–

आम्हा बॅंकर्सचा डोलारा उभा असतो आमचा सेक्युरिटी गार्डच्या जीवावर. तर नोटबंदीचे दिवस. एरव्ही सुद्धा सदैव दक्ष, कोणत्याही कामाला कधीही नाही न म्हणणारा आमचा सिक्युरिटी गार्ड, आमच्या कुटुंबातीलच सदस्य सुभाष सिंग गेले तीन दिवस जो भिंगरीसारखा गरगरतोय, कॅशशी संबंधित प्रत्येक हालचालीवर घारीसारखी नजर ठेवत, स्टाफसाठी खाणं चहा अतिशय आत्मीयतेने करतोय. पाचसातशे किंवा कमीअधिक क्राऊड मॅनेज करणं, लोकांचा शिव्याशाप खाऊन आपल्या आतल्या माणसांना किंचितही झळ पोहोचू न देणं अबोलपणे चालू आहे…..सुभाष सिंग तुला केवळ सलाम.
एक गार्ड कमी पडेल म्हणून जास्तीचा हँड म्हणून आलेला रणबीर सुभाषच्या तोडीस तोड. डयुटी करुन शेवटी साडेसहाला मला म्हणाला, “मॅडम जी मेरा अपना पैसे बदली करके लेना भूलही गया.”
म्हंटलं, “बाबारे, तुला कसं नाही म्हणणार मी. तुझे वेगळे आभार मानायला माझ्याकडे शब्द नाहीत.” पैसे देताना लक्षात आलं, रणबीरचे डोळे लालभडक झाले होते आणी त्यातून घळाघळा पाणी येत होतं.
डोळ्यांना काय झालं म्हणून विचारलं तर पठ्ठ्या आधी बोलायला तयार नाही, फारच खोदून चौकशी केल्यावर म्हणाला, “बँकेची एक्स्ट्रा डयुटी लागली”. पण त्याच्या शेड्युल मधे असलेली रात्रीची पूर्वनियोजित डयुटी टाकता येत नाही म्हणून रात्री दुसऱ्या बँकेत आणि दिवसा आमच्या बँकेत असं गेले चार दिवस २४ तास तो मिनिटभरही न झोपता काम करतोय. आमच्या तेरा तास कामाचं कौतुक बाजूला ठेवत त्याला म्हंटलं, “रणबीर, आधी आतल्या रूममध्ये जाऊन अर्धा तास शांत बस, एखाद डुलकी काढ.”
किंचीत हसत तो म्हणाला “आप फिकर ना करो, हम सब संभाल लेंगे.”
अरे कोण कोणाला सांभाळणार आहे या परिस्थितीत. आणि तुमचे चार शब्द सुद्धा आम्हाला हत्तीचं बळ देऊन जातायत. हम संभाल लेंगे ?
सुभाष आणि रणबीर, कुठल्या मातीचे बनलेले आहेत रे तुम्ही. तुम्ही बाहेरचा समुद्र लीलया सावरता आणि आम्ही आमचा कर्तृत्वाचे ढिंढोरे पिटतो.
बॉस, आप लोग हो, इसलिये हम है.
आणि पुढचा हा दुसरा प्रसंग, माणुसकीला काळिमा लावेल असा. एकाच दिवसातले दोन भिन्न अनुभव.
बॅंकेतलं काम उशिराने आटोपलं. ज्वेलर शॉप मधे काम करणारा कमलेश जायला निघाला. बऱ्याच जुन्या नोटा भरल्यानंतरही अजून बऱ्याच भरायच्या बाकी राहिलेल्या. त्याच्या नजरेत अस्वस्थता. तो तिथेच घुटमळत होता. कदाचित मालकाने माथ्यावर मारलेलं टार्गेट किंवा एक्स्चेंज मधून मिळणारं कमिशन किंवा कटचं गाजर. कमलेश निघाला. माझ्या कौंटरपाशी पुन्हा थबकला.
“आप आती नही दुकानमें. आ जाईये …..”, शब्दात मध घोळवत तो म्हणाला.
माझा एक जळजळीत कटाक्ष.
“मतलब कुछ सोनाविना खरीदना हो तोssss …मेरा मतलब ….! “
परमेश्वरा … परिस्थिती काय आणि हा बोलतोय काय? शे पाचशे रुपयांचं आमिष दाखवून तो मला माझ्या संस्थेशी, संस्थेच्या सिस्टमशी गद्दारी करायला सांगतोय…. उफ्फ ..!!
नॉर्मलच्या तिप्पट आवाजात (माझ्या एरव्हीच्या टोनशी पूर्णतः विसंगत) माझं एकच खरमरीत चरचरीत वाक्य “आपकी दुकानमे ना मै पहले कभी आई थी, और जिंदगीमें कभी आनेका चान्स नहीं है ….. समझमें आ रहा है कुछ! “
बाजूच्या घुटमळणाऱ्या चार दुकानदार ग्राहकांना योग्य तो मेसेज पोहोचला होता.
हा लोचटपणा, निर्लज्जपणा बँकवाले सर्रास सोसत होते. आमच्या आणखी एक कलीगला, एक कापड दुकानदार म्हणाला “आपने पहेना है उस टाईपके कुर्तेमें अपने पास बहोत व्हेरायटी है; कभी आ जाईये दुकानपर” तिनेही तिखट शब्दांत त्याला काय ते सुनावलं.
आमच्या सुदैवाने आमच्या शाखेत ही स्पेशल डिस्काऊंट किंवा स्पेशल ऑफर्स घ्यायची भयंकर कीड लागलेली नव्हती त्यामुळे समोरून येणाऱ्या बेशरम प्रस्तावांना आम्ही ताठ मानेने खरमरीत उत्तर देऊ शकलो. सगळं खणखणीत निभावून नेऊ शकलो.
माझ्या कलिग्जना त्यासाठी खूप प्रेम आणि कडक सलाम.

स्मिता गानू जोगळेकर.
9892551950
smita_dj@hotmail.com
