–

इंटरनेटच्या मायाजालात अनेक फिनफ्लुएंसर प्रसिद्ध आहेत आणि आजकाल बरेच जण सोशल मीडियावर उपस्थित अशा इन्फ्लुएन्सरच्या सल्ल्याने गुंतवणूक करतांना दिसतात. अशा तमाम जनतेने सावध होण्याची वेळ आलेली आहे. नुकतेच SEBI ने एका अशाच प्रसिद्ध फिनफ्लुएंसर आणि त्यांची कंपनी यांना शेअर बाजाराशी संबंधित कोणताही आर्थिक व्यवहार करण्यास बंदी घातली आहे. तसेच त्यांची ₹ ५४६ कोटींची रक्कम जप्त करण्याचे आदेश देखील जारी केले आहेत. SEBI च्या मते, ‘शेअरबाजार शिक्षण’ देत असल्याचे सांगून त्यांच्यामार्फत प्रत्यक्षात गुंतवणूक सल्ला / ट्रेडिंग सल्ला देण्यात येत होता ज्यासाठी आवश्यक अशी नोंदणी (SEBI Registration) त्यांच्याकडे नव्हती.
शेअर बाजारात व्यवहार करतांना मानवी मेंदू अनेकदा भावनिक चुका करतो (लालसा, अधिक परताव्याचे आकर्षण इ. ) आणि त्या आधारावर केल्या जाणार्या निर्णयांमुळे गुंतवणूकदारांचे नुकसान होत असल्याच्या अनेक घटना आपण पाहतो आहे.
गुंतवणूकदार अशा फिनफ्लुएंसरचे फॉलोअर्स का बनतात ?
याला बरीच मानसिक कारणे आहेत.

१) Authority Bias: मोठ्या संख्येने दिसणारे फॉलोअर्स आणि फिनफ्लुएंसरच्या आकर्षक भाषण शैलीमुळे बऱ्याच गुंतवणूकदारांना असे वाटते की बोलणारी व्यक्ती तज्ञ आहे. त्यामुळे ते अशा व्यक्तीचा सल्ला निर्धास्तपणे स्वीकारतात.
२) FOMO (Fear Of Missing Out): ‘बऱ्याच जणांना फायदा होत आहे, मग मी मागे राहू नये’, अशी भावना गुंतवणूकदारांनाच्या मनात भिती, चढाओढ, स्पर्धा निर्माण करतात आणि मग होऊ घातलेला व्यवहार फायदेशीर आहे की तोट्याचा हे सत्य या भीतीपुढे झाकोळले जाते.
३) Herd Mentality: ‘सगळे करत आहेत, मीही करतो’, या गटभावनेतून निर्णय घेतले जातात. ‘जे सगळ्यांचे होईल तेच माझे होईल’, अशी बेफिकीर वृत्ती बळावते.
४) Overconfidence Bias: ‘मला बाजारातील सर्व काही व्यवस्थित समजते’, अशी अति आत्मविश्वास भावना वाढीस लागल्यास जोखीम घेण्याची तयारी वाढते.
५) Quick Rich Bias: जलदगतीने श्रीमंत होण्याचे स्वप्न गुंतवणूकदारांना शॉर्टकट्स शोधायला भाग पाडतात. पटापट नफा मिळण्याच्या नादात माहितीची,सल्ल्याची सत्यता/प्रत पडताळून बघितली जात नाही.

गुंतवणूकदारांनी आर्थिक व्यवहार करतांना काय करायला हवे ?
१) आर्थिक सल्लागाराची अधिकृतता पडताळा: तुमचा आर्थिक सल्लागार SEBI Registered आहे किंवा नाही, याची खातरजमा करावी. तुमचा सल्लागार Mutual Fund Distributor असल्यास तो AMFI Certified Distributor असणे आवश्यक असते. SEBI आणि AMFI च्या अधिकृत वेबसाईटवर अशा अधिकृत सल्लागारांची यादी, पत्ते, संपर्क साधने दिलेली असतात. त्यांचे या क्षेत्रातील ज्ञान, आवश्यक संसाधने या संस्थांनी प्रमाणित केलेले असतात. शिवाय या संस्थांच्या मार्फत त्यांच्या कार्यपद्धतीचे नियमित ऑडिट केले जाते असते जेणेकरून कुठलाही गैरप्रकार / पद्धती यांचा अवलंब केला जात नाही याची खातरजमा होत असते.
२) प्रलोभनांपासून दूर राहा: कोणी देत असलेल्या LIVE ट्रेडिंग कॉल्स, ‘Guaranteed Returns’ व अन्य अशा आश्वासनांपासून दूर राहाणे केव्हाही चांगले. शेअर बाजारात ‘नक्की नफा’ असे काही नसते हे सत्य लक्षात घायला हवे.
३) आर्थिक साक्षरता आवश्यक आहे: या क्षेत्रातील नियम, कायदे, पद्धती बदलत असतात. त्यामुळे गुंतवणूकदारांनी याबाबत साक्षर राहिले पाहिजे.
४) भावनांवर आधारीत निर्णय टाळा: पैशांच्या निर्णयांबाबत भीती, लोभ, आकर्षण या भावना खरेतर शत्रू आहेत. माहितीचा सारासार विचार आणि ज्ञानाचा विवेकपूर्ण वापर महत्वपूर्ण ठरतो.
सारांश: इंटरनेटच्या मायाजालात अनेक इनफ्लुएंसर सक्रिय आहेत. आर्थिक गुंतवणूक करतांना माहितीची/ संस्थेची अधिकृतता पडताळणी आणि भावनांवर नियंत्रण ठेवून गुंतवणूक करणेच इष्ट !!
टीम SWS

AMFI Certified Distributor
