–
“याद है बेटा, तब तुमने सारा हिसाब लगाया और मेरी फिक्स की रसीद तोड़नेके बदले और उपाय बताए। और मेरा बड़ा नुकसान होते होते रुकवा दिया।”, ते काय बोलत होते मला खरंच आठवत नव्हतं. पण त्यांना दहा बारा वर्षांपूर्वीचं काहीतरी आठवत होतं.

अफसर अली. वय सत्तरीच्या बरंच पलीकडे. आडदांड देह. शंभरेक किलोचा तरी असावा. जेवढी उंची तेवढीच बलदंड शरीरयष्टी आणि आवाज तर भिंती थरथरतील असा. हल्ली हल्ली काठी घेऊन यायला लागले होते. सैलसर झब्बा आणि चक्क लुंगी असा वेष. कोणत्यातरी आखाती देशात बरीच वर्ष होते आणि बक्कळ माया जमवली होती. पुढे मुलगा सुद्धा त्याच देशात गेला आणि रेमीटन्सेस वाढत वाढत गेले त्यामुळे अफसर अली किंवा त्यांचा मुलगा आले कि ब्रांचमधे सगळे ऑन द टोज असायचे आणि त्यांना सुद्धा सगळं फटाफट करून हवं असे. त्यांचा आवाज वाढला की मग एखाद्या नवख्या कर्मचाऱ्याचा आवाज चढे मग साहेब मंडळी धावत येऊन वातावरण शांत करत.
मुद्दाम ठरवून वगैरे काही केलं नाही पण ते किंवा त्यांचा मुलगा आले कि मी माझ्या शांत पेस मध्ये काम करत राहायचे. तेवढ्याच शांतपणे त्यांच्या प्रश्नांची उत्तरं द्यायचे. माझ्याशी त्यांचा कधीच वाद किंवा अनबन झाली नाही. पुढे पुढे तर ते मला बघून त्या त्या काऊंटरला यायला लागले आणि त्यांच्या तोंडी मग माझ्यासाठीचं बेटा संबोधन कधी ओघळलं ते त्यांनाही कळलं नाही मलाही नाही. मग नेहमीचं प्रकरण. “आप बैठिये, आपके पासबुक मैं भरवाके देती हुं ।”, किंवा फिक्स्ड रिसीट दिली कि त्यांनी मागण्यापूर्वीच कव्हर फुक मारून मोकळं करून त्यांचा समोर धरलं जाई. असं बरंच काही. चमचेगिरी किंवा पुढेपुढे वालं मॅटर नसे तर एका वयस्कर माणसाला केलेली सहज मदत असं स्वरूप असे. सगळं कामाच्या फ्लोमधे आपसूक होऊन जाई.
तर आमच्या फाईव्ह इयर पॉलिसी प्रमाणे माझी दुसऱ्या जवळच्याच ब्रांचला ट्रान्स्फर झाली. एक दिवशी अफसर अली माझ्या या नव्या ब्रांचला आले. आधीच्या ब्रांचला सर्व्हर डाऊन होता कि काय कोण जाणे. ओळखीचा चेहरा आणि ओळखीचं हसू झालं. “अच्छा हुवा बेटा, तुम यहाँ हो ।”, माझं फक्त एक स्माईल. मग त्या ब्रांचला पूर्वी सारखी सर्व्हिस कशी मिळत नाही वगैरे. यावर बिझनेस एथिक्सनुसार मी फक्त आणखी एक मंद स्माईल केलं. काही बोलले नाही.
नंतर लगेचच पुन्हा एकदा ते आले “बेटा मेरे आठ पासबुक अपडेट करवानें है. मैं बैठता हूं. आरामसे करके देना ।”, मोठ्या मुश्किलीनं त्यांचा देह सोफ्यावर बसता झाला. हे बघणं अतिशय दु:खदेय असतं. मी पासबुकं भरून त्यांचा हाती दिली. त्यावर ते म्हणाले “शुक्रिया बेटा ।” बसताना झाला त्याहून जास्त त्रास त्यांना सोफ्यातून उठताना झाला. मी शिपाईदादाला खूण केली त्यांना मदत कर म्हणून. ते उठले. निघाले. काहीसं आठवत ते म्हणाले “याद है बेटा, तब तुमने सारा हिसाब लगाया और मेरी फिक्स की रसीद तोड़नेके बदले और उपाय बताए। और मेरा बड़ा नुकसान होते होते रुकवा दिया।”
कधीतरी म्हणजे दहा बारा वर्षांपूर्वी म्हणे त्यांनी साडे नऊ लाखाची फिक्स्ड डिपॉझिट प्रिक्लोज करायला दिली होती. त्यांना तातडीने हवे होते तीनेक लाख आणि साडे नऊ लाखाची रिसिप्ट तोडल्यामुळे इंटरेस्ट पेनल्टी वगैरे गोष्टींमुळे त्यांचं बरंच नुकसान होत होतं. रिसिप्ट मॅच्युअर व्हायला अगदी थोडका अवधी बाकी होता. मी हिशेब करून त्यांना सांगितलं कि पावणे तीन वर्ष पूर्ण झाली आहेत, पुढे फक्त तीन महिने बाकी आहेत तेव्हा रिसिप्ट तोडलीत तर इतकं इतकं नुकसान होईल त्या पेक्षा दोन महिन्यासाठी याच रिसिप्टवर लोन घ्या. त्यांना ते पटलं असावं. ते लोन सेक्शनला गेले, मी माझ्या कामात गुंतले.
हे सगळं त्यांनीच मला सांगितलं तेव्हा मला त्याची लिंक लागली. हे असले उद्योग आम्ही बरेच जण करायचो. ग्राहकांचं नुकसान होऊ नये या साठी विशेष विचार करायचो. त्यात आम्हाला काही वेगळं वाटत नसे पण अफसर अलींना तो किस्सा जसाच्या तसा आठवत होता. तेव्हाच्या त्या कृतीचं ते दहा वर्षांनी कौतुक करत होते आणि भरलेल्या पासबुकांसाठीच्या वर्तमानात त्या बारा वर्षांपूर्वीच्या माझ्या हिशेबाचं सुद्धा कौतुक मिसळलं गेलं होतं.
“चलता हूँ बेटा” म्हणत काठी टेकवत सावकाश दाराकडे जाणारा त्यांचा देह आणि पंधरा वर्षांपूर्वी त्यांचा एका हाकेने थरथरणारी जुनी ब्रांच याचा मेळ लागत नव्हता; तरी बराच मेळ लागला होता. मुळात माणूस माणसाला भेटणं, समजणं, आवडणं हाच तर जगण्यातला मोठा मेळ नव्हे काय !
एक एक वर्ष सरतं आणि नवनवीन आठवणींची झोळी भरत भरत जाते जुन्या आठवणी नव्या होऊन भेटतात.

स्मिता गानू जोगळेकर.
9892551950
smita_dj@hotmail.com
