–
सध्या सायबर गुन्हेगार कोणतीही चर्चेतील घटना किंवा चालू सरकारी मोहीम यांच्या माध्यमातून इतरांच्या आर्थिक फसवणुकीसाठी प्रयत्नशील असतात. भारत निवडणूक आयोग (Election Commission of India) वेळोवेळी मतदार यादी अधिक अचूक, अद्ययावत आणि पारदर्शक करण्यासाठी Special Intensive Revision (SIR) मोहीम राबवत असते. या प्रक्रियेत Booth Level Officer (BLO) मतदारांची माहिती पडताळतो आणि आवश्यक फॉर्म भरून घेतो. परंतु याच प्रक्रियेचा गैरफायदा आता सायबर गुन्हेगार घेत आहेत. निवडणूक अधिकारी असल्याचे भासवून लोकांची आर्थिक फसवणूक केली जात आहे.

🚩 स्कॅमर्स (सायबर चोर) कशी फसवणूक करतात?
१) अधिकारी असल्याचे भासवणे: सायबर चोर तुम्हाला फोन किंवा व्हॉट्सॲप (WhatsApp) वर संपर्क करतात. आपण बूथ लेव्हल ऑफिसर (BLO) किंवा निवडणूक पडताळणी अधिकारी असल्याचे सांगतात.
२) नाव वगळण्याची धमकी दिली जाणे: ‘तुमचे नाव मतदार यादीतून बाद केले जाईल’ किंवा ‘फॉर्म अपूर्ण आहे’, अशी भीती दाखवून ते तुम्हाला घाईगडबडीत निर्णय घेण्यास भाग पाडतात.
३) Malicious APK फाईल पाठवणे: डिजिटल मतदार पावती किंवा केवायसी (KYC) अपडेटच्या नावाखाली ते व्हॉट्सॲपवर SIR.apk नावाची फाईल पाठवतात आणि ती इन्स्टॉल करायला सांगतात.
४) ओटीपी (OTP) ची मागणी करणे: प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी तुमच्या मोबाईलवर आलेला ओटीपी मागितला जातो.
⚠️ SIR.apk फाईल डाऊनलोड केल्यास काय होते?
जर तुम्ही ती .apk फाईल मोबाईलमध्ये इन्स्टॉल केली, तर हॅकर्सना तुमच्या फोनचा पूर्ण ॲक्सेस मिळतो. याद्वारे ते तुमचे बँक मेसेज, वैयक्तिक फोटो आणि पासवर्ड चोरून बँक खाते काही मिनिटांत रिकामे करू शकतात.
🛡️ स्वतःचा बचाव कसा करावा?
१) ओटीपी (OTP) कधीही शेअर करू नका: कोणतीही सरकारी संस्था किंवा निवडणूक अधिकारी फोनवर कधीही ओटीपी मागत नाहीत.
२) अनोळखी फाईल्स डाऊनलोड करू नका: व्हॉट्सॲप किंवा एसएमएस (SMS) द्वारे आलेल्या कोणत्याही लिंकवरून SIR.apk किंवा इतर कोणतीही फाईल डाऊनलोड करू नका. निवडणूक आयोग कधीही व्हॉट्सॲपवर ॲप्स पाठवत नाही.
३) स्थानिक पातळीवर पडताळणी करा: मतदार यादीत नाव तपासण्यासाठी किंवा सुधारणा करण्यासाठी अधिकृत राष्ट्रीय मतदार सेवा पोर्टल (NVSP) ला भेट द्या किंवा तुमच्या भागातील अधिकृत बीएलओ (BLO) कडे प्रत्यक्ष चौकशी करा. eci.gov.in किंवा voters.eci.gov.in यांसारख्या अधिकृत संकेतस्थळांशिवाय इतर लिंकवर विश्वास ठेवू नका.
🚨 फसवणूक झाल्यास त्वरित काय करावे?
१. सायबर हेल्पलाइनवर कॉल करा: त्वरित १९३० या राष्ट्रीय सायबर क्राईम हेल्पलाइन नंबरवर कॉल करा.
२. ऑनलाईन तक्रार नोंदवा: www.cybercrime.gov.in या अधिकृत वेबसाईटवर जाऊन तुमची तक्रार नोंदवा.
३. बँकेशी संपर्क साधा: जर तुम्ही बँक तपशील शेअर केले असतील किंवा फोनमध्ये ॲप इन्स्टॉल केले असेल, तर लगेच बँकेला फोन करून तुमचे बँक खाते आणि यूपीआय (UPI) ब्लॉक करा.
सायबर गुन्हेगार सतत नवीन मार्ग शोधत असतात. त्यामुळे जागरूकता हीच सर्वोत्तम सुरक्षा आहे. सरकारी प्रक्रियेच्या नावाखाली येणारा प्रत्येक फोन, प्रत्येक लिंक आणि प्रत्येक संदेश खरा असेलच असे नाही.
थोडी पडताळणी…
थोडी सावधगिरी…
आणि योग्य वेळी घेतलेला निर्णय…यामुळे तुमची ओळख, तुमचा डेटा आणि तुमची रक्कम/ माहिती सुरक्षितराहू शकते.

श्री. रवींद्र जाधव,
92251 35875
–टीम SWS

