–
परवा एका मैत्रिणीच्या घरी गेले होते. गेल्यावर माझ्याशी नेहेमी मनमोकळ्या गप्पा मारणारे आजोबा, बराच वेळ गेला तरीही बोलायला बाहेर आले नाहीत. त्यांना बरे नसेल असे समजून चौकशी केल्यावर मैत्रीण म्हणाली, ‘अग ते सध्या खूपच डिप्रेशनमध्ये आहेत. मोठ्या सायबर फसवणुकीला बळी पडले ना ! कोणाशी काही फारसे बोलत नाहीत, लोकलज्जेमुळे बाहेरही जात नाहीत. आता दोन महिने झाले तरीही हीच परिस्थिती आहे.’ मी न राहवून त्यांना आतल्या खोलीत जाऊन भेटले. थोड्या हवापाण्याच्या गप्पा मारल्या आणि त्यांचा वेळ जावा म्हणून पर्समधले, डॉ. आनंद नाडकर्णींचे एक नवीनच घेतलेले पुस्तक त्यांच्या हातात दिले. जाताना मैत्रिणीला माझ्या परिचित समुपदेशकाचा सल्ला घ्यायलाही लावला.

त्या घरातून बाहेर पडले आणि मला जाणवले सायबर फसवणुकीचे बिगर आर्थिक… मानसिक कंगोरे ! सहसा सायबर फसवणूक म्हटली की आपल्या डोळ्यासमोर एकच गोष्ट येते ती म्हणजे झालेले आर्थिक नुकसान. परंतु, या फसवणुकीची वास्तवातली दुसरी बाजूही मी आताच अनुभवली होती. जेव्हा कोणी सायबर फसवणुकीचा बळी ठरते, तेव्हा त्या व्यक्तीला पोलीस /कायदा यांच्याहीपेक्षा आधी मानसिक आधाराची खूप आवश्यकता असते. फसवणुकीतील रक्कम मोठी असेल तर वैयक्तिक आयुष्याबरोबरच त्याच्या सामाजिक आयुष्यावरही खोल परिणाम होत असतो.
काय बरे होऊ शकते अशा व्यकतीच्या बाबतीत ?
अपराधीपणाची भावना दाटून येणे
सायबर फसवणूक होऊन गेल्यानंतर अनेकांना स्वतःच पूर्णतः दोषी असल्यासारखे वाटू लागते. त्यात त्यांच्याकडून झालेल्या चुकीचा भाग मोठा असला तरीही माणूस / यंत्रणा म्हणून समोर ठेवलेल्या त्यांच्या विश्वासाला तडा गेलेला असतो ज्यामध्ये समोरच्या माणसाचा / यंत्रणेचा चुकीचा हेतूही तितकाच दोषी असतो. ‘मीच मूर्ख ठरलो’, ‘मी आधीच काळजी घेतली असती तर?’ अशा विचारांनी मन पोखरलं जातं. ही भावना इतकी गडद असते की बरेच लोक यामुळे नैराश्याच्या उंबरठ्यावर येतात.
मानसिक धक्का बसणे
ज्यांनी आयुष्यभर मेहनतीने साठवलेली मोठी रक्कम गमावलेली असते, त्यांच्यासाठी ही घटना आयुष्याला बदलून टाकणारी ठरु शकते. झालेल्या नुकसानाचा सततचा विचार करणे, झोप न लागणे, कधी तपास यंत्रणेकडून मिळणाऱ्या प्रतिसादामुळे हताशपणा वाटणे — हे सगळेच त्या घटनेनंतर सुरु होते.

सामाजिक तणाव येणे
बातमी समजल्यावर भेटणारी प्रत्येक व्यक्ती त्या व्यक्तीशी तेच तेच बोलत असते. त्यामुळे किती लोकांच्या नजरेत आपण बुद्धू ठरतो आहे अशी भावना त्या व्यक्तीच्या मनात तयार होते. त्यांच्या स्वतःविषयीच्या मनातील प्रतिमेला तडा तर जातोच शिवाय ‘इतका हुशार माणूस आणि अशा फसवणुकीला बळी?’ , ‘त्यांनी बघून-सांभाळून का नाही केलं?’, असे प्रश्न कुटुंबाकडून, मित्र/नातेवाईक यांच्याकडून विचारले जातात आणि संबंधित व्यक्तीची सामाजिक प्रतिमा नकळत डागाळली जाते. विशेषतः वयोवृद्ध किंवा प्रतिष्ठित व्यक्तींना ही बाब फार जास्त मानसिक त्रास देते.
विश्वासाचे धागे विरणे
एकदा सायबर फसवणुक झाल्यावर कोणावरही सहज विश्वास ठेवणे त्या व्यक्तीला कठीण होऊन जाते. फसवणूक झाल्यानंतर अशा व्यक्ती ऑनलाइन व्यवहार, UPI, मोबाईल बँकिंग या गोष्टींपासून दूर रहायला लागतात. ‘डिजिटल इंडिया’, च्या युगात ही भीती त्यांना इतरांपेक्षा मागे टाकते आणि मग आपण मागे पडल्याची भावना पुनः निराशा घेऊन घेते.
एकाकीपणा आणि आत्मकेंद्रीपण वाढणे
आता आर्थिक व्यवहारच्या बतीत ‘माझ्यावर कुणी विश्वास ठेवणार नाही’, ‘लोक माझी थट्टा करतील.’ हे विचार मनात घर करून राहतात. फसवणुकीनंतर अनेकजण स्वतःला समाजापासून अलग ठेवतात, कुणाशी बोलेनासे होतात आणि एकटे पडतात.
🔐 अशा वेळी यावर उपाय काय करू शकतो ?

संवेदनशीलता दाखविणे आणि सहानुभूती देणे: फसवणूक झालेल्या व्यक्तीला दोष देण्याऐवजी, त्याच्या मनात वरील प्रकारच्या भावना असू शकतात हे आधी समजावून घेणं गरजेचं आहे. ‘घाबरू नका, आपण बघू’, असे दिलासा देणारे शब्द, कुटुंबियांच्या सहकार्याचे आणि मदतीचे भक्कम कडे सभोवती असल्यावर फसवणूक झालेल्या व्यक्तीस सावरायला मदत होते.
मनःशांतीसाठी संवाद साधने: फसवणूक झालेल्या व्यक्तीने, मनात कुढत न बसता आपला अनुभव न घाबरता इतरांना सांगितला तर त्यांच्याच मनावरील ताण कमी होण्यास मदत होते. शिवाय इतरही त्यांच्या बाबतीत होऊ शकणाऱ्या संभाव्य धोक्याबाबत जागरूक होतात.
मनोविकास सल्लागाराची मदत घेणे: अशी व्यक्ती नैराश्येच्या गर्तेत जात आहे असे वाटल्यास पुढील काही अनुचित घटना होण्याआधीच मनोविकास तज्ञांची मदत घेणे उचित ठरते. कुटुंबीय किंवा नातेवाईक/ मित्र यांच्या व्यतिरिक्त असलेल्या नवीन माणसाशी, सल्लागाराशी जो तटस्थपणे परिस्थितीकडे बघू शकतो, मोकळेपणाने संवाद साधणे शक्य होते.
शेवटी…
सायबर फसवणूक ही आर्थिक नुकसानाच्या पलीकडे जाऊन भावनिक आणि सामाजिक जखमा देऊ शकणारी घटना असू असते. या फसवणुकीचा बळी ठरणं हे कोणाचंही अपयश नसून, सायबर गुन्हेगारांचं यश असते. त्यामुळे अशा बाबतीत तांत्रिक मदतीबरोबरच मानसिक मदतीची आवश्यकता ओळखणे आणि त्यानुसार पावले उचलणे हे ही गरजेचे !

डॉ. रुपाली कुलकर्णी,
IT, Content & Training Head- SWS
