Money चे अंतरंग

Financial Literacy Initiative by SWS


SWS: ३१ वा वर्धापनदिन विशेष : श्री. रघुवीर अधिकारी (C.E.O.) यांच्या लेखणीतून…

मी गेली एकतीस वर्षे वित्तीय सेवा क्षेत्रात काम करत आहे. या कालावधीत मी अनेक आर्थिक चक्रे पाहिली जसे की तेजी, मंदी, घसरण, उत्साह, भीती, धोरणात्मक बदल आणि कोरोनासारखे अनपेक्षित धक्के. पण या सर्वांमध्ये एक गोष्ट कायम राहिली — मानवी भावना, त्यापायी घेतले जाणारे निर्णय आणि त्यांचा आर्थिक नियोजनावर होणारा परिणाम. या दीर्घ प्रवासात मला एक गोष्ट वारंवार अनुभवायला मिळाली आहे — आर्थिक निर्णय हे नेहमी तर्कशुद्ध असतातच असे नाही. अनेकदा हे निर्णय मनातील विविध भावना जसे राग, नाराजी, अहंकार, भिती किंवा अपूर्ण माहिती यांच्या प्रभावाखाली घेतले जातात. Behavioral Finance ही शाखा नेमकी याच मानवी मानसिकतेचा अभ्यास करते. माझा अनुभव सांगतो की चुकीच्या आर्थिक निर्णयांचे मूळ बहुतांश वेळा बाजारातील चढउतार किंवा तेथील घडामोडी यात नसून निर्णय घेतानाआपल्या भावना, मार्केट बाबतच्या आपल्या प्रतिक्रिया किंवा घाईच्या निर्णयांमध्ये असते.


भीतीपोटी घेतलेले निर्णय, अधिक परताव्याच्या लोभापायी उचललेली पावले, स्वतःचे नियोजन सोडून इतरांच्या अनुभवावर आधारित आर्थिक अनुकरण करणे यामुळे संपत्ती निर्माण करण्याचा प्रवास भरकटतो आणि माणुस आपल्या आर्थिक ध्येयांपासून दूर जातो.

संपत्ती निर्माण(Wealth Creation) : आर्थिक गणितांपेक्षा मानसिक शिस्तीचे पालन करण्यात आर्थिक यशाचे गमक दडलेले आहे.  

संपत्ती निर्माण म्हणजे केवळ गुंतवणूकींचे  योग्य पर्याय निवडणे नसते. हा एक मानसिक प्रवास  सुद्धा आहे. या प्रवासात संयम, सातत्य आणि स्वतःच्या निर्णयांवर विश्वास ठेवणे अत्यावश्यक असते. बाजारातील चढ-उतार, बातम्यांचा गोंगाट, माहितीचा मारा किंवा इतरांच्या मतांचा प्रभाव यामुळे मनात अनेकदा संभ्रम निर्माण होतात. परंतु योग्य वेळी, विचारपूर्वक घेतलेलया निर्णयांचे पालन हीच खरी गुंतवणुकीतील शिस्त आहे जी तुम्हाला तुमचे आर्थिक ध्येय गाठण्यास मदत करत असते.  आर्थिक नियोजन तयार करणे, त्याचे प्रामाणिकपणे पालन करणे आणि ठराविक काळाने शांत मनाने त्याचा आढावा घेऊन तज्ज्ञांच्या मदतीने त्यात बदल करणे यासाठी मानसिक स्थैर्य आवश्यक असते. ज्याच्याकडे हे स्थैर्य असते त्याचा संपत्ती निर्माण करण्याचा मार्ग सुकर होतो.

SWS ची भूमिका : मार्गदर्शकाची !

या एकतीस वर्षांत आम्ही एक महत्त्वाची गोष्ट शिकलो — ग्राहकांना सर्वाधिक गरज असते ती बाजारातील चढउतारांच्या बाबतीतील अपडेट्सपेक्षा ते सामावून घेऊन योग्य दिशा दाखवणाऱ्या सल्ल्याची. म्हणूनच SWS मध्ये आम्ही नेहमीच प्रॉडक्टपेक्षा प्रक्रियेवर, परताव्यापेक्षा संयत वर्तनावर आणि अल्पकालीन परिणामांपेक्षा दीर्घकालीन उद्दिष्टांवर भर दिलेला आहे. आर्थिक सल्लागाराची खरी भूमिका म्हणजे केवळ बाजारातील चढउतार ग्राहकांना समजावणे अशी नसून त्या चढउतारांच्या काळातही योग्य निर्णय घेऊन त्यावर ठाम राहण्याची मानसिक ताकद देणे अशी असते.

आगामी काळ अनिश्चित असेल — पण तो संधींनी भरलेलाही असेल. योग्य दृष्टिकोन, वर्तनात्मक शिस्त, सुयोग्य नियोजन आणि भावनांवर नियंत्रण हीच भविष्यासाठी सर्वात मोठी सुरक्षा आहे.

या प्रवासात आमच्यावर विश्वास ठेवणाऱ्या सर्व ग्राहकांचे, सहकाऱ्यांचे आणि त्यांच्या कुटुंबियांचे मनःपूर्वक आभार. आपला विश्वास हाच SWS चा खरा पाया आहे.

निष्कर्ष: मानसिक आरोग्य आणि आर्थिक शिस्त यांचा अतूट संबंध आहे. भीती, लोभ, घाई किंवा तुलना या भावना गुंतवणूकीचे चुकीचे निर्णय घडवू शकतात. मात्र  भावनांवर नियंत्रण, दीर्घकालीन दृष्टीकोन आणि शिस्तबद्ध कृती मनःशांती देतात. नियोजन केले म्हणून संपत्ती निर्माण होत नाही. ते सातत्याने पाळले तरच आपल्याला अपेक्षित परिणाम दिसतात. नियमित गुंतवणूक आणि संयमित पुनरावलोकन— हीच आर्थिक समृद्धीची गुरुकिल्ली आहे.

शेवटी या वर्धापनदिनानिमित्त एकच संदेश — बाजारावर लक्ष ठेवा, पण आपल्या विचारांवर, वर्तनावर त्याहून अधिक लक्ष ठेवा. कारण दीर्घकालीन आर्थिक यशाचे सूत्र हे आपल्या वर्तनात दडलेले आहे.


श्री. रघुवीर अधिकारी,

मुख्य कार्यकारी अधिकारी


Discover more from Money चे अंतरंग

Subscribe to get the latest posts sent to your email.



Subscribe Here

About Us

Welcome to SWS Financial Solutions Pvt Ltd, a leading financial advisory firm established in 1995, with a commitment to providing our clients with sound financial advice and personalized financial solutions. Our team of Certified Financial Planners (CFPs), Registered Investment Advisors (RIAs), Chartered Financial Analysts (CFAs), and Chartered Accountants (CAs) are dedicated to providing comprehensive financial planning and wealth management services to individuals, families, and businesses. Read more @ https://www.swsfspl.com/