–
नोटबंदीचे दिवस हे प्रत्येक बँकरसाठी अस्वस्थ करणारा अनुभव होता. याच दिवसांचे चित्रण पुढील लेखांमधे केले आहे. सिरीज नोटबंदी.

नोव्हेंबर २०१६ : संध्याकाळी नवऱ्याचा फोन आला, “पाचशे हजाराच्या नोटा मध्यरात्रीपासून रद्द होणार. ” मी म्हंटलं, “चल काहीतरीच थट्टा करू नको.” पण टीव्ही चालू केला आणि प्रत्येक चॅनलवर एकच बातमी घणघणत होती. आज रात्रीपासून नोटा रद्द. पंतप्रधानांचे देशाला संबोधन आणि आणखी बरंच काही. बँकर असलेले आम्ही नवराबायको मग पुढचे तीनचार तास टीव्हीसमोरून हललोच नाही. जेवणखाण विसरून श्वास रोखून आम्ही बातम्या बघत होते आणि येणाऱ्या उद्याच्या परिस्थितीचे चित्र रंगवत होते. रात्री मग फक्त फोनवर फोन. टीव्हीवाले सांगत होते “नऊ तारखेला बँका संपूर्ण बंद राहतील. ” एक अस्वस्थ रात्र. पुढे काय वाढून ठेवलंय याची कणमात्र कल्पना नसलेली.
९ नोव्हेंबर २०१६ : ग्राहकांसाठी बँक बंद होती पण बँकेचा स्टाफ संपूर्ण हजर होता. नोटा रद्द केल्याचा संदेश होता पण काय, कसं करायचं कोणालाच कल्पना नव्हती. एखाद्या बाक्या प्रसंगापूर्वी व्यूहरचना करावी तसे आम्ही कर्मचारी अगदी चपराशी ते केबिनवाला साहेब, सगळे मिळून १० तारखेची आखणी करत होतो. नाटक सुरु होण्यापूर्वी नेपथ्य, कलाकारांच्या पोझिशन्स, कोणी काय काम कधी कसे करायचे हे ठरवणे, इमर्जन्सी आली तर काय करायचे वगैरे ठरवतात तसं पूर्ण पेपर वर्क. पुढच्या पन्नास दिवसांनी काय घडणार आहे कोणालाच अंदाज नव्हता. बँकिंगच्या इतिहासातल्या एका खूप मोठ्या पानाचे आम्ही साक्षीदार होणार होतो याची मात्र जाणीव होती.
आणि ब्लॅक ह्युमर म्हणावे असा किस्सा. बँकेच्या चऱ्हाटातून पिचून निघालेला बापडा बँक अधिकारी रात्री नऊ वाजता पाय ओढत हॉटेलमध्ये शिरला, दिवसभराचं जेवून काऊंटरला गेला, पाचशेची नोट पुढे केली. काऊंटरवाला म्हणाला “पांसोका नोट नही चलेगा. ये नोट कॅन्सल हुवा है. ” ऑफिसर थक्क झाला. अरे मी स्वतः आत्ता बँकेतून बाहेर पडलोय, मला काहीच माहित नाही आणि तू म्हणतोस नोट रद्द झाली? एवढी कमालीची गोपनीयता राखली गेली होती.
१० नोव्हेंबर २०१६ : साडेनऊची ब्रांच. पण संपूर्ण स्टाफ पावणे नऊ पासून हजर होता. घर ते बँक या दरम्यान लागणाऱ्या सर्व बँकांसमोर लांबलचक रांगा दिसत होत्या. खुद्द आमच्या बँकेसमोर सुद्धा शंभरेक लोक रांग लावून उभे होते. जास्तच असतील पण कमी नाही. दिवस अतिव्यस्त शब्द थिटा पडावा असा गेला. देशभरातील लाखो बॅंकर्सनी दिवसभर तहानभूक विसरून, शांत डोक्याने जास्तीत जास्त लोकांना सेवा देऊन रात्री नऊ/दहा/बारा वाजता बँक सोडली. फक्त आज एक दिवस नव्हे तर पुढच्या बऱ्याच दिवसांच्या तयारीने.
अनेक प्रॅक्टिकल प्रश्न आणि शक्यता बँकवाल्यांच्या डोक्यात नाचू लागले. बँक कॅशिअर,अधिकारी आणि मॅनेजर मंडळींचा डोक्यात घुमू लागलेल्या चक्रांची आम जनतेला कल्पना सुद्धा येणार नाही. २००५ पूर्वीच्या जुन्या नोटा रद्द झाल्या तेव्हाचा वनवास आठवून अंगावर काटा येत होता. असो, “आलिया भोगासी आहोत सादर” म्हणत बँकर्स एका अकल्पितासाठी सज्ज झाले. समस्त बॅंकर्सच्या कारकिर्दीतला हा अभूतपूर्व दिवस असावा. स्वतःचे अस्तित्व विसरून केवळ समोरच्या जनसागराला सामोरे जाण्याचा. शरीर-मन-मेंदू बधिर करणारा, गलितगात्र करून टाकणारा.
११ नोव्हेंबर २०१६ : काल रात्री झोपच लागेना. कान आणि मेंदूमध्ये केवळ घणाघाती आवाज उमटत होते. दिवसभर माणसं समुद्राच्या लाटांप्रमाणे उसळत होती. वितंडवाद, झोंबाझोंबी. संपूर्ण स्टाफपैकी ७० टक्के स्टाफ फक्त कॅश हाताळत होता. वीस टक्के स्टाफ गर्दी हटवण्याच्या प्रयत्नात. उर्वरित सर्व कामे सांभाळायला फक्त दहा टक्के स्टाफ उपलब्ध होता. कोणाला खाण्यापिण्याची शुद्ध नव्हती. दिवसभरात पाचसहा चहा झाले आणि अगदीच नाईलाज झाल्यावर विधीसाठी जाणे बस. पंधरा लाख कॅश लिमीट असलेल्या ब्रांचमध्ये पहिल्या दिवशी अडीच कोटी रुपये जमा झाले. पैसे ठेवायला सेफ व्हॉल्ट पुरेना. एक्स्चेंज काऊंटरवर रकमेचे बंधन आणि येणाऱ्या व्यक्तीने स्वतःची आयडेंटिटी प्रूव्ह करणे अनिवार्य. चार हजाराच्या, हजार-पाचशे जुन्या नोटा देऊन चालू नोटा घ्यायला लोक तीनतीन, चारचार तास रांगेत उभे होते. बँकेच्या कंपाऊंड बाहेर मुख्य रांग, त्यातले वीसपंचवीस लोक आत घेतले जात होते. त्यातले दहादहा जण प्रत्यक्ष बँकेच्या आत येत होते. तिथे हमरीतुमरी ढकलाढकली. आणि दोन दोन सेक्युरिटी गार्डचा खडा पहारा. रात्रीचे नऊ कधी वाजले कळलंच नाही. बँकेतून निघालो तेव्हा अक्षरशः प्रेतवत अवस्था होती.
घरी पोहोचले. नवऱ्याने जेवण बनवून ठेवले होते. बायकोचा चेहरा बघून त्याला एकूण परिस्थितीची कल्पना आली. रात्री दहाला सुद्धा बिचारा म्हणाला “आधी चहा देऊ गरमगरम, कि सरळ जेवणच वाढू?” डोळ्यात पाणी आलं. जेवणाच्या ताटाकडे ब्लँक बघत बसले.”जेवून घे पटकन, बिछाना तयार आहे “. हे केवळ शब्द नव्हते. प्रचंड थकलेल्या जिवाच्या मनावर फिरवलेलं मोरपीस होतं.
(सिरीज पुढे चालू)

स्मिता गानू जोगळेकर.
9892551950
smita_dj@hotmail.com
