–
आपण आज Software as a Service (SaaS) या संकल्पनेशी परिचित आहोत. Gmail, Microsoft 365, Zoom, Canva, ChatGPT, Tally on Cloud यांसारख्या सेवांसाठी (Services) आपण सदस्यत्व (Subscription) घेतो आणि इंटरनेटद्वारे त्या वापरतो यालाच Software as a Service (SaaS) असे म्हणतात. यामुळे व्यावसायिक सेवा आपल्याला स्वतःला बनवाव्या (Develop) लागत नाहीत तर उपलब्ध सेवा हव्या तशा/ हव्या तेव्हा / हवे तितकेच पैसे भरून वापरता येतात आणि आपले काम सोपे होते. थोडक्यात ‘Software as a Service (SaaS)’ सारख्या सेवा ग्राहकांचे जीवन सुलभ करण्यासाठी निर्माण झाल्या.
त्याच धर्तीवर सायबर गुन्हेगारांनी Fraud as a Service (FaaS) ही यंत्रणा तयार केली आहे. म्हणजेच इतरांची आर्थिक फसवणूकही ही आता ‘व्यवसाय’ म्हणून विकली जात आहे! ही गुन्हेगारी मानसिकतेची पराकाष्ठाच म्हणावी लागेल.

पूर्वी सायबर फसवणूक करण्यासाठी तांत्रिक ज्ञान, संगणक कौशल्य आणि मोठी तयारी लागायची. पण आता परिस्थिती बदलली आहे. आज “Fraud as a Service (FaaS)” या नव्या मॉडेलमुळे अगदी कमी तांत्रिक ज्ञान असलेली व्यक्तीसुद्धा पैसे देऊन “तयार आणि परीक्षण झालेली” (Tried & Tested) सायबर फसवणूक साधने वापरू शकते. Fraud as a Service (FaaS) म्हणजे सायबर गुन्हेगारांद्वारे भाड्याने किंवा सबस्क्रिप्शनवर उपलब्ध करून दिले जाणारे फसवणुकीचे प्लॅटफॉर्म ! याद्वारे तांत्रिक ज्ञान नसलेले लोकही सहजपणे ऑनलाइन घोटाळे घडवून आणू शकतात.
Fraud as a Service (FaaS) म्हणजे नेमके काय?
FaaS मुळे गुन्हेगारी जगतात एक नवीन बाजारपेठ तयार झाली आहे. यात बनावट वेबसाइट्स (Fake Banking Websites), फिशिंग किट्स, आणि मालवेअर अगदी भाड्याने मिळतात. अशी टूल्स वापरून वापरकर्ता कोणतीही खाजगी माहिती किंवा पैसे उकळण्यासाठी आवश्यक यंत्रणा विकत घेतो आणि इतरांची सायबर फसवणूक करतो. अशा अद्यायावत टूल्समुळे नवशिक्या चोरांनाही मोठे गुन्हे करणे सोपे जाते. एकाच वेळी हजारो लोकांना टार्गेट करणे, विविध भाषांमध्ये फेक इमेल्स पाठवणे इ. सारखी कामे यात तयार केलेल्या सॉफ्टवेअर या प्रणालीद्वारे केली जातात. म्हणजेच, फसवणूक करण्यासाठी आता गुन्हेगाराला स्वतः तज्ज्ञ असण्याची गरज उरलेली नाही ! FaaS द्वारे उपलब्ध असलेल्या अशा साधनांसाठी पैसे भरून ती या नवशिक्या गुन्हेगाराला वापरता येणे शक्य झाले आहे.

Picture Source : Dibyamarathi, 29 July 2026
FaaS चे ‘कार्य’ ?
डार्क वेब किंवा टेलिग्रामसारख्या माध्यमांवर तयार फसवणूक किट्स विकल्या जातात. यात ग्राहकाची माहिती, मोबाईल नंबर, ई-मेल यांची यादी उपलब्ध करून दिली जाते. AI च्या मदतीने व्यक्तीनुसार संदेश, ई-मेल किंवा फोन कॉल तयार केले जातात आणि फसवणुकीतून मिळालेल्या रकमेतील ठराविक हिस्सा सेवा पुरवठादाराला दिला जातो.

गांभीर्य ! सायबर फसवणुकीमागे आणखी एक भीषण वास्तव… “सायबर गुलामगिरी”
आज जगभरात उघडकीस येत असलेल्या तपासांमधून एक धक्कादायक वास्तव समोर आले आहे. म्यानमार, कंबोडिया, लाओस आणि आग्नेय आशियातील काही भागांमध्ये मोठमोठी “Scam Compounds” किंवा सायबर फसवणूक केंद्रे उभारली गेली आहेत. येथे हजारो लोकांना खोट्या परदेशी नोकरीच्या आमिषाने बोलावले जाते. त्यांचे पासपोर्ट जप्त केले जातात आणि त्यांना ऑनलाइन फसवणूक करण्यास भाग पाडले जाते. तेथे त्यांनी फसवणूक करण्यास नकार दिल्यास किंवा ठरवलेले लक्ष्य पूर्ण न केल्यास त्यांना मारहाण, विद्युत धक्के, उपाशी ठेवणे, बंदिस्त ठेवणे, छळ आणि इतर अमानुष अत्याचार सहन करावे लागतात. काही अहवालांमध्ये लैंगिक अत्याचार आणि मृत्यूंच्याही घटना नोंदविल्या गेल्या आहेत. अलीकडील उपग्रह छायाचित्रे दर्शवितात की अशा फसवणूक केंद्रांची संख्या कमी होण्याऐवजी काही भागांत सतत वाढत आहे, आणि कारवाईनंतरही अनेक केंद्रे दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरित होऊन पुन्हा सुरू होत आहेत अशा ठिकाणी आणि इतरत्रही FaaS नक्कीच वापरले जात आहेत !
तात्पर्य
सायबर फसवणूक आता केवळ तांत्रिक गुन्हा राहिलेली नाही तर ती “सेवा म्हणून उपलब्ध” झालेली एक संघटित उद्योगव्यवस्था बनत आहे. त्यामुळे तंत्रज्ञान जितके वेगाने बदलत आहे, तितकेच आपले डिजिटल साक्षरता, जागरूकता आणि सतर्कता वाढवणे आवश्यक आहे. खरे तर तंत्रज्ञान हे स्वतः चांगले किंवा वाईट नसतेच. त्याचा वापर करणाऱ्या व्यक्तीची मानसिकता त्याला चांगली अथवा वाईट दिशा देत असते. त्यामुळे सायबर गुन्हेगार जितके तंत्रज्ञानाचा गैरवापर करत आहेत, तितकेच आपण डिजिटल साक्षरता, सतर्कता आणि विवेक यांची जोपासना करणे आवश्यक आहे.

श्री. उपेंद्र वाघ, टीम SWS
संपर्क: 75078 82266

