गुंतवणूकदारांचे मानसशास्त्र: भाग ६
मना मिथ्य तें मिथ्य सोडूनि द्यावें !

श्री, रघुवीर अधिकारी, मुख्य कार्यकारी संचालक, SWS.
नमस्कार ! ‘गुंतवणूकदारांचे मानसशास्त्र’ या लेखमालाद्वारे आपण गुंतवणूकीला / गुंतवणूकीच्या वाढीस मारक ठरणाऱ्या आपल्या भावनांबद्दल चर्चा करत आहोत. आर्थिक व्यवहार करतांना पुर्वग्रहदुषित विचार केल्यामुळे आपल्या आर्थिक निर्णयांवर कसा परिणाम होतो जाणून घेण्यासाठी आपण “मेंटल अकाउंटीग” या संकल्पनेबद्दल बोलूयात.
नोबेल पारितोषिक विजेते अर्थशास्त्रज्ञ रिचर्ड थॅलर यांनी ‘मेंटल अकाउंटींग’ ही संकल्पना सर्वप्रथम सादर केली. खरे तर पैशांची / धनाची उत्पत्ती कुठूनही झाली तरीही सर्व पैसे समान असतात, त्याचे मूल्य तेच रहाते ! पण ‘मेंटल अकाउंटींग’ ने ग्रस्त असली की व्यक्ती आलेल्या पैशाला वेगवेगळी लेबल लावायला लागते. उदाहरणार्थ, अमुक एक पैसे बक्षिस म्हणून मिळाले, तमुक एक पैसे आहेर म्हणून मिळालेत, एखादी रक्कम पगार म्हणून घरत आलीय किंवा इतके एक पैसे बॅंकेचा हफ्ताच आहेत वैगरे ! असे पैशांचे वर्गीकरण आपण मनात कळत नकळत करत असतो. परंतु किराणामालासाठी वापरले तरी आणि बक्षीस म्हणून मिळाले तरी शंभर रुपयाचे मूल्य मात्र शंभरच राहते हे आपण आपल्या मनोव्यापारात सहजपणे विसरतो. बक्षीस मिळालेल्या शंभर रुपयांत आपण मौजमजा करणे पसंत करतो परंतु तेच शंभर रुपये इतरत्र खर्च करण्याची वेळ आली की मात्र आपण गांभीर्याने वेगळा विचार करायला लागतो. समान मूल्य असणाऱ्या पैशाला केवळ मानसिक अवस्थेमुळे आपण भिन्न वागणूक द्यायला लागतो. हेच आहे पैशांचे मेंटल अकाउंटीग !

अशा प्रकारे मेंटल अकाउंटिंग आपल्या मनाचा ताबा घेत असते आणि आणि आपल्याकडून होणाऱ्या आर्थिक निर्णयांवर परिणाम करत असते. जोपर्यन्त रक्कम किरकोळ असते किंवा कमी कालावधीसाठी आपण एखाद्या विशिष्ट कारणासाठी रक्कम राखून ठेवत असतो (उदा. किराणासामान हे लेबल लावून) तोपर्यंत मेंटल अकाउंटिंगचा फारसा परिणाम आपल्याला जाणवत नाही. परंतु मोठ्या रकमेच्या बाबतीत आणि दीर्घकालीन गुंतवणुकीच्या बाबतीत या भावनेने ग्रस्त असल्यास आपले आर्थिक निर्णय चुकू शकतात. हे समजून घेण्यासाठी काही उदाहरणे बघूयात.
१) कॅश की क्रेडीट ? बऱ्याचदा आपल्या पाकीटातुन पैसे खर्च करतांना आपल्या मनात ‘हे माझे कष्टाचे पैसे आहेत’, ही भावना प्रबळ असते. असे पैसे खर्च करताना आपण दोन-तीनदा पैसे मोजुन मग दुकानदाराला देतो. पण तेच पैसे क्रेडिट कार्डद्वारे खर्च करतांना मात्र जणुकाही ते पैसे माझ्या खात्यातुन जातच नाहीयेत अशा (मिथ्य) भावनेने, ऐटीत आपण क्रेडिट कार्ड दुकानदाराला देतो. त्यामुळे क्रेडिट कार्डद्वारे बऱ्याचदा जास्त खरेदी होतांना दिसते व आपण नकळतपणे क्रेडिट कार्डच्या कर्जाच्या सापळ्यात अडकतो. ( जे बॅंकांना हवेच असते आणि म्हणुनच बँकांकडुन क्रेडिट कार्ड घेण्यासाठी आर्जवी आवाजात फोन येत असतात !) फार कमी लोक क्रेडिट कार्डचा योग्य वापर करतात. बहुतांश लोक क्रेडिट कार्ड द्वारे अनावश्यक खरेदीतर करतातच आणि शिवाय बॅकांनाही मजबुत व्याजाचे उत्पन्न मिळवून देतात. क्रेडिट कार्डचा असा विनाविचार होणारा मुक्त वापर केल्यामुळे कर्जबाजारी झालेल्या अनेकांची उदाहरणे तुम्हालाही माहीतच असतील. तसेच गिफ्ट कार्ड्स / व्हाउचर्स वर असलेल्या पैशाला तुम्ही कमी लेखत आहात आणि त्याच वस्तु स्वतःच्या पगारातुन घ्यायची वेळ आली तर तुम्ही त्या खरेदी करणार नसाल तर तुम्ही मेंटल अकाउंटिंग या पुर्वग्रहाचे शिकार आहात असे समजावे. एखाद्याला वारसाहक्कात मिळालेली मोठी रक्कम जर मेंटल अकाउंटिंगमुळे, विनाकष्टाचीच तर आहे या भावनेने अशी सहजी उडविली जाणार असेल, तर आर्थिकदृष्ट्या ते घातकच !
२) भविष्यातून आर्थिक उचल : महागडी वस्तू एकरकमी घेणे परवडत नाही. पण EMI च्या मासिक पेमेंटचा त्यामानाने लहान दिसणारा आकडा बघून त्यावर आधारित निर्णय घेतले जातात. जर व्यक्ती कारसारखी मोठी खरेदी करणार असेल तर एकूण खर्च होणाऱ्या रकमेच्या दीर्घकालीन आर्थिक परिणामांकडे दुर्लक्ष केले जाते आणि ‘लहान रक्कम देणे परवडते’ यावर लक्ष केंद्रित होते. त्यामुळे ‘आपण एकूण किती रक्कम खर्च करतोय, ते करणे आपल्याला आर्थिक बाजू बघता चालणार आहे का ‘ अशा विचारांवर पडदा पडतो, त्यावेळी या विचारांना दुय्यम स्थान मिळते. असे वारंवार घडत राहिल्यास त्या व्यक्तीचे / कुटुंबाचे आर्थिक नियोजन कोलमडू शकते. कमी व्याजदरासह असलेली मोठी कर्जे निपटणे आर्थिकदृष्ट्या अधिक फायदेशीर असते ! (एक कोटीवर ८% ने, ८ लाख रु. व्याज येतेय आणि १ लाखावर १०% ने १०,००० रु व्याज होते) असे असेल तरीही लोक, प्रथम जास्त व्याजदरासह असलेली लहान कर्ज फेडण्यावर लक्ष केंद्रित करतात कारण शेवटी ‘कर्ज संपले’ ही भावना मानसिक शांती ,समाधान प्रदान करणारी असते. पण आर्थिकदृष्ट्या तपासून पाहिले असता असे करणे चुकीचे असते. इतर काही वेगळा दृष्टीकोण असल्याशिवाय, अशा असत्य भुलवणीला बळी पडता कामा नये.
३) आर्थिक नुकसान अथवा खर्चाला कमी लेखणे : समजा तुम्हाला बक्षीस म्हणून मिळालेल्या पाचशे रुपयांची नोट जर तुमच्याकडून हरवली तर तुम्हाला तितकेसे वाईट वाटत नाही. परंतु केलेल्या आर्थिक गुंतवणुकीत जर पाचशे रुपयांचे नुकसान झाले तर मनाला आर्थिक चुटपुट अधिक लागते. जरी दोन्हीबाबतीत सारखेच नुकसान झालेले असले तरी गुंतवणुकीतले नुकसान कष्टार्जित रकमेवर असते म्हणून सलते. तर बक्षीस म्हणून मिळालेल्या पाचशे रुपयांकडे ‘अवांतर धन’ पाहण्याची वृत्ती असते ! पैशाला असे ‘ कष्टार्जित’ / ‘अवांतर’ असे लेबल लावले गेले की संपत्तीचा यथामूल्य वापर करण्याचा विवेक बाजूला पडतो !
वरील सर्व उदाहरणे बघता, एका आर्थिक सल्लागाराच्या भूमिकेतून मी पुढील सार मांडू इच्छितो.
१) सर्व संपत्तीला / गुंतवणुकींना मानसिक श्रेणींमध्ये विभाजित करण्याऐवजी एकाच आर्थिक नियोजनाचा भाग म्हणून विचारात घ्यायाला हवे. धन बक्षीस, बोनस , इन्सेन्टिव्ह व वारसाहक्काने मिळालेले असोत विचारपूर्वक नियोजन करूनच वापरले / गुंतविले जावे !
२) यथार्थ मार्गाने आलेल्या सर्व संपत्तीचे / धनाचे / गुंतवणुकीचे नियमितपणे मूल्यमापन (Portfolio Review) करायाला हवे आणि ते तुमच्या एकूण आर्थिक उद्दिष्टांशी आणि जोखीम सहनशीलतेशी सुसंगत असल्याची खात्री करायाला हवी.
३) नफा किंवा तोटा यावर भावनिक प्रतिक्रियांऐवजी विश्लेषणावर आधारित गुंतवणूकीचे निर्णय घ्यायला हवेत.
४) तुमचा संपत्तीच्या बाबतीत मानसिक गोधळ होत असल्यास, त्याकडे तटस्थपणे पाहू शकणाऱ्या आर्थिक सल्लागारांचा सल्ला घ्यायाला हवा. अशावेळी वस्तुनिष्ठ मार्गदर्शन घेणे महत्वाचे ठरते आणि कुठलेही मानसिक ग्रह / पूर्वग्रह टाळण्यास मदत मिळते. (तज्ञ शल्यचिकित्सकहीआपल्या स्वतःच्या कुटुंबियांवर शस्त्रक्रिया करण्याचे टाळतात कारण प्रिय व्यक्तीच्या बाबतीत आपले मानसिक संतुलन कायम राहीलच याची त्यांना खात्री नसते आणि म्हणून गोंधळाच्या क्षणी ते अशावेळी तटस्थ राहू शकणाऱ्या शल्यचिकित्सकांवर भरवसा ठेवतात.)
तर मेंटल अकाउंटिंगच्या प्रभावाची जाणीव ठेवून त्यावर मात करण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करायला हवेत. असे केल्याने गुंतवणूकदार अधिक तर्कसंगत आणि प्रभावी आर्थिक निर्णय घेऊ शकतात. तेव्हा आपल्या मनावर पडणारा हा अकाउंटिंगचा पडदा जरा प्रयासपुर्वक सावरूयात ! सत्य काय आणि मिथ्य काय याचा पडताळा लावूनच आर्थिक निर्णय घेऊयात. समर्थ रामदासांच्याच शब्दात सांगायचे झाले तर,
” मना सर्वथा सत्य सांडूं नको रे। मना सर्वथा मिथ्य मांडूं नको रे॥
मना सत्य ते सत्य वाचे वदावे। मना मिथ्य तें मिथ्य सोडूनि द्यावें ॥ “
– अनुभव कथन :श्री श्री, रघुवीर अधिकारी, मुख्य कार्यकारी संचालक, SWS.
– शब्दांकन : डॉ. रुपाली कुलकर्णी , ट्रेनिंग हेड , SWS
