कालपर्यंत आपण बाह्य परिस्थिती शांत असतांना गुंतवणुकीबद्दल बोलत होतो. आज बाहेर युद्ध आहे.
कालपर्यंत आपण दीर्घकाळ फायदे देणाऱ्या आर्थिक नियोजनाबद्दल बोलत होतो. आज बाजारात Sensex घसरतो आहे.
कालपर्यंत गुंतवणुकदार स्थिर मनाने आपल्या गुंतवणुकीकडे पाहत होते. आज त्यांच्या मनात चलबिचल सुरु आहे.
पण तटस्थ, विवेकपूर्ण विचार करता असे निदर्शनास येते की गुंतवणुकदारांच्या मनात जी घालमेल सुरु आहे तिचे मूळ बाजारातील चढउतारात नसून मनात उडालेल्या भावनांच्या कल्लोळात आहे !
सध्या इराण आणि इस्त्रायल यांच्यातील संघर्ष तीव्र झाला आहे. अमेरिकेचा सहभाग वाढल्याने परिस्थिती अधिक गुंतागुंतीची बनली आहे. अयातुल्ला अली खामेनी यांच्या मृत्यूच्या बातम्यांमुळे राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता व्यक्त होत आहे. कच्च्या तेलाच्या किमती वाढल्या आहेत, सोन्याचे दर चढत आहेत. जागतिक बाजारात अस्थिरता वाढली आहे.

या पार्श्वभूमीवर गुंतवणूकदारांच्या मनात नैसर्गिकपणे अस्वस्थता निर्माण होते. तेव्हा महत्त्वाचा मुद्दा हा ठरतो की — आपण बाजारातील हालचालींवर प्रतिक्रिया देत आपले आर्थिक निर्णय बदलणार आहोत की आपल्या ठरवलेल्या आर्थिक आराखड्यानुसार त्याचे पालन करत राहणार आहोत ?
Behavioral Finance मध्ये आपल्या वर्तनामुळे कसे परिणाम घडतात त्याची एक साखळी सांगितलेली आहे.
घटना → भावना → विचार → वर्तन → परिणाम
सद्य परिस्थितीत ही साखळी काय आहे तर….
घटना — युद्ध, राजकीय अस्थिरता, बाजारातील घसरण.
भावना — भीती, अनिश्चितता, असुरक्षितता.
विचार — “बाजार अजून पडेल का?”, “माझी गुंतवणूक सुरक्षित आहे का?”
वर्तन — घाईघाईने विक्री (Panic Selling) / SIP थांबवणे.
परिणाम — दीर्घकालीन उद्दिष्टांना धक्का.
आता एक उदाहरण घेऊन भावनांनी उदयुक्त मानवी वर्तन कसे असते ते बघूया.
समजा सुरेश आणि रमेश हे दोन गुंतवणूकदार आहेत. दोघांनीही १५ वर्षांच्या उद्दिष्टांसाठी गुंतवणूक केली आहे — मुलांचे शिक्षण, निवृत्ती नियोजन आणि आर्थिक स्वातंत्र्य. आता युद्धाच्या बातम्यांनंतर Sensex ८–१०% खाली येताना ते बघतात.
सुरेश सतत बातम्या पाहतो. तो अस्वस्थ होतो. काही Equity Funds मधून रक्कम काढतो. SIP तात्पुरती थांबवतो. त्याला वाटते की त्याने संभाव्य आर्थिक नुकसान टाळले आहे. पण प्रत्यक्षात त्याने आपल्या भीतीपोटी निर्णय घेतला आहे.
रमेशही हे परिस्थिती पाहतो. पण तो विचार करतो की — ‘माझे उद्दिष्ट १५ वर्षांचे आहे. ही तात्पुरती घडणारी घटना झालेले नियोजन बदलण्यासाठी नक्की निर्णायक आहे का?’ तो आपला पोर्टफोलिओ तपासतो. Sensex खाली आल्यामुळे Equity चे प्रमाण कमी झाले असेल तर तो Asset Allocation प्रमाणे Rebalance करतो. तो संपूर्ण धोरण बदलत नाही. त्याची SIP सुरूच राहते.
बाजारात जोखीम ही असतेच. Sensex वरखाली होणे हा तर बाजाराचा गुणधर्म आहे. Volatility ही अपवादात्मक घटना नाही; ती बाजाराचा स्वभावधर्म आहे. परंतु अर्थव्यवस्था आणि व्यवसाय हे दीर्घकालीन दृष्टिकोन ठेवून चालत असतात. उद्योग वाढतात, तंत्रज्ञान बदलते, उत्पादकता वाढते — आणि या सगळ्यांमुळे अर्थव्यवस्था पुढे सरकते. म्हणूनच दीर्घकालासाठी केलेल्या गुंतवणुकीमध्ये परतावाही अधिक असतो.
तेव्हा दीर्घकालीन गुंतवणूकदारांनी आपल्या उद्दिष्टांची आठवण ठेवावी, पोर्टफोलिओचे पुनरावलोकन करावे, Asset Allocation तपासावे आणि आवश्यक तेवढेच बदल करावेत. SIP गुंतवणूकदारांसाठी अस्थिरता ही संधी असते. बाजार खाली आला की कमी किमतीत अधिक युनिट्स मिळतात. यालाच Rupee Cost Averaging म्हणतात. ज्यांच्याकडे नवीन निधी आहे त्यांनी आर्थिक सल्लागाराशी चर्चा करावी, Risk Profile समजून घ्यावी आणि टप्प्याटप्प्याने गुंतवणूक करावी
निष्कर्ष
या लेखमालिकेद्वारे आपण शिकणार आहोत की बाजाराचा अंदाज बांधण्यापेक्षा स्वतःला समजावून घेणे आवश्यक असते. गुंतवणुकीतील सर्वात मोठा धोका युद्ध नाही. तो बाजारातील घसरणही नाही. तो आहे — अनियंत्रित भावना. युद्ध बाहेर असते. भीती आत असते म्हणून “Buy” किंवा “Sell” हा निर्णय आपल्या मनात घेतला जातो जो Rational / विवेकनिष्ठ असतोच असे नाही. अशा परिस्थीतीत आपल्या गुंतणवूक सल्लागाराची मदत घेणे केव्हाही श्रेष्ठ !
टीम SWS
संपर्क : श्री. विक्रांत राठोड
75078 84477

