गुंतवणूकदारांचे मानसशास्त्र: भाग ८
मना अंतरीं सार विचार राहो

डॉ. रुपाली कुलकर्णी , ट्रेनिंग हेड , SWS
सणासुदीचे दिवस जवळ आहेत ! अनेक दुकानांवर, वर्तमानपत्रांत आणि विविध इ-कॉमर्स मोबाईल अँप्सवर “अमुक टक्के डिस्काउंट , महा-बचत सेल, बम्पर ऑफर्स ” इ. चे पोस्टर्स झळकायला सुरुवात झालेलीच आहे. ह्या सर्व ऑफर्सच्या माऱ्याचा आपल्या खरेदीच्या निर्णयावर / बजेटवर परिणाम होतोय का ? एखादवेळी, या जाहिरातबाजीला बळी न पडता, जागरूक राहून आपण (अनावश्यक) खरेदीचा निर्णय पुढेही ढकलतो पण रोज रोज तीच ती सूट / डिस्काउंटची ऑफर बघितली जाते आणि “डिस्काउंटची फ्रेम” लावून बघितलेली जाहिरात मोहक दिसू लागते ! यथावकाश, ही फ्रेम आपल्या मनाचा ताबा घेते आणि नको असलेली खरेदीही मग या आकर्षक वाटणाऱ्या फ्रेममुळे केली जाते !
गुंतवणूक क्षेत्राचे उदारहण घेऊयात. समजा तुम्ही वर्तमानपत्र वाचताना “शेअर बाजारात अमुक टक्के घसरण, गुंतवणूकदारांचे तमुक कोटी पाण्यात !!” ,असा बातमीचा मथळा वाचता ! साहजिकच तुमची प्रतिक्रिया काय होते ? “अरे बापरे, नको ती इक्विटी इन्व्हेस्टमेंट, आपले पैसे काढून घेतलेले बरे !!” आणि समजा हीच बातमी जर “शेअर निर्देशकाने मारली मोठी उसळी” अशा मथळ्याची वाचली तर ? तेव्हा प्रतिक्रिया मात्र अगदी उलट होते का ? म्हणजे “अरे वा, पैसे गुंतवायला पाहिजे ! चांगली संधी वाटतेय !” अशी होते का ? असे असेल आणि तुम्ही तत्परतेने आपले आर्थिक निर्णय त्याप्रकारे घेत असाल तर तुमच्यावर फ्रेमिंग बायसचा प्रभाव पडलेला आहे असे समजावे !! खरे म्हणजे वरील दोन्ही बातम्या आणि त्याचा तुमच्या असेट अलोकेशनवर होणारा परिणाम हा अभ्यासपूर्वक तपासायचा विषय आहे ! उदाहरणार्थ कधीतरी शेअर बाजार अशाही शेअर्समुळे कोसळू शकतो ज्यांचा तुमच्या सध्याच्या असेट अलोकेशनवर होणारा परिणाम हा नगण्य असतो ! पण ज्या पद्धतीने, ज्या फ्रेमद्वारे कोणतीही व्यक्ती अथवा मीडिया (न्युज चॅनेल्स, वर्तमानपत्रे, जाहिराती ) तुमच्यासमोर माहिती सादर करतात, ती सकारात्मक अथवा नकारात्मक पद्धत तुमच्या निर्णय घेण्याच्या क्षमतेवर, कळत नकळत परिणाम करत असते !

फ्रेमिंग बायस, ज्याला फ्रेमिंग इफेक्ट असेही म्हणतात, हा कुठल्याही वस्तू, घटना अथवा माहितीविषयी तुमचे मत बनवत रहातो ! माहिती कशी सादर केली जाते किंवा “फ्रेम” केली जाते यावर आधारित निर्णय घेण्यावर प्रभाव पाडत असतो. माहितीची रचना, सांगणाऱ्याची वृत्ती आणि हेतू ऐकणाऱ्याच्या निर्णयांवर प्रभाव टाकू शकतात. यामुळे अनेकदा विसंगत,चुकीचे निर्णय घेतले जातात. माहिती सकारात्मक किंवा नकारात्मक पद्धतीने सांगितली जाऊ शकते. गुंतवणूकदारांना माहिती देतांना सकारात्मक फ्रेमिंग संभाव्य नफा, फायदे किंवा यश यावर जोर देते, तर नकारात्मक फ्रेमिंग नुकसान, जोखीम किंवा संभाव्य अपयशांवर लक्ष केंद्रित करते. जेव्हा गुंतवणूकदार वास्तविक, सत्य,व्यावहारिक माहितीच्या ऐवजी माहिती कशी सादर केली जाते यावर आधारित निर्णय घेतात तेव्हा फ्रेमिंग बायसने प्रभावित निर्णय होतो. माहितीचे फ्रेमिंग गुंतवणूकदाराच्या जोखमीच्या आकलनावर प्रभाव टाकू शकते आणि त्यांच्या गुंतवणूक निर्णयांवर त्यामुळे परिणाम करू शकते.
असे करणे टाळावयाचे असल्यास आपण पुढील खबरदारी घ्यायला हवी !!
१) मूलभूत मुद्यांवर फोकस करणे: गुंतवणुकीच्या संधीचे मूल्यमापन करताना, माहिती कशी सादर केली जाते किंवा कशी तयार केली जाते यावर लक्ष केंद्रित करण्याऐवजी मूलभूत तथ्ये, डेटा आणि गोष्टींवर लक्ष केंद्रित करा. (उदा. गुंतवणुकीचे नियामक कोण आहेत, स्कीमची गुंतवणुक कोणत्या सेक्टर मध्ये आणि किती कालावधीसाठी आहे, फन्ड मॅनॅजमेण्टचे निकष काय आहेत इ). ठोस पुराव्यांच्या आधारे गुंतवणुक निर्णयाची छाननी करा. त्यासाठी स्कीमचे डेटाशीट, फॅक्टशीट तपासून पहा.
२) इन्व्हेस्टमेंट पोर्टफोलिओ डायव्हर्सिफाय करा: डायव्हर्सिफेकेशन अथवा विविधीकरण हे फ्रेमिंग बायसच्या प्रभावांना तोंड देण्यासाठी एक शक्तिशाली उपाय आहे. तुमची गुंतवणूक विविध मालमत्ता वर्ग, उद्योग किंवा प्रकारामध्ये असल्यास, तुम्ही तुमच्या एकूण पोर्टफोलिओवरील कोणत्याही एकाच फ्रेमिंगचा प्रभाव कमी करू शकता.
३) दीर्घकालीन दृष्टीकोन ठेवा: तुमची दीर्घकालीन गुंतवणुकीची उद्दिष्टे लक्षात ठेवा आणि तुमचे निर्णय त्या उद्दिष्टांना डोळ्यासमोर ठेवून घ्या. दीर्घकालीन दृष्टीकोन तुम्हाला अल्प-मुदतीच्या फ्रेमिंग पूर्वग्रहांचा प्रतिकार करण्यास आणि तुमच्या व्यापक गुंतवणूक धोरणाशी सहमत राहण्यास मदत करू करतो.
४) प्रश्न विचारा: सादर केलेला डेटा, घेतलेली गृहीतके आणि संभाव्य परिणामांबद्दल बद्दल निर्णायक प्रश्न विचारून माहितीच्या फ्रेमिंगला आव्हान द्या. असे केल्याने, कोणत्याही लपलेल्या पैलूला तुम्ही उघड करू शकता आणि अधिक माहितीपूर्ण मूल्यांकन करू शकता.
५) भावनिक प्रतिक्रिया टाळा: भावनिक प्रतिक्रिया फ्रेमिंग बायसचे परिणाम वाढवू शकतात. तुमच्या भावनिक प्रतिसादांबद्दल जागरूक राहा आणि फ्रेमिंगवर असा भावनांनी भारावून जाण्याऐवजी तर्कसंगत डेटावर आधारित निर्णय घेण्याचा प्रयत्न करा.
६) तंत्रशुद्ध निर्णयप्रकियेची पद्धती / फ्लो-चार्ट यांचे पालन करा: पद्धतशीर (Structured ) दृष्टिकोनाचे, पद्धतींचे, प्रोटोकॉलचे पालन केल्यास पूर्वग्रहांचा प्रभाव कमी होण्यात मदत होते.
७) अनुभवी आणि अभ्यासू आर्थिक सल्लागार नेमा: तुमच्या गुंतवणुकीच्या निर्णयांवर वस्तुनिष्ठ दृष्टीकोन आणि त्याआधारे सल्ला देऊ शकेल अशा अनुभवी आणि अभ्यासू आर्थिक व्यावसायिकाचा सल्ला घ्या. तो तुमच्या आर्थिक उद्दिष्टांच्या आधारे तुम्हाला मार्गदर्शन करू शकतो आणि संभाव्य पूर्वग्रह नेव्हिगेट करण्यास मदत करू शकतो.
तेव्हा वाचकहो, तुमच्या लक्षात आलेच असेल की माहितीच्या आधारे योग्य आणि तर्कसंगत पडताळणी करण्याची सवय, परिपक्व विचारसरणी आणि संरचित निर्णय प्रक्रिये याद्वारे आपण फ्रेमिंग बायसचा प्रतिकार करू शकतो आणि अधिक वस्तुनिष्ठ गुंतवणूक निर्णय घेण्याची आपली क्षमता वाढवू शकतो.
या संदर्भात, मनाचे श्लोक येथे वाचलेले समर्थ रामदासांचे वचन ‘मना अंतरीं सार विचार राहो’ ( आणि फ्रेमिंगचा बायस टळो ) हे आठवते आणि लागू पडते !
