Money चे अंतरंग

Financial Literacy Initiative by SWS


Psychology of Investors : Analysis Paralysis Bias !

गुंतवणूकदारांचे मानसशास्त्र: भाग ७
बहु हिंडता सौख्य होणार नाही !!

प्राची देशमुख ,
अर्थ साक्षरता कार्यकर्त्या आणि प्रशिक्षक , अल्पारंभा फाऊंडेशन,
संचालिका , Medhavyn Technologies

ऑनलाइन एंटरटेनमेंटच्या या जगात जेव्हा आपण करमणुकीसाठी ओटीपी प्लॅटफॉर्मचा वापर करतो तेव्हा उपलब्ध असलेले अनेक चॅनेल्स आणि त्यावरच्या अनेक मुव्हीज किंवा वेब सिरीज यापैकी कुठली निवडावी याच्या गोंधळात पडतो. मग कमी असलेल्या वेळेचा चांगला वापर व्हावा यासाठी उत्तम पर्याय निवडण्याच्या प्रक्रियेला सुरुवात होते आणि आपण उपलब्ध पर्यायांचे ट्रेलर्स बघत बसतो. या बहुपर्यायातून निवड न करता आल्याने शेवटी हाताशी असलेला वेळही घालवून बसतो ! तुमच्या बाबतीत असे झाले आहे का ? मग हा आहे एनालिसिस पॅरलेसिस !!


एखादी व्यक्ती जेव्हा एखाद्या समस्येवर गोष्टीवर किंवा परिस्थितीवर जास्त विचार करते तेव्हा त्या बाबीवर उपाययोजना म्हणून तिच्याकडे खूप सारे पर्याय उपलब्ध होतात. असा खूप डेटा समोर असल्यावर गोंधळून जाणे आणि शेवटी कुठलाच पर्याय निवडता न येणे म्हणजेच ऍनॅलिसीस पॅरालिसिस ! या प्रक्रियेचा उगम जरी सर्वोत्तम पर्याय शोधणे या मानसिकतेतून होत असला तरीही शेवट मात्र कोणताही ठोस निर्णय घेण्याची असमर्थता असाच होतो ! गोंधळून गेलेल्या मनाची अवस्था शेवटी “बघू नंतर याकडे” अशी होते आणि म्हणून निर्णय घेण्याऐवजी मनुष्य निर्णयाची चालढकल करत रहातो ! समस्येवर किंवा परिस्थितीवर चांगले विश्लेषण करणे केव्हाही चांगलेच असते. परंतु ‘विश्लेषणच चालले आहे आणि म्हणून निर्णयच होत नाही’ अशी परिस्थिती आपली होत असेल तर महत्वाची आणि त्यावेळेस होणे गरजेची असणारी कामे पुढे ढकलली जातात आणि त्याचा परिमाण आपल्या मनावर, कार्यालयीन किंवा वैयक्तिक जीवनशैलीवर पडतो ! आर्थिक निर्णय घेतांना जर या ऍनॅलिसीस पॅरालिसिसने डोके वर काढले तर मात्र त्याचे परिणाम मारक अथवा घातकही ठरू शकतात. समजावून घेण्यासाठी काही उदाहरणांची मदत घेवुयात.

उदाहरण १: श्री. महेश यांना आपल्या परिवारासाठी आरोग्य विमा अर्थात मेडिक्लेम पॉलिसी घ्यायची होती. त्यांनी आपल्या आर्थिक सल्लागाराला गाठले असता या सल्लागारांने त्यांना काही उत्तम पर्याय सुचवले. त्याच दिवशी श्री. महेश यांनी वेगवेगळ्या विमा पॉलिसींच्या वेबसाईटचा अभ्यास करून वेगवेगळ्या सुविधा देणाऱ्या पॉलिसीजचा डेटा कागदावर उतरवला. तरीसुद्धा नक्की कुठली पॉलिसी काढावी या निर्णयाप्रत ते पोहोचू शकले नाहीत. आपला निर्णय अधिक चांगला व्हावा यासाठी त्यांनी चार मित्रांचाही सल्ला घेतला. नातेवाईक असणाऱ्या एका विमा एजंटनेही त्यांना दोन-चार पर्याय सुचवले. वेगवेगळ्या सुविधा असणाऱ्या इतक्या सगळ्या पॉलिसींचा अभ्यास करता करता श्री महेश यांनी ती विमा पॉलिसी काढण्यासाठी दोन महिन्यांचा कालावधी घेतला. परंतु ही प्रक्रिया जेव्हा सुरू झाली होती तेव्हापासून महिन्याभराच्या आतच त्यांच्या मुलीचे आजारपण उद्भवले आणि तिचे दोन-तीन दिवसांचे हॉस्पिटलिझेशनही करावे लागले. तेव्हा वेळेत मेडिक्लेम पॉलिसी न घेतल्या बद्दल श्री. महेश यांना पश्चाताप झाला ! आजारपणाचा सर्व खर्च त्यांना आपल्या बचत खात्यातून करावा लागला.

उदाहरण २: करोना कालावधीत, या महामारीच्या भयाच्या सावटाखाली शेअर बाजार निर्देशांक खूप खाली आला होता. तेव्हा श्री. रमेश यांनी आपली मोठी गुंतवणूक म्युच्युअल फंड्स मध्ये करण्याचे ठरवले. त्यांच्या गुंतवणूक सल्लागाराने त्यांना त्वरित त्यांच्या जोखीम घेण्याच्या क्षमतेला अनुसरून काही चांगले पर्यायही सुचवले. परंतु अधिक चांगले रिटर्न्स मिळावे या अपेक्षेने श्री. रमेश यांनी म्युच्युअल फंड्स व्यतिरिक्त रिअल इस्टेटशी निगडित अजून काही प्रोजेक्ट्सचा अभ्यास करायला सुरुवात केली . या प्रोजेक्ट्सशी निगडित कायदेशीर बाबी, कागदपत्रे इत्यादींचे विश्लेषण करण्याच्या प्रक्रियेत त्यांनी जवळपास तीन महिन्यांचा कालावधी घेतला. परंतु तेवढ्या कालावधीत करोना महामारीवर लस उपलब्ध झाल्याने शेअर बाजाराने अभूतपूर्व उसळी अनुभवली. वेळेवर आपली गुंतवणूक न करणाऱ्या श्री रमेश यांना बाजारातील या चढत्या आलेखाचा फायदा घेता आला नाही. गुंतवणूक रक्कम बचत खात्यात पडून राहिली आणि आर्थिक नुकसान ओढवले गेले.


हा बायस टाळण्यासाठी किंवा त्याचे परिणाम कमी करण्यासाठी आपण पुढील ही काही गोष्टी करू शकतो

या दोन्ही उदाहरणांवरून हे स्पष्ट होते की जेव्हा आपण योग्य निर्णय घेण्याच्या प्रक्रियेत बहुपर्यायांचा विचार करत असतो तेव्हा तात्पुरती सुविधा म्हणून का होईना त्या क्षणी ,त्यातल्या त्यात चांगल्या पर्यायाचा स्वीकार करणे केव्हाही चांगले. याचा फायदा असा होतो की अधिक चांगला पर्याय मिळेपर्यंत आपले आर्थिक नुकसान टाळले जाते अथवा कमी होते.

१) उद्दिष्टांबाबत स्पष्टता असणे: जेव्हा आपल्याला, एखाद्या निर्णयामागे स्वतःला अपेक्षित परिणाम काय आहे याबाबत पुरेशी स्पष्टता असते त्यावेळी निर्णय घेण्याची प्रक्रिया जलद व सुलभ होते.
२) छोटी सुरुवात करणे: असे म्हणतात ‘अल्पारंभ: क्षेमकर:’ ! म्हणजे काहीच सुचत नसेल तेव्हा ध्येयाच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर लहान पावले टाकायला सुरुवात करणे. या प्रयत्नात यथावकाश आपल्याला अधिक चांगल्या कल्पना, मार्गदर्शन, वाटा मिळत जातात आणि उपलब्ध वेळेचा, साधन संपत्तीचा उपयोग व्हायला सुरुवात होते.
३) व्यावसायिक तज्ञांचा सल्ला घेणे: जेव्हा आपला गोंधळ उडतो तेव्हा आपण सारे अर्जुन होतो ! अशावेळी श्रीकृष्णासारख्या अनुभवी सारथ्याची अर्थात सल्लागाराची मदत घेणे केव्हाही चांगले.
४) डायव्हर्सिफिकेशन अर्थात विविधता देणाऱ्या पर्यायाची निवड करणे: बहू पर्याय उपलब्ध असताना डायव्हर्सिफिकेशनच्या दृष्टिकोनातून नवीन पर्याय निवडणे केव्हाही चांगले. याचा उपयोग आधी असलेल्या पर्यायांपेक्षा वेगळा दृष्टिकोन मिळण्यात आणि आर्थिक जोखीम कमी करण्यासाठी होतो.

अनालिसिस पॅरॅलिसिस मुळे जर या निर्णयाची चालढकल करत बसलो तर मात्र आर्थिक नुकसान ओढविले जाते आणि म्हणूनच हा बायस टाळण्यासाठी आपण महत्त्वाच्या क्षणी सर्वोत्तम असलेला निर्णय वेळेवर घेणे महत्त्वाचे !तेव्हा “बहु हिंडता सौख्य होणार नाही”, हे रामदासांचे वचन ध्यानी धरून ‘एनालिसिस पॅरलिसीस’ वर मात करूयात.

– अनुभव कथन : प्राची देशमुख ,
अर्थ साक्षरता कार्यकर्त्या आणि प्रशिक्षक , अल्पारंभा फाऊंडेशन,
संचालिका , Medhavyn Technologies.

– शब्दांकन : डॉ. रुपाली कुलकर्णी , ट्रेनिंग हेड , SWS


Discover more from Money चे अंतरंग

Subscribe to get the latest posts sent to your email.



Subscribe Here

About Us

Welcome to SWS Fintech Services Pvt. Ltd. – Your Trusted Partner in Financial Well-being!

Established in 1995, SWS has been committed to empowering individuals, families, and businesses through sound investment services. With over three decades of experience, our team of qualified financial professionals brings together expertise in investment services.

At SWS, we believe that financial success is built on informed decisions, disciplined investing, and long-term relationships. Our goal is to simplify financial complexities, enhance financial literacy, and help our clients confidently pursue their financial aspirations.

Through this blog, we share insights, practical tips, and perspectives to help you make informed financial decisions.

Explore more about us at: https://www.swsfspl.com/

SWS Fintech Services Pvt Ltd
AMFI Registered Mutual Fund Distributor- ARN- 90746
ARN Renewal Date- 25th July 2028
APMI Registered Distributor- APRN01157
APRN Renewal Date- 11th Jan 2029

Discover more from Money चे अंतरंग

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading