Money चे अंतरंग

Financial Literacy Initiative by SWS


एका बँकरचे अनुभव खाते : भाग १४: बँक /बँकर /ग्राहक – सायको आणि सायकोलॉजी.

माणसाची मानसिकता दाखवणारा एक हसरा आणि एक दुखरा अनुभव.

कामाला वाहून घेतलेली एक अधिकारी सखी. थेल्मा. कामात आकंठ बुडालेली असे. दिवसभर चहू बाजूंनी खातेधारकांनी घेरलेली असे. तिला मी म्हणायचे, बाई गं अधून मधून श्वास सुद्धा घेत जा. एवढं बुडून जाऊ नकोस कामात. ती फक्त हसायची आणि पुन्हा कॉम्प्युटरमधे डोकं घालून पुढच्या केसकडे वळायची. करेल ते काम परफेक्ट, पक्कं आणि वेळेवर वगैरे. नो नॉन्सेन्स.

तर त्या दिवशीची गोष्ट. दुपारी दोनला ब्रांचमधे असाच माणसांचा समुद्र सांडलेला होता. आणि थेल्माला फोन आला. कोणाला तरी कुठलासा एक फॉर्म भरायचा होता, तेव्हा तो फॉर्म नेमका कसा भरायचा याची विचारणा पलीकडून होत होती. वरपासून खालपर्यंत प्रत्येक कॉलम विचारत विचारत समोरच्या बाईने फॉर्म पूर्ण भरून घेतला. तेही फोनवरच्या संभाषणाच्या आधारे. आमच्या या संयमी सखीने सुद्धा प्रत्येक गोष्टीची व्यवस्थित माहिती दिली, ते ही बँकेत समोर ग्राहकांचा महापूर असताना. शेवटी अति झालं. समोरची प्रश्नावली संपेचना. फॉर्म भरून झाल्यावर अवांतर शंका सुरू झाल्या तेव्हा मात्र ही म्हणाली, मॅडम पूर्ण फॉर्म भरण्याबाबत माहिती मी तुम्हाला आधीच दिली आहे, या उप्पर काही शंका किंवा प्रश्न असले तर प्लीज तुम्ही ब्रांचला येऊन त्या गोष्टी क्लिअर करा. वास्तविक हे सुद्धा तिने शांत शब्दातच सांगितलं होतं.

आणि तिने फोन ठेवला आणि ब्रांचमधल्या प्रत्यक्ष किंवा समोर असलेल्या ग्राहकांकडे आणि त्यांच्या शंका समस्यांकडे मोर्चा वळवला. दुसऱ्या मिनटाला पुन्हा फोन खणखणला. “ब्रांचला मी कधी येऊ?”
थेल्मा : “आता ते सुद्धा तुम्ही मलाच विचारणार का?”
फोनवरची महिला: “ब्रांच किती वाजेपर्यंत चालू असते ?”
थेल्मा : “तीन पर्यंत.”
फोनवरची महिला: “शी… म्हणजे माझं काम नाहीच होणार.”
फोन कट.

संध्याकाळी पाच वाजले. डेस्कवरचं काम आटोक्यात आलेलं. मुख्य म्हणे समोर माणसांचा समुद्र नव्हता. थेल्मा आता थोडी शांत मूड मध्ये होती. सकाळ आणि दुपारची तडतड संपली होती. पुन्हा फोन खणखणला. पुन्हा त्याच बाईचे नवे प्रश्न. आता थेल्माने त्या प्रश्नांची नव्या शांततेने उत्तरं दिली. सगळ्या शंकांचं निरसन केलं.
पलीकडची बाई खुश होती. फोन ठेवता ठेवता म्हणाली “तुम्ही किती छान उत्तरं दिलीत. नाहीतर ती दुपारची बाई किती वाईट्ट पद्धतीने बोलत होती. कोण होती हो ती ऊद्धट बाई ? अशा लोकांना ठेवायलाच नको बँकेने नोकरीत. सांगा तुमच्या साहेबांना !!”
थेल्माला अजिबात राग नाही आला. उलट ती मनापासून खळखळून हसली. किती मजेदार असतात नाही आपले ग्राहक. आणि तिचा दिवसाभरचा शीण पार पळून गेलेला.
ग्राहकच कधीकधी डोकेदुखी देतात आणि ग्राहकच त्यावरचा ऊतारा सुद्धा देतात अगदी बिनपैशात …. ते हे असं.


वरचा किस्सा माणसाच्या वर्तनाशी निगडित मजेदार किस्सा म्हणूया पण बँक ग्राहक काही हळवे आणि जीवाला चटका लावून जाणारे अनुभव सुद्धा देऊन जातात.
ग्राहकांच्या पार्टनरचं जाणं वगैरे बॅंकर्सना अनेकदा अनुभवावं लागतं आणि त्यानंतरच्या औपचारिकता सुद्धा निभवाव्या लागतात. मान्य आहे आपण मानसोपचार तज्ञ वगैरे नाही पण मानस वाचक तर आहोत नक्कीच.

मिस्टर अशोक. वय सत्तरच्या पुढे. नेहमी उत्साहात असणारे. येऊन सगळ्यांशी हसून बोलून राहणारे, कधी एकटे कधी जोड्यानं.
त्या दिवशी ते आले आणि दुःखी स्वरात म्हणाले “बायको गेली.” माझा एक निःशब्द पॉझ. फक्त ऐकावे. बोलू नये काही. “नंतर पंधरवड्यातच माझी अँजियोप्लास्टी करावी लागली . महिनाभर कुठे जात येत नव्हतो. त्या नंतर आज पहिल्यांदा बँकेत आलोय”. बोलायचे म्हणून मी चार शब्द बोलले बस.


ते आपलं काम करून ते निघून गेले . ते बोलणं तेवढ्यावरच राहिलं. नंतर एकदा ब्रांच बाहेर पडले. मिस्टर अशोक रस्त्याच्या पलीकडच्या बाजूनं चालले होते. मला बघून तिकडूनच हात हलवला. पण ….आज त्यांच्या हातात काठी होती. ओह ! अगदी मागच्या महिन्यापर्यंत सहज उत्साहाने बँकेत येऊन गप्पा टप्पा करणारा माणूस. आज काठी टेकत सावकाश चालत होता.

का ? कसं ?कधी ? काय ? बिन उत्तरांचे किंवा ठाऊक असलेल्या उत्तरांचे प्रश्न. असं का व्हावं ? वयाप्रमाणे हे असं व्हायचंच किंवा हजार प्रकारचे ग्राहक त्यांचा हजार तऱ्हा असायच्याच म्हणून सोडून देऊ शकतो आपण हे सगळं.


पण …. गोष्टी छोट्या असल्या तरी छोट्या नसतात , खूप खोल तरी भिडतात नाहीतर खूप ऊंची घेऊन येतात .

स्मिता गानू जोगळेकर.
9892551950
smita_dj@hotmail.com


Discover more from Money चे अंतरंग

Subscribe to get the latest posts sent to your email.



Subscribe Here

About Us

Welcome to SWS Financial Solutions Pvt Ltd, a leading financial advisory firm established in 1995, with a commitment to providing our clients with sound financial advice and personalized financial solutions. Our team of Certified Financial Planners (CFPs), Registered Investment Advisors (RIAs), Chartered Financial Analysts (CFAs), and Chartered Accountants (CAs) are dedicated to providing comprehensive financial planning and wealth management services to individuals, families, and businesses. Read more @ https://www.swsfspl.com/