–
आज एका ग्राहकाशी इच्छापत्र तयार करण्याविषयी सविस्तर चर्चा झाली. चर्चेदरम्यान सहजच एक प्रश्न मनात आला – “जगातील पहिले इच्छापत्र कोणी लिहिले असेल?” उत्सुकतेपोटी आंतरजालावर थोडी शोधाशोध केली आणि आश्चर्यचकित करणारी माहिती समोर आली. हजारो वर्षांपूर्वीच्या संस्कृतींमध्येही लोकांनी आपल्या पश्चात कुटुंबाची, संपत्तीची आणि वारसांची व्यवस्था करण्यासाठी इच्छापत्राचा आधार घेतला होता.
ही माहिती वाचताना आणखी एक गंमत वाटली. आजच्या आधुनिक युगात, आर्थिक साक्षरता वाढली असली, गुंतवणुकीचे पर्याय वाढले असले आणि संपत्तीचे स्वरूप अधिक गुंतागुंतीचे झाले असले, तरीही अनेक लोक इच्छापत्र तयार करण्याबाबत उदासीन दिसून येतात. अशा परिस्थितीत तीन हजार वर्षांपूर्वीच्या लोकांनी इच्छापत्राचे महत्त्व ओळखले होते, ही बाब विशेष विचार करायला लावणारी वाटली. म्हणूनच या शोधयात्रेतून समोर आलेली काही रंजक आणि प्रेरणादायी माहिती तुम्हा वाचकांसोबत शेअर करावी असे वाटले आणि हा छोटासा लेखनप्रपंच.

सुरुवातीला असे आढळले की जगातील सर्वात जुने पूर्ण स्वरूपात उपलब्ध असलेले इच्छापत्र प्राचीन इजिप्तमधील एका स्त्रीचे होते. तिचे नाव होते नाउनाख्टे (Naunakhte). सुमारे इ.स.पूर्व ११४५ मध्ये तिने आपल्या मुलांमध्ये मालमत्तेचे विभाजन केले होते. तिच्या वृद्धापकाळात ज्यांनी तिची सेवा केली, त्यांना तिने संपत्ती दिली आणि ज्यांनी दुर्लक्ष केले त्यांना तिने आपल्या वारशातून वगळले. तीन हजार वर्षांपूर्वीच्या या दस्तऐवजात मानवी भावना, कर्तव्य आणि न्याय यांचे सुंदर मिश्रण दिसून येते.
या शोधाने प्रेरित होऊन पुढे आणखी एक प्रश्न समोर आला – “जगातील महान तत्त्वज्ञ अरिस्टॉटलनेही इच्छापत्र लिहिले होते का?”
संशोधनात आश्चर्यकारक उत्तर मिळाले – होय, अरिस्टॉटलने इ.स.पूर्व ३२२ मध्ये आपले इच्छापत्र लिहिले होते. मूळ प्रत आज उपलब्ध नसली तरी त्याचा मजकूर प्राचीन लेखक डायोजिनीस लाएरटियस यांच्या लिखाणातून जतन झाला आहे.अरिस्टॉटलच्या इच्छापत्रात केवळ संपत्तीचे वाटप नव्हते. त्यात त्याने आपल्या मुलांच्या संगोपनाची व्यवस्था केली होती, पत्नीच्या स्मृतींचा सन्मान करण्याची इच्छा व्यक्त केली होती, सहचारिणी हर्पिलिसच्या भविष्याची काळजी घेतली होती आणि काही गुलामांना स्वातंत्र्य देण्याच्या सूचना दिल्या होत्या. एक महान तत्त्वज्ञ आपल्या कुटुंबाबद्दल, सेवकांबद्दल आणि सामाजिक जबाबदाऱ्यांबद्दल किती संवेदनशील होता याचे हे सुंदर उदाहरण आहे.
यानंतर प्रश्न निर्माण झाला – “अरिस्टॉटलच्या इच्छापत्राची प्रत आज उपलब्ध आहे का?”
शोध केल्यानंतर असे समजले की अरिस्टॉटलची स्वतःच्या हस्ताक्षरातील मूळ प्रत काळाच्या ओघात नष्ट झाली. मात्र त्याच्या इच्छापत्राचा मजकूर अनेक प्राचीन आणि मध्ययुगीन हस्तलिखितांमधून पुढे आला आणि आज डिजिटल स्वरूपातही अभ्यासकांना उपलब्ध आहे. त्यामुळे दोन हजार वर्षांहून अधिक काळ लोटल्यानंतरही त्याच्या विचारांचा वारसा जिवंत राहिला आहे.
इतिहासातील या प्रवासातून एक महत्त्वाची जाणीव होते. प्राचीन इजिप्तमधील एक सामान्य स्त्री असो किंवा जगप्रसिद्ध तत्त्वज्ञ अरिस्टॉटल असो – दोघांनीही आपल्या पश्चात कुटुंबात वाद निर्माण होऊ नयेत, आपली इच्छा स्पष्टपणे व्यक्त व्हावी आणि प्रिय व्यक्तींचे संरक्षण व्हावे यासाठी इच्छापत्राचा आधार घेतला.
‘भारतातील पहिले इच्छापत्र कोणी तयार केले?’ याचे निश्चित उत्तर उपलब्ध नाही. मात्र विशेष म्हणजे, कौटिल्याच्या अर्थशास्त्रात (इ.स.पूर्व ३०० च्या आसपास) संपत्ती, वारसा आणि उत्तराधिकार यांचे नियम सापडतात. त्यामुळे भारतात इच्छापत्रासारख्या संकल्पनांचा विचार किमान २३०० वर्षांपूर्वी तरी अस्तित्वात होता, असे म्हणता येईल. भारतात प्राचीन काळापासून वारसा, संपत्तीचे विभाजन आणि उत्तराधिकार याविषयी नियम होते. मनुस्मृती, याज्ञवल्क्य स्मृती, नारद स्मृती यांसारख्या धर्मशास्त्रांमध्ये वारसाहक्काचे उल्लेख आढळतात.
आपल्या भारतीय संस्कृतीत संपत्ती / वारसा / उत्तराधिकारी या संदर्भात नियम आढळतात आणि संयुक्त कुटुंब व्यवस्थेमुळे इच्छापत्र बनवण्याची वेळ भारतातील कुटुंबावर आली नसावी असे वाटते . ब्रिटिश आल्यानंतरच याचा कायद्याच्या दृष्टीने विचार झाला असावा असे वाटते. ब्रिटिश राजवटीच्या काळात इंग्रजी कायद्याच्या प्रभावामुळे आधुनिक इच्छापत्राची संकल्पना अधिक प्रचलित झाली. Indian Succession Act, 1865 आणि नंतर Indian Succession Act, 1925 मुळे इच्छापत्राला स्पष्ट कायदेशीर चौकट मिळाली.
आजच्या आधुनिक जगात परिस्थिती अधिक गुंतागुंतीची झाली आहे. बँक खाती, शेअर्स, म्युच्युअल फंड, विमा पॉलिसी, स्थावर मालमत्ता, डिजिटल मालमत्ता, व्यवसायातील भागीदारी आणि बौद्धिक संपदा यांसारख्या अनेक गोष्टी व्यक्तीच्या नावावर असतात. जर योग्य इच्छापत्र नसेल, तर वारसांमध्ये गैरसमज, न्यायालयीन वाद आणि आर्थिक अडचणी निर्माण होऊ शकतात.
म्हणूनच इच्छापत्र हे केवळ संपत्ती वाटपाचे साधन नसून, कुटुंबासाठी दिलेली शेवटची जबाबदार भेट आहे. ते आपल्या इच्छेला कायदेशीर स्वरूप देते, वारसांचे संरक्षण करते आणि कुटुंबातील सौहार्द टिकवून ठेवते.
आज सर्व वाचकांना हे सांगावेसे वाटते की..
‘संपत्ती निर्माण करणे महत्त्वाचे आहे; परंतु त्या संपत्तीचा योग्य आणि शांततापूर्ण वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी स्पष्ट, अद्ययावत आणि कायदेशीरदृष्ट्या वैध इच्छापत्र तयार करणेही तितकेच महत्त्वाचे आहे.’ कारण व्यक्ती निघून जाते, पण तिचे निर्णय आणि मूल्ये इच्छापत्राच्या माध्यमातून पुढील पिढ्यांना मार्गदर्शन करत राहतात.

श्री. रघुवीर अधिकारी, 9822000883
टीम SWS.

