–

काही गोष्टी मनाच्या पाटीवर आपोआप कोरल्या जातात, काही माणसं काही नावं अगदी सहज मेंदूवर कोरली जातात. बँकेत अगदी वरचे वर येणारे काही चेहरे. बहुतेकांची नावं लक्षात ठेवायचा प्रयत्न असतो आणि सिक्युरिटी पासून चायवाल्यापर्यंत सगळ्यांना शक्यतो नावानेच हाक मारण्याचा प्रयत्न अर्थातच असतो. प्रत्येक ग्राहकाचं नाव लक्षात राहतं न राहतं पण किमान ढोबळ वर्गीकरण आपसूकच होत राहतं. म्हणजे रामजीभाई, निलेश भाई, पटेल काका / प्रधान कर्णिक टिपणीस / केळकर फडके जोशी /डिसिल्वा फर्नांडीस गोन्साल्वीस / गुप्ता शर्मा यादव शुक्ला वगैरे वगैरे. नाही नाही, जातपात धर्म भाषा या कोणत्याच निकषांवर नव्हे तर मेंदूंच्या कप्प्यांचं Default Setting म्हणूया …त्यामुळे हे आपोआप होत जातं आणि गरजेला त्या त्या कप्प्यातून ती ती माहिती काढून वापरात आणली जाते.
नव्यानेच पोस्टींग झालेला मॅनेजर त्या दिवशी एका जुन्या कस्टमरबरोबर हुज्जत घालत होता. विषय काय होता,हे कळत नव्हतं कारण माझं डेस्क बरंच दूर होतं. बोलता बोलता माझ्याकडे बोट दाखवत तो कस्टमर सहज म्हणाला “ये मैडम हमे बहुत अच्छी तरहसे पहचानती है, ऊनसे पूछ लिजीए ।”
मी कशात तरी बुडालेली होते. फक्त ते तेवढं वाक्य कानावर पडलं आणि माझ्याकडे केलेला अंगुलीनिर्देश.
‘अच्छी तरह से पहचानती है ? कोण मी ?.. याला ओळखते म्हणतोय हा.
हा कस्टमर..नेहमी येणारा खरा.. पण .. एक क्षण मी विचार केला , हा नेमका कोण? सदानंद …हरीराम ..प्रेमचंद …. केवल …… गौरीशंकर. … कोण ?
हंsss , हा राधेश्याम गुप्ता. मीच त्या नावावर पुन्हा एकदा शिक्का मारला आणि मोठा निश्वास सोडला. हा राधेश्याम. पेंटींग कॉन्ट्रॅक्टर. लोक किती अपेक्षा ठेवतात आपल्याकडून. शब्दांच्या पलीकडची देवाणघेवाण होत राहते आणि मग केवळ बँकर आणि ग्राहक एवढा कोरडा व्यवहार न राहता त्याही पुढचं नातं जमून येतं. छान वाटतं.
निर्गुण काका, शांत गृहस्थ आणि त्यांची हसतमुख बायको, यांचं आमच्याकडे खूप वर्ष जुनं अकाऊंट. निर्गुण काका गेले. काकांची बायको डोळ्यात पाणी आणत काकांचे शेवटचे दिवस, काकांचं जाणं आपल्याशी शेअर करते. आपण एकीकडे काम करत करत मधेमधे त्यांचं सांत्वन करत राहतो. भाजीवाल्या गुप्ताची बायको ….’एकदम एवढे पैसे कशाला काढतीयेस?’, या प्रश्नावर तिला राग येत नाही, उलट ऊर्मिला तिची गाऱ्हाणी सांगायला घेते. ‘क्या बतायें मैडमजी…’, म्हणत सुरु होते. घरकाम करणारी अनिता, तिची मालकीण कसा त्रास देते हे मोकळेपणी सांगते. तीन वर्षाचा मोहित सरळ तू-ता वर येत “मावशी, खाऊ दे” म्हणतो आणि स्वतःच कुरापत काढत “तुला टोपी देणार नाही” म्हणत लबाड हसतो. सचिन, एका प्रायव्हेट कंपनीत अकाऊंट्स क्लर्क. शांत कामसू पण अबोल. त्याच्या मुलीचं नाव सखी. “सखी.. छान नाव आहे रे!” म्हंटल्यावर तो मनापासून खुश होतो. खीचे फोटो न चुकता दाखवतो आणि कौतुक व अभिमान वाटून घेतो. सरत्या दिवसाबरोबर छान मोठी होत जाणारी सखी आपल्याला दिसत राहते.
नव्यानेच जॉईन झालेल्या मिलनचं आणि माझं बोलणं चालू असतं. मिलन अहमदाबादवरून आलेला तरुण. नुकतीच बँक जॉईन केलेली, अजून कॉलेजच्या स्वप्नील जगातून पुरेसा बाहेर न आलेला. मिलन उदासपणे सांगतो कि तो यंदाचे अहमदाबादचे नवरात्र मिस करणार. आम्ही बोलत असतो तेवढ्यात मोठ्या कापड दुकानाच्या मालकाचा मुलगा सिद्धांत समोर येतो. मी गंमत म्हणून त्याला मिलनचं नवरात्र मीस करणं सांगते. सिद्धांत तेवढ्याच सहजपणी म्हणतो “तुला नवरात्रीचे पास हवे ना, मी देतो” आणि प्रचंड मोठ्या महागड्या इव्हेंटचे दोन पास फ्रीमधे मिलनच्या हातात पडतात. फक्त आपल्या एका वाक्यामुळे. मिलनच्या चेहऱ्यावरचं हसू कोणत्याही हिरेमोत्यांपेक्षा चमकदार.
पैशाच्या पलीकडची ही देवाणघेवाण खूप जिवाभावाची. खूप हवीशी. हं, तर राधेश्याम गुप्ता. एक मिनिट गेला पण राधेश्यामचं अकौंट रिकलेक्ट झालं. मला हुश्श वाटलं. ठीकाय आता येऊ दे साहेबाला, मग मीही म्हणेन “येस्स सर, आय नो हिम सीन्स लास्ट अमुक तमुक इयर्स, व्हेरी साऊंड अकाऊंट” वगैरे वगैरे. मॅडम आपल्याला ओळखते हा राधेश्यामचा विश्वास सार्थ ठरेल. राघेश्याम मला नजरेनेच म्हणेल, ‘थेंक्यू मैडम जी’, आणि साहेबांना सांगेल ….” मै ना कहता था, मैडम हमे बहुत अच्छी तरह पहचानती है.”
माझं नेहमीचं आवडतं वाक्य, कोणी काही देत नाही, घेत नाही तरी एक निर्मळ देवाणघेवाण चालू राहते. नात्यांची संबंधांची.
गोष्टी छोट्या असतात पण अवीट गोड…! 💕💐

स्मिता गानू जोगळेकर.
9892551950
smita_dj@hotmail.com
