिक वाद राहिलेला नसून ‘बँक ऑफ लक्झेंबर्ग’चे कोट्यवधी रुपयांचे कर्ज बुडवण्यात त्याचे रूपांतर झाले आहे. या प्रकरणी अरांत्सा आणि जोसेपवर मालमत्ता लपवल्याचा आरोप होता. स्पॅनिश न्यायालयाने या प्रकरणी निकाल देताना जोसेपला ३ वर्षे ३ महिन्यांची तुरुंगवासाची शिक्षा तर अरांत्साला २ वर्षांची निलंबित (Suspended) शिक्षा झाली आहे. (पहिलाच गुन्हा असल्याने तिला थेट तुरुंगात जावे लागणार नाही). कर्जफेडीसाठी अरांत्साला तिच्या चालू कमाईतील ५०% हिस्सा बँकेला द्यावा लागत आहे.

या संपूर्ण अनुभवामुळे अरांत्साला मानसिक धक्काही बसला आणि त्यासाठी समुपदेशन (Therapy) घ्यावे लागल्याचे तिने सांगितले. आज ती अमेरिकेत टेनिस प्रशिक्षक म्हणून काम करत आहेत. ही ६०० कोटींची मालकीण आज उदरनिर्वाहासाठी आणि बँकेचे कर्ज फेडण्यासाठी संघर्ष करत आहे. पुन्हा आर्थिकदृष्ट्या उभे राहण्याचा प्रयत्न करत आहे.
या घटनेतून आपण काय शिकायला हवे ? (Takeaways)
१. आर्थिक साक्षरता महत्त्वाची: तुम्ही कितीही व्यस्त असाल, तरी स्वतःचे पैसे कुठे गुंतवले जात आहेत यावर लक्ष ठेवणे गरजेचे आहे .
२. आंधळा विश्वास घातक: नाती कितीही जवळची असली तरी आर्थिक व्यवहारात पारदर्शकता असणे गरजेचे आहे.
३. कायदेशीर ज्ञान गरजेचे: कुठेही स्वाक्षरी करण्यापूर्वी प्रत्येक दस्तऐवज स्वतः वाचने किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणे महत्वाचे आहे.
महिलांसाठी महत्वाचे …
अरांत्सा सांचेझची कहाणी प्रत्येक व्यक्तीसाठी आणि विशेषतः महिलांसाठी एक धोक्याची घंटा आहे. महिलांनी आर्थिक साक्षर होऊन स्वतःचे आर्थिक निर्णय स्वतः घेणे, बँक खाती सांभाळणे, गुंतवणुकीचे ज्ञान मिळवणे या सर्व बाबींवर काम करणे आवश्यक आहे. महिलांनी..
१) म्युच्युअल फंड, शेअर्स, बँक ठेवी, विमा, पीपीएफ, एनपीएस किंवा इतर गुंतवणुका कुठे आहेत, त्यांची कागदपत्रे कुठे आहेत आणि त्यांची सद्यस्थिती काय आहे, हे जाणून घ्यायला हवे.
२) कोणत्याही आर्थिक कागदपत्रावर, कर्जाच्या फॉर्मवर किंवा गुंतवणुकीच्या अर्जावर सही करण्यापूर्वी त्याचा उद्देश आणि परिणाम समजून घेणे गरजेचे आहे.
३) बँक खाते, नेटबँकिंग, UPI, डिमॅट खाते आणि ई-मेलवर येणारे आर्थिक मेसेज तपासण्याची सवय असणे आवश्यक आहे.
४) कुटुंबातील सर्व गुंतवणुकांमध्ये योग्य नामनिर्देशन आहे का याची पडताळणी करणे महत्वाचे आहे.
५) महिन्यातून किमान एकदा कुटुंबातील आर्थिक नियोजन, खर्च, बचत आणि गुंतवणुकीवर चर्चा घडवून आणणे, त्यात आपण सहभागी होणे तसेच मुलांना सहभागी करून घेणे गरजेचे आहे. आर्थिक निर्णय हा फक्त एका व्यक्तीचा विषय नसून संपूर्ण कुटुंबाच्या भविव्यासाठी महत्वाचा विषय आहे हे समजावून घेऊन आर्थिक साक्षर होणे गरजेचे आहे.
टीप: या प्रकरणात संबंधित व्यक्तींची बाजू, न्यायालयीन प्रक्रिया आणि आरोप-प्रत्यारोप यांचे विविध पैलू आहेत. त्यामुळे हा प्रसंग अंतिम निष्कर्ष म्हणून नव्हे, तर आर्थिक नियोजन, आर्थिक साक्षरता आणि योग्य आर्थिक मार्गदर्शनाचे महत्त्व अधोरेखित करणारा एक धडा म्हणून पाहणे अधिक योग्य ठरेल.

श्री. विक्रांत राठोड
75078 84477
–टीम SWS

Sources :
