–
प्रिय गुंतवणूकदार, हितचिंतक आणि संपूर्ण SWS टीम.. संस्थेच्या ३१ व्या वर्धापनदिनानिमित्त हा लेख लिहितांना मला निरतिशय आनंद होतो आहे. याचे मुख्य कारण म्हणजे तंत्रज्ञानाच्या अफाट प्रगतीच्या वेगात आणि कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (AI) युगातही, आमच्या व्यावसायिक प्रवासात आपण सर्वांनी संस्थेवर दाखवलेला अतूट विश्वास !!
आज AI च्या साह्याने अगदी काही सेकंदांतच, इतर माहितीप्रमाणेच विमा आणि गुंतवणूकीच्या संदर्भातही हवी असलेली माहिती, आकड्यांचे विश्लेषण, गुंतवणूक आणि विमा पर्यायांची तुलना इ. डेटा आपण सहजपणे मिळवू शकतो. याशिवाय गेल्या काही वर्षांच्या कालावधीत आपण अनेक ऑनलाईन गुंतवणूक प्लॅटफॉर्म्स आणि या संदर्भातील मोबाईल ऍप्लिकेशन्सचा उदय झालेला पाहत आहोत. असे असतांनाही, आपल्या सर्वांच्या विश्वासाच्या आणि सहकार्याच्या भक्कम आधारवर संस्थेची व्यावसायिक घोडदौड सुरु आहे. गेल्या वर्षीच संस्थेने रु. १००० कोटींच्या मालमत्ता व्यवस्थापनाचा टप्पा गाठलेला आहे.
हे यश मला हेच दर्शविते आहे की जवळच्या, विश्वासाच्या व्यक्तीची जागा आणि त्याद्वारे मिळणाऱ्या मानसिक आधाराची आणि मनः शांतीची जागा तंत्रज्ञान कितीही प्रगत झाले तरी घेऊ शकत नाही. SWS टीममधील प्रत्येक जण, तुमच्याशी व्यावसायिक देवाणघेवाणीच्या पलीकडे जाऊन वैयक्तिक ऋणानुबंधांनानेही बांधला गेलेला आहे. आणि आपल्यातील या सौदार्हयामुळेच संस्थेच्या प्रगतीचा आलेख उंचावतो आहे.
याची अधिक कारणमीमांसा करताना मला पुढील मुद्दे प्रकर्षाने जाणवतात.
. वैयक्तिक आर्थिक सल्लागार : तुमचा सहृदयी मित्र: डिजिटल युगात अनेकविध माध्यमांतून माहितीचा मारा आपल्यावर होत आहे. हातासरशी (की बोटांसरशी ?) हवी ती माहिती उपलब्ध होत असतांनादेखील बहुतांश ग्राहक आमच्याशी फोनवर किंवा प्रत्यक्ष भेटीत झालेल्या चर्चांमधूनच आपले आर्थिक निर्णय घेतांना दिसत आहेत. म्हणजेच संपत्तीसारख्या महत्वाच्या बाबतीत ‘यांत्रिक कृत्रिम सेवांपेक्षा’, आपल्या ओळखीच्या, विश्वासाच्या आणि यथोचित ज्ञान संपादित केलेल्या सल्लागावरच ग्राहकांची भिस्त आहे. कारण SWS टीम मधील एक तरी व्यकती तुमच्या कौटुंबिक आणि भावनिक विश्वाला समजावून घेणारा एक कौटुंबिक,सहृदय मित्रच बनलेला आहे.
. व्यावसायिक कौश्यल्यांचे अद्यतन: SWS मध्ये ‘Market Research & Strategy Team’ हे नवीन डिपार्टमेंट कार्यरत झाले आहे. बदलत्या मार्केट परिस्थितीचा, गुंतणवूक क्षेत्रात होणाऱ्या बदलांचा अभ्यास करणारी आणि FinTech क्षेत्रांतील टूल्सचा वापर करून ग्राहकांच्या पोर्टफिलिओचे अचूक पुनरावलोकन करणारी टीम आता इथे कार्यरत झालेली आहे. त्यामुळे पोर्टफिलिओमध्ये आवश्यक असणारे बदल, त्याची नवीन संरचना कशी असावी याबाबतच्या शिफारशी आणि त्यानुसार लगोलग पुरविल्या जाणाऱ्या सेवा आमच्या ग्राहकांना भावत आहेत. ‘उत्तम, तत्पर, अचूक व्यावसायिक सेवा’ हे संस्थेच्या प्रगतीचे जुने पण नवीन स्वरूपातील मापदंड ग्राहकांना भावत आहेत.
. सामाजिक भावनेची जोपासना: कुठल्याही संस्था किंवा व्यक्तीचे खरे स्वरूप, दैनंदिन व्यवहारांच्या पलीकडे गेल्यावरच लक्षात येते. म्हणजे कुठलाही आर्थिक / वैयक्तिक फायदा नसतांना पत्करलेले आचरण किंवा दिलेल्या सेवा, केलेली मदत, सहकार्याचा पुढे केलेला हात, सामाजिक प्रश्नांबाबत दाखवलेली संवेदनशीलता अशांसारख्या बाबी संस्थेची मूल्ये, संस्कृती यांचे दर्शक असतात. बहुसंख्य ग्राहकांना याची कल्पना आहे की अल्पारंभ फाऊंडेशनच्या माध्यमातून टीम SWS नेहेमीच विविध गरजू शैक्षणिक संस्था, विशेष अथवा दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी कार्य करणाऱ्या संस्था, भारतीय संस्कृतीचा प्रचार करणाऱ्या संस्था यांना मदतीचा हात देण्यासोबतच आपल्या संस्कृतीस आणि पर्यावरणास भेडसावणाऱ्या प्रश्नांवर कार्यरत असते. स्व. रतन टाटा याबाबत आमचे आदर्श आहेत. टाटांइतका मोठा नसला तरी आमचा खारीचा वाटा आम्ही उचलत आहोत. मला असे वाटते की एक संस्था म्हणून ‘सर्वंकष आणि सर्वसमावेषक प्रगती’ ची आस आम्हाला नेहेमीच असते. आणि या प्रवासात माणसांना आणि मनांना जोडणारा, संपूच नये असा एक सेतू आपोआप तयार होत आहे.
या विस्तारलेल्या या डिजिटल, यांत्रिक युगात, प्रामुख्याने वरील कारणे संस्थेच्या प्रगतीस कारणीभूत ठरली आहेत आणि भविष्यातही ठरणार आहेत. तेव्हा या वर्धापनदिनी मी ही आशा करतो की या मूल्यांच्या जोरावर आपले नाते अधिक दृढ आणि समृद्ध होवो, तुमच्या स्वप्नांना साकार करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोतच. संस्थेचा प्रवास यशदायी करण्यात सिंहाचा वाटा असणाऱ्या तुम्हा सर्व ग्राहकांचे मनःपूर्वक आभार !


श्री. दिपक कुलकर्णी,
व्यवस्थापकीय संचालक.
