–

रोजचीच बँक एकाच एक प्रकारचे काम. तरीही रोज ताजेपणा असतो, कारण रोज भेटणारी माणसे निराळी असतात, त्यांचे मूड निराळे असतात. त्यांचाशी ट्यून करून घेणं, त्यांना काही शिकवतोय हे न दाखवता शिकवणं, वयस्कर मंडळींचे मिजाज जपणं हीच मोठी मजेची कामगिरी असते.
व्ही. व्ही. गणपथी. वय सत्तरीच्या पुढे. बऱ्याच दिवसांनी आले. थकलेले, सरबरलेले दिसत होते. लॉकर ऑपरेट करायचा होता. सावकाशपणे त्यांना सही करू दिली. बराच वेळ आत राहत त्यांनी लॉकरचं काम संपवलं. पुन्हा काऊंटरला आले. माझ्या पुढ्यात त्यांनी चाळीस हजाराचा चेक ठेवला, म्हणाले, ‘पैसे काढायचे आहेत.’ मी सिस्टममधे अकाऊंट बघितलं. बॅलन्स फक्त एक हजार. अशा वेळी मी पटकन ‘खात्यात पैसे नाहीत’ असे न सांगता ‘कुठून काही रक्कम यायची आहे का खात्यात ?’, असे विचारते. त्याप्रमाणे विचारलं. ते म्हणाले ‘नाही नाही. लाखभर रुपये शिल्लक असायला हवेत.’ मी चक्रावले. मागच्या काही महिन्यांचे स्टेटमेंट चेक केले. दोन वर्षात काही एन्ट्री नव्हती. म्हंटलं, ‘तुमचं दुसरं अकाऊंट पण आहे ना, कदाचित त्यात पैसे असतील. बघा बरं त्या अकाऊंटचं चेकबुक आहे का?’ त्यांनी त्यांची झोळी टाईप पिशवी धुंडाळली. खूप जुनेपाने हवे नकोसे कागद उलटपालट केले. म्हणाले, ‘नाही याच खात्यात असायला हवे.’ मी काही न बोलता अन्य मार्गांनी सिस्टिम सर्च टाकून त्यांचा दुसरा अकाउंट नंबर मिळवला. त्यात खरोखर दिडेक लाख रुपये होते. त्यांना म्हंटल. ‘पुन्हा एकदा पिशवीत बघा, चेकबुक त्यातच असेल.’ आणि ते खरंच निघालं. त्यांना पैसे दिले.
साधारण तिशीच्या आसपासचा त्यांचा मुलगा श्रीराम हा सगळा प्रकार बघत होता. मिस्टर गणपथी थोडे दूर बसून मन लावून नोटा मोजत होते. मी त्यांचा मुलाला विचारले, ” Is everything alright…I find Mr. Ganapathy little disturbed today….”. त्यावर तो म्हणाला, ‘बरोबर बोललात तुम्ही. आई मागच्या वर्षी गेली. त्यानंतर गेले वर्षभर ते अमेरिकेला माझ्याकडे होते. आत्ता सुद्धा आम्ही फक्त सहा दिवस मुंबईमध्ये आहोत. मी बाबांना म्हणतोय कायमचं तिकडे या पण यायला तर त्यांचा ठाम विरोध आहे. बाबांना त्यांचे कुठे, किती पैसे आहेत काही लक्षात नाही. हल्ली तब्येत सतत नरम असते, चालायचा त्रास आहे. गोष्टी आठवत नाहीत. यातला कोणताही विषय काढला कि ते चिडतात. तू मला शिकवू नको वगैरे सुनावतात. चिडके झाले आहेत. तुमच्या बँकेव्यतिरिक्त आणखी तीन बँकेत पैसे आहेत.’ मी म्हंटल, ‘कुठे काही लिहून ठेवलं आहे का त्यांनी ?’ तो म्हणाला, ‘नाही ना, फक्त ओझरता उल्लेख करतात. पासबुक्स रिसिप्टस कुठे ठेवल्येत त्यांनाही माहित नाही. मुख्य म्हणजे प्रत्यक्ष पैशांपेक्षा त्यांची इथे भावनिक गुंतवणूक अधिक आहे. मी त्यांना सांगतोय मला काही देऊ नका. फक्त हिशेब व्यवस्थित ठेवा. अर्थात हेही आता अवघडच दिसतंय. आणि एका आठवड्यात हे सगळं क्लिअर करणं मला खरंच शक्य नाही.’ मी श्रीरामला म्हंटल, ‘काळजी करू नको. इथल्या पैशांचे व्यवस्थित टेबल बनवून मी तुला देते, उद्या ये. एक साधारण अंदाज मी आत्ता देऊ शकते.’
त्याला द्यायला म्हणून हिशेब करत गेले तर गणपथी अंकल आणि त्यांच्या कुटुंबाच्या नावे तब्बल बत्तीस लाख रुपये निघाले. नॉमिनेशन बघायचं बाकी आहे. ते काम उद्या. बहुतेक ते नसतेच. मी, ग्राहक तसेच इतरांना आवर्जून सर्वांना सांगत असते, नॉमिनेशन करा म्हणून. आपल्याकडे एक खुळी समजूत आहे कि विल किंवा नॉमिनेशन करणं म्हणजे निरवानिरवी करणं. खरं तर या गोष्टींसाठी वयाचं कोणतंही बंधन नसतं. आमचं बोलणं होईपर्यंत अंकल तिथे आले. आता ते थोडे शांत वाटले. म्हणाले, ‘श्रीराम शाळेत होता तेव्हा पासूनचं हे अकाऊंट आहे बघ.’ श्रीरामने खुणेनंच मला सांगितलं, ‘बघा मी मघा म्हणत नव्हतो का !’ मी सुद्धा हसून त्यांच्या त्या भावनिक गुंतवणुकीला पाठींबा दिला.
उद्या मोठठं काम आहे. गोड बोलून नॉमिनेशन करून घेणं आणि विलचा विषय काढणं. त्यातलं माझं प्रिय वाक्य म्हणजे , ‘अहो माझ्या प्रत्येक अकाऊंटला जॉईंट नाव असतं आणि दुसरं तिसरं कोण कशाला….मी स्वतः सुद्धा विल केलं आहे’ (त्यांच्या दृष्टीने अजून मी लहानच आहे ना !) हे वाक्य ऐकल्यावर मात्र समोरच्या सुरकुतल्या चेहऱ्यावर बरेचदा एक आश्वासक आणि आशेचा भाव दिसतो . आणि विचारचक्र सुरु झालेलं कळतं. ‘खरंच कि, पोरगी म्हणते त्यात तथ्य आहे खरं. आता गेल्यावर वकील गाठतोच कसा! ‘ Win Win सिच्युएशनमधे आम्ही एकमेकांचा निरोप घेतो. बिनपैशाचं आणि पगारा पलीकडचं काहीतरी दिलं घेतलं जातं. आज बँकेतून निघताना श्रीराम तर विशेष हसत होता. त्याचं केवढं तरी मोठं ओझं आज दूर झालं होतं.

स्मिता गानू जोगळेकर.
9892551950
smita_dj@hotmail.com
