–

नोटबंदीची सूचना आणि आलेला सुट्टीचा शनिवार. ब्रांच मधल्या तिघांनी आपली सुट्टी रद्द करून टाकली. आज बँकेला माझी जास्त गरज आहे ही भावना मनात जागी ठेवून. ओव्हरटाईम बद्दल कोणी चकार शब्द काढला नाहीये, बँकेची वेळ टळून गेल्यावरही सगळे शांतपणे काम करताहेत… या गोष्टी कोणत्या मापात तोलणार सांगा. टीकाटिप्पणी करणारे महाभाग बँकवाल्यांच्या नावाने खडे फोडतात, बँकेचे चिमूटभर सेटलमेंट झाल्यावर याच मंडळींच्या भुवया उंचावतात. वास्तविक सरकार आणि जनता यांच्यातले आम्ही माध्यम आहोत, बस ! आणि आमची अवस्था ढोलकी सारखी. दोन्ही कडून फक्त थपडा खाणे.
नोटबंदीचा दुसरा दिवस, ‘प्रचंड’ हे विशेषण कमी पडावे असा शीण घेऊन घरी आलेली बँकवाली बाई आणि राहवलं नाही म्हणून मध्यरात्री बारा वाजता लिहून ठेवलेलं हे टिपण.
रात्री नऊ वाजता ब्रांचममधून बाहेर पडले तर एक रिक्षावाला कसल्याशा चौकशीसाठी मोठया गेटबाहेर उभा. चेहरा ओळखीचा. ओह, हा आपला कस्टमर आहे होय.
म्हणाला “आईए मॅडम, आपको छोड देता हुं”
म्हंटलं, “मैं चली जाऊंगी.”
हे चार वेळा झालं. हो=हो….. नको-नको.
“मै जानता हुं आप कहाँ रहेती है.”
म्हटलं, “आप ऊस तरफ रहेते है क्या ?” , तर म्हणे नाही.
फारच झालं आणि मी बसले.
वाटेत अर्थात दिवसभराच्या उलथापालथी बद्दलच्या गोष्टी आणि संबंधित बडबड चालू.
माझं उतरायचं ठिकाण आलं, त्याला म्हंटलं गेटके पास रोक दिजीए.
तर म्हणे, नही, मै आपको बिल्डींगकी सीढी तक छोडूंगा.
मी पैसे द्यायला गेले तर मीटर डाऊन केलेलंच नव्हतं, अरेच्चा मीटर टाकायचं राहिलं, डोक्यातल्या गुंत्यामुळे आपल्याही लक्षात आलं नाही.
साधारण नेहमी होतात तेवढे पैसे काढले, त्याच्या पुढ्यात धरले.
अगदी मऊ शब्दात तो म्हणाला, मी पैसे नाही घेणार.
हे अतीच झालं. पुन्हा हो नाही हो- नाही. घ्या घ्या … नाही नाही …. झालं.
तर म्हणे, “आज कि सवारी हमारी तरफ से.”
आं? क्षणभर मला बोधच झाला नाही.
तर हलकंसं हसत तो म्हणाला, “आज कि सवारी हमारी तरफ से. नोटबंदीच्या या दिवसात तुम्ही बँकवाले जे काही करताय ते आम्ही बघतोय, फिर हमारा भी कुछ फर्ज बनता है ना !”
म्हंटलं , “माफ़ करना, आपका नाम…..?”
“महम्मद साबीर.”
म्हंटलं, “खूप खूप आभार. मै आपका नाम जरूर याद रखूंगी.”
आता काय म्हणावं या बिननावाच्या नात्यांना.
साबीरभाई कडे शिक्षण नाही, पैसा नाही पण त्या थकलेल्या क्षणी तो मला लाखमोलाचा ओलावा आणि Yes there is someone who cares about you हा विश्वास देऊन गेला. दिवसभराचा तेरा तास सलग कामाचा शीण आपल्या सोबत घेऊन साबीरभाई भुर्रकन निघूनही गेला. जिन्याच्या पायऱ्या चढताना माझ्या डोळ्यात पाणी होतं, ते नेमकं कशासाठी होतं ते तेव्हाही नाही आणि नंतरही नाहीच कळलं
चार दिवस फक्त काम, भांडणं, वादावादी, अपमान …… तहानभूक विसरवत केलेलं काम.
बिनासुट्टी चार दिवसांच्या चौदा चौदा तासांच्या मानसिक शारिरीक तणावपूर्ण कामानंतर सोमवारी आलेल्या सुट्टीच्या वारी घराकडे लक्ष गेलं. घरातली मंडळी सगळं सांभाळत होती तरीही घरातल्या वस्तूंना बाईचा हात लागणं सुद्धा गरजेचं. तर फ्रिज साफ केला. कपाटं आवरली. आठवड्याच्या सफाईवर नजर टाकली. थोडं इथेतिथे झालेलं आवरलं सावरलं. घरचे म्हणत होते राहू दे …. नंतर करू आपण सगळे मिळून.
दुपारच्या जेवणाला दोन भाज्या आमटी भात, गरम पोळ्या, ताजं ताक असा अगदी साधा बेत केला. अंगतपंगत करुन घरातले सगळे जेवायला बसलो. पहिला घास घेतला आणि नवरा सहज म्हणाला “आज घराला पुन्हा घरपण आलं” फक्त चार शब्द आणि माझ्या डोळयात टचकन पाणी उभं राहिलं. आपल्या घरासाठी आपण काय असतो, आपल्या संस्थेसाठी काय असतो… याची नव्याने जाणीव झाली. जीव थकलेला होता तरी सगळ्या सगळ्याचा अभिमान वाटला.
(सिरीज पुढे चालू)

स्मिता गानू जोगळेकर.
9892551950
smita_dj@hotmail.com
