Money चे अंतरंग

Financial Literacy Initiative by SWS


आर्थिक निर्णय घेतांना भावना जरा बाजूला ठेवा !!

=

मी गेली तीस वर्षे वित्तीय सेवा क्षेत्रात काम करत आहे. या दीर्घ प्रवासात मला एक गोष्ट वारंवार अनुभवायला मिळाली आहे — आर्थिक निर्णय हे नेहमी तर्कशुद्ध असतातच असे नाही. अनेकदा हे निर्णय मनातील विविध भावना जसे राग, नाराजी, अहंकार, भिती किंवा अपूर्ण माहिती यांच्या प्रभावाखाली घेतले जातात. Behavioral Finance ही शाखा नेमकी याच मानवी मानसिकतेचा अभ्यास करते.

अलीकडेच आलेला एक प्रसंग याचे उत्तम उदाहरण आहे.

एका ग्राहकाने त्याच्या गाडीचा इन्शुरंस रिन्यू (नूतनीकरण)करायला स्पष्ट नकार दिला. ही बाब थोडी गंभीर वाटल्याने ते प्रकरण माझ्याकडे आले. इन्शुरंस रिन्यू न करणे म्हणजे भविष्यातील मोठ्या आर्थिक धोक्याला आमंत्रण देणे असते. तेव्हा नेमके कारण समजून घेण्यासाठी मी त्या ग्राहकाला फोन केला. ग्राहक फार नाराज होता. त्याने सांगितले की सहा महिन्यांपूर्वी त्याचा अपघात झाला होता, पण इन्शुरंस कंपनीने क्लेम दिला नाही. मी कारण विचारले असता तो म्हणाला,“अपघाताच्या वेळी माझ्याकडे ड्रायव्हिंग लायसन्स नव्हते म्हणून क्लेम नाकारला गेला. याचा मला खूप राग आला आहे. त्यामुळे आता मी इन्शुरंस रिन्यूवल करणार नाही.”

इथेच ग्राहकाच्या निर्णयामागील मानसिकता स्पष्ट दिसते. आपल्याला एखादी गोष्ट अन्यायकारक वाटली की लगेच राग येतो. त्या रागाच्या भरात आपण पुढचा निर्णय घेतो. पण असा निर्णय बहुतेक वेळा आपल्या स्वतःच्या हिताविरुद्ध जातो. Behavioral Finance मध्ये याला Emotional Decision Making असे म्हणतात. क्लेम मिळाला नाही म्हणून इन्शुरंस घेणे बंद करणे हा निर्णय रागातून घेतलेला होता. एका नुकसानामुळे भविष्यातील अधिक मोठा धोका आपण दुर्लक्षित करतो.

मी ग्राहकाला शांतपणे समजावून सांगितले की ड्रायव्हिंग लायसन्सशिवाय गाडी चालवणे हा नियमभंग तर आहेच शिवाय तो कायदेशीर गुन्हाही आहे. नियम तोडल्यामुळे क्लेम नाकारला गेला, यात इन्शुरंस कंपनीची चूक नाही. नियम मोडूनसुद्धा संरक्षण मिळेल अशी अपेक्षा ठेवणे चुकीचे आहे.

अनेक लोकांच्या मनात एक गैरसमज असतो —“मी इन्शुरंससाठी प्रीमियम भरतो, म्हणजे मला क्लेम मिळायलाच हवा.” प्रत्यक्षात इन्शुरंस हा नियमांवर आधारित करार असतो, भावनांवर नाही. यालाच Entitlement Bias असे म्हणतात.

मी त्यांना पुढे हेही सांगितले की गाडीचे इन्शुरंस हे फक्त त्या व्यक्तीसाठी नसून त्या वाहनासाठी ही असते. आज तुम्ही गाडी चालवत नसाल, उद्या तुमचा मुलगा, मित्र किंवा चालक गाडी चालवू शकतो—ज्याच्याकडे ड्रायव्हिंग लायसन्स आहे. अशा वेळी इन्शुरंस नसल्यास अपघात झाला तर आर्थिक नुकसान प्रचंड असू शकते.

इथे आणखी एक मानसिक चूक दिसते—“मला क्लेम मिळाला नाही म्हणजे इन्शुरंस निरुपयोगी आहे.” प्रत्यक्षात इन्शुरंस हे आजच्या नव्हे, तर उद्याच्या अनिश्चित धोका टाळण्यासाठी असते. एक नियम मोडून दुसऱ्या नियमाखाली संरक्षण मागणे योग्य नाही. पण राग, अहंकार आणि ‘माझ्यावर अन्याय झाला’ ही भावना माणसाला तर्कशुद्धपणे हे समजून घेऊ देत नाही.

संभाषणाच्या शेवटी ग्राहक शांत झाला. त्याला हे जाणवले की इन्शुरन्सचे रिन्यूवल न करणे हा उपाय नसून स्वतःच्या अडचणी वाढवणारा निर्णय आहे.

या प्रसंगातून मिळणारे बोध (Behavioral Finance Lessons)
१. रागाच्या भरात घेतलेले आर्थिक निर्णय बहुतेक वेळा चुकीचे ठरतात.
२. नियम मोडल्यावर संरक्षण अपेक्षित ठेवणे ही मानसिक चूक आहे.
३. इन्शुरंस हे नुकसान भरपाईसाठी नव्हे, तर भविष्यातील धोका कमी करण्यासाठी असते.
४. एक वाईट अनुभव म्हणजे संपूर्ण व्यवस्थेचा दोष असा निष्कर्ष काढू नये.
५. शॉर्ट टर्म भावनांना दीर्घकालीन आर्थिक सुरक्षिततेवर मात करू देऊ नये.

तेव्हा आर्थिक निर्णय घेताना भावना बाजूला ठेवून नियम, वास्तव आणि भविष्यातील धोके यांचा विचार करणे आवश्यक आहे.–


श्री. रघुवीर अधिकारी,
CEO, SWS

संपर्क: 98220 00883


Discover more from Money चे अंतरंग

Subscribe to get the latest posts sent to your email.



Subscribe Here

About Us

Welcome to SWS Fintech Services Pvt. Ltd. – Your Trusted Partner in Financial Well-being!

Established in 1995, SWS has been committed to empowering individuals, families, and businesses through sound investment services. With over three decades of experience, our team of qualified financial professionals brings together expertise in investment services.

At SWS, we believe that financial success is built on informed decisions, disciplined investing, and long-term relationships. Our goal is to simplify financial complexities, enhance financial literacy, and help our clients confidently pursue their financial aspirations.

Through this blog, we share insights, practical tips, and perspectives to help you make informed financial decisions.

Explore more about us at: https://www.swsfspl.com/

SWS Fintech Services Pvt Ltd
AMFI Registered Mutual Fund Distributor- ARN- 90746
ARN Renewal Date- 25th July 2028
APMI Registered Distributor- APRN01157
APRN Renewal Date- 11th Jan 2029

Discover more from Money चे अंतरंग

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading