–
आपल्यासाठी भारतीय सरकार अनेक कल्याणकारी योजना राबवते आहे — जेणेकरून आपल्या आर्थिक, वैयक्तिक व सेवानिवृत्त आयुष्यातील सुरक्षिततेचे कवच निर्माण होऊ शकेल. रक्षाबंधनाच्या निमित्ताने, आपण केंद्र सरकारने भारतातील सर्वसामान्य नागरिकांसाठी सुरू केलेल्या काही महत्वाच्या सुरक्षा, विमा आणि बचत योजनांची माहिती घेणार आहोत — ज्यामुळे सरकारी सुरक्षेचे कवच समजून घेता येईल. आपल्या आजूबाजूच्या गरजवंतांना विशेष करून आपल्याला विविध सेवा पुरविणाऱ्या, कमी उत्पन्न गटातील मदतनीसांना तुम्ही या सर्व योजना सांगून, त्या त्यांच्यासाठी अंमलात आणण्यासाठी साहाय्य करून त्यांच्यासाठीही सुरक्षेचे कवच बनवू शकता. यासाठी ‘रक्षाबंधन’ सारखा सुमुहूर्त दुसरा नाही ! चला थोडक्यात माहिती समजावून घेऊयात.

१. प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना (PMJJBY)
कोणासाठी: १८ ते ५० वयोगटातील व्यक्ती ज्यांचे बँकेत खाते आहे.
विमा: वार्षिक ४३६ रुपये प्रीमियम मध्ये रु. २ लाखाचा जीवन विमा.
सहभाग: ज्या बँकेत खाते आहे, त्या बँकेत किंवा पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन योजनेत सहभागी होऊ शकता. बँकेच्या अँप द्वारे सुविधा दिलेली असू शकते.
२. प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना (PMSBY)
कोणासाठी: १८ ते ७० वयोगटातील व्यक्ती ज्यांचे बँकेत खाते आहे.
विमा: वार्षिक २० रुपये प्रीमियममध्ये रु. २ लाखाचा अपघात विमा.
सहभाग: ज्या बँकेत खाते आहे, त्या बँकेत किंवा पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन योजनेत सहभागी होऊ शकता. बँकेच्या अँप द्वारे सुविधा दिलेली असू शकते.
३. अटल पेन्शन योजना (APY)
कोणासाठी: १८ ते ४० वयोगटातील कोणताही भारतीय नागरिक ज्याचे बँक खाते आहे आणि जो करदाता नाही तो या योजनेत सामील होऊ शकतो (असंघटित क्षेत्रातील लोकांसाठी असलेली पेन्शन योजना)
पेन्शन: दरमहा रु. १,०००, २,०००, ३,०००, ४,००० किंवा ५,००० पेन्शन मिळू शकते.तुम्हाला योजनेत नियमितपणे योगदान द्यावे लागेल. तुमच्या वयानुसार आणि निवडलेल्या पेन्शन रकमेनुसार योगदानाचा हप्ता ठरतो.
सहभाग: तुम्ही बँकेत किंवा पोस्ट ऑफिसमध्ये योजनेत सहभागी होण्यासाठी अर्ज करू शकता.
४. सुकन्या समृद्धी योजना (SSY)
कोणासाठी: १० वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलींच्या पालकांना त्यांच्या मुलीच्या भविष्यासाठी बचत करण्यास प्रोत्साहन देण्यासाठी तयार करण्यात आलेली योजना.
बचत: किमान २५० रुपये आणि वर्षाला जास्तीत जास्त १.५ लाख रुपये जमा करता येतात. (सध्याचा व्याजदर ८.२%). या योजनेत आयकर कायद्याच्या कलम ८०C अंतर्गत कर सवलत मिळते.
सहभाग: तुम्ही बँकेत किंवा पोस्ट ऑफिसमध्ये योजनेत सहभागी होण्यासाठी अर्ज करू शकता.
५. पब्लिक प्रोव्हिडंट फंड (PPF)
कोणासाठी: १८ वर्षांपुढील सर्व भारतीय नागरिक यात सहभागी होऊ शकतात. आर्थिकदृष्ट्या सक्षम होताना आणि गुंतवणूकीचा दीर्घकालीन उत्तम म्हणून सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (पीपीएफ) योजनेकडे पाहीले जाते.
बचत: १५ वर्षांची लॉक-इन गुंतवणूक योजना. वार्षिक ₹५०० ते ₹१.५ लाख पर्यंत गुंतवणूक. सध्या ७.१% व्याज आणि करमुक्त परतावा.
सहभाग: तुम्ही बँकेत किंवा पोस्ट ऑफिसमध्ये योजनेत सहभागी होण्यासाठी अर्ज करू शकता. बँकेच्या अँप द्वारे सुविधा दिलेली असू शकते.
६. राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र (NSC)
कोणासाठी: ही एक निश्चित-उत्पन्न गुंतवणूक योजना आहे जी कोणत्याही पोस्ट ऑफिस शाखेत उघडली जाऊ शकते. हा भारत सरकारचा मुख्यत्वे लहान ते मध्यम-उत्पन्न गुंतवणूकदारांसाठी एक उपक्रम आहे.
बचत: ५ वर्षांचा बचत कालावधी. बचत रक्कम मर्यादा नाही. ₹१.५ लाखपर्यंत टॅक्स लाभ असून सध्या ७.७% व्याजदर आहे.
सहभाग: अर्ज ऑनलाइन किंवा कोणत्याही पोस्ट ऑफिसमधून भरता येतो.
७. वरिष्ठ नागरिक बचत योजना (SCSS)
कोणासाठी: ६० वर्षांपेक्षा जास्त वयाच्या व्यक्तींसाठी बचत योजना.
बचत: किमान ₹१००० आणि कमाल ₹३० लाख बचत मर्यादा, ५ वर्षे मुदत, सध्या ८.२% व्याज (तिमाही चक्रवाढ. व्याज त्रैमासिक दिले जाते), ८० सी अंतर्गत रु. १. ५ लाखापर्यंत कर लाभ.
सहभाग: तुम्ही बँकेत किंवा पोस्ट ऑफिसमध्ये योजनेत सहभागी होण्यासाठी अर्ज करू शकता. बँकेच्या अँप द्वारे सुविधा दिलेली असू शकते.
८. राष्ट्रीय पेन्शन योजना (NPS)
कोणासाठी: १८ ते ७० वयोगटातील भारतीय नागरिकासाठी. मासिक/वार्षिक गुंतवणूक. निवृत्तीनंतर नियमित पेन्शन व कर लाभ. NPS मध्ये जमा झालेल्या पैशांपैकी ६०% रक्कम तुम्ही निवृत्तीनंतर काढू शकता, तर उरलेली ४०% रक्कम तुम्हाला नियमित पेन्शनसाठी (Annuity) गुंतवावी लागते.NPS मध्ये गुंतवणूक केल्यास तुम्हाला आयकर कायद्याच्या कलम 80C आणि 80CCD अंतर्गत कर सवलत मिळते.
गुंतवणूक: NPS मध्ये, तुम्ही इक्विटी (शेअर मार्केट), सरकारी सिक्युरिटीज आणि कॉर्पोरेट डेटमध्ये गुंतवणूक करू शकता. तुमच्या जोखीम घेण्याच्या क्षमतेनुसार तुम्ही तुमच्या गुंतवणुकीचे पर्याय निवडू शकता.
सहभाग: तुम्ही NPS च्या वेबसाइटला भेट देऊ शकता किंवा तुमच्या जवळच्या बँकेत किंवा वित्तीय संस्थेत संपर्क साधू शकता.
९. सड़क अपघात पीडितांसाठी मोफत उपचार योजना – २०२५
कोणासाठी: आपल्या देशात रस्त्यांवरील अपघातांमध्ये दरवर्षी हजारो लोक गंभीर जखमी होतात किंवा आपले प्राण गमावतात. अशा वेळी तातडीने आणि दर्जेदार वैद्यकीय उपचार मिळणे हे अत्यंत आवश्यक असते. परंतु अनेकदा आर्थिक अडचणींमुळे रुग्णांना योग्य ते उपचार घेता येत नाहीत. या पार्श्वभूमीवर भारत सरकारची ही मह्त्वकांक्षी योजना मदतगार ठरू शकते.
वैशिष्ट्ये: कोणत्याही प्रकारच्या मोटर वाहनाच्या अपघातात जखमी झालेली व्यक्ती, २४ तासांच्या आत रुग्णालयात दाखल झाल्यास या योजनेचा फायदा घेण्यास पात्र ठरणार आहे. असा उपचार PM JAY (Prime Minister Jan Aarogya Yojna) योजनेत समाविष्ट (Empaneled) असलेल्या नामनिर्दिष्टित केलेल्या रुग्णालयांमध्ये मिळणार आहे. पीडित व्यक्तीला ११२ नंबरवर संपर्क करून एम्बुलन्स बोलवून, जवळच्या नामनिर्दिष्ट रुग्णालयात दाखल करता येणार आहे. यात रु. १.५ लाख पर्यंतचा उपचार खर्च सरकारकडून भरला जाईल आणि ७ दिवसांपर्यंतचा उपचार खर्च कव्हर केला जाईल.
१०. किसान क्रेडिट कार्ड योजना (KCC)
कोणासाठी: या योजनेचा उद्देश शेतकऱ्यांना शेतीसंबंधीच्या कामासाठी आर्थिक मदत करणं हा आहे. केसीसीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना बी-बियाणे, खतं, कीटकनाशकं इ. शेतीच्या कामांसाठी कर्ज दिले जाते.
कर्ज: शेतकऱ्यांसाठी ₹३ लाखापर्यंत कर्ज सुविधा. कर्जावर ७ % व्याजदर आकरला जातो पण शेतकऱ्याने अर्जाची वेळेवर परतफेड केल्यास त्या शेतकऱ्याला व्याजदरात ३ %सवलत दिली जाते. म्हणजेच शेतकऱ्याला ४% व्याजदारणे हे कर्ज मिळते.
सहभाग: बँकेत अजर करू शकता.
या योजना विविध बँक शाखा, पोस्ट ऑफिस, ऑनलाईन पोर्टल्स (जसे की https://www.india.gov.in) यावरून अर्ज करून उपलब्ध आहेत. योजना निवडताना आपल्या गरजेनुसार कालावधी, हप्ता आणि परताव्याचा विचार करून निर्णय घ्यावा. ही माहिती आपल्या परिचितांपैकी कोणास उपयुक्त असल्यास जरूर पाठवावी.
टीम SWS

