सायबर गुन्हेगारी प्रकार – भाग १५
पूर्वीची एक जुनी पंक्ती आठवते… ‘मरावे परि कीर्ती रूपे उरावे’. म्हणजे आपल्यानंतर, समाजात आपल्या चान्गल्या कर्माचेच गोडवे गायले जावे, असा त्याचा अर्थ ! आजच्या युगात मात्र माणूस गेल्यावरही त्याच्या कीर्तीशिवाय कितीतरी इतर पाऊलखुणा/फूटप्रिंट्स मागे राहतात, नाही का ? उदा. कार्बन फूटप्रिंट्स (केलेल्या वायप्रदूषणाचे परिणाम) , प्लास्टिक फूटप्रिंट्स (वापरलेले आणि विघटित न झालेले प्लास्टिक), फॅशन फूटप्रिंट्स (वापरलेली आणि विघटित न झालेली फॅशन एक्स्सेसरीज/वस्तू) इत्यादी अनेक. यापैकीच एक आणि महत्वाची आहे डिजिटल फूटप्रिंट्स/ Digital Footprints.

आजच्या डिजिटल युगात सोशल मीडियाचा वापर आपल्या दैनंदिन आयुष्याचा भाग झालेला आहे. आपण सहजपणे आपल्याच डिजिटल पाऊलखुणा अव्याहतपणे ऑनलाईन जगात उमटवत असतो. उदा. सोशल मीडियावर केलेल्या पोस्ट्स, फोटो, लोकेशन्स, डॉक्युमेंट्स इ. मात्र सहजगत्या इतरांसोबत शेअर केलेल्या माहितीचे दूरगामी आणि धोकादायक परिणामही असू शकतात हे लक्षात घेतले पाहिजे.
Digital Footprints. धोकादायक का आहेत ?
१) सोशल मीडियावर शेअर केलेली माहिती सार्वत्रिक होण्याची शक्यता खूप जास्त असते. यामुळे गुन्हेगारांच्या किंवा सायबर गुन्हेगारांच्या जाळ्यात नकळत फसले जाण्याची शक्यता असते . उदा. बरेच पालक / विद्यार्थी सोशल मीडियावर आनंदाच्या भरात गुणपत्रिका, सर्टिफिकेट्स, प्रवेशपत्रे यांसारखी माहिती शेअर करतात. ‘माझ्या मुलाला १० वी मध्ये ९५% मिळाले !’ असे म्हणत गुणपत्रिका पोस्ट केली जाते. हे शेअर करतांना आपण पाल्याच्या नावाबरोबरच जन्मतारिख, शाळा / कॉलेजचे नाव इ. माहिती सप्रमाण जगजाहीर करत असतो. या माहितीचा गैरवापर करून बनावट ओळखपत्र, प्रवेशपत्र किंवा अगदी एज्युकेशन लोनही केले जाऊ शकते.
२) फोटोसह लोकेशन शेअर करणे हे खूपच सामान्य झालेय. ‘गोव्यातली धमाल!’ – सारख्या आशयाची पोस्ट टाकणे म्हणजे चोरांना स्वतःहून हे सांगण्यासारखे आहे की घरी कोणीही नाही, या आणि लुट करा ! तेव्हा आपण बाहेरगावी असतांना अशा स्वरूपाच्या पोस्ट्स/स्टेट्स टाकणे टाळावे.
३) सोशल मीडियावर मुलांचे शाळेतील इव्हेंट्स, सहलीचे व्हिडीओ/ फोटो टाकून आपणच मुलांची स्थाने इतरांना जाहीर करत असतो. यामुळे त्यांच्या सुरक्षिततेवर गंभीर परिणाम होऊ शकतो.
४) आपण जेव्हा कोणताही फोटो, मेसेज किंवा व्हिडीओ शेअर करतो, तेव्हा ती माहिती डेटा सेंटरमध्ये साठवली जाते. या डेटा सेंटर्सना वीज, वातानुकुलन आणि अवाढव्य तंत्रज्ञान लागते. हे सर्व पर्यावरणाला हानी पोहोचवणारे असते. पाण्याचे आणि शुद्ध हवेचे वाढते दुर्भिक्ष्य लक्षात घेता अगदीच आवश्यक असेल तेव्हाच माहिती सोशल मिसियावर टाकणे हे सुद्न्यपणाचे लक्षण आहे.

आपण एकदा इंटरनेटवर शेअर केलेली माहिती काढून जरी टाकली जरी, तरी ती या मायाजालात कुठे ना कुठे सेव्ह झालेली असते. तेव्हा आपण जाहीर केलेली माहितीच आपल्याविरुद्ध वापरली जाऊ शकते याचा विचार गांभीर्याने करायला हवा.
शेवटी म्हणावेसे वाटते की जसे आपण बाहेर जाताना घराचे दरवाजे बंद करतो, तसेच ऑनलाईन जगात आपल्या माहितीचे दरवाजे देखील सुरक्षित ठेवायला शिकायला हवे नाहीतर याच दरवाज्यातून चोरांना प्रवेश दिल्यासारखे आहे. आपल्या आणि आपल्या मुलांच्या सुरक्षिततेसाठी डिजिटल जागरूकता हवीच! म्हणूनच फसवणूकीसाठी सोडू नका हिंट्स, हो हो आपल्याच डिजिटल फूटप्रिंट्स !!
टीम SWS

