–
कोणी काही देत नसतो, कोणी काही घेत नसतो. तरीही देवाणघेवाण होतच राहते, भावनांची नात्यांची, शब्दांची, संवादाची आणि तृप्ती होत राहते मनाची. येणारा प्रत्येक दिवस खास असतो. माणसं तीच असली तरी दर दिवशी त्यांचा मूड आणि वर्तन वेगळं असू शकतं. घरचं, दारचं, कामाचं, रिकामपणाचं अशी किती ओझी घेऊन माणसं वावरत असतात. बँक म्हणजे माणसांचा समुद्र, बँक म्हणजे अनुभवांचा डोंगर आणि हीच बँक म्हणजे माझ्या आयुष्याची पाठशाळा. इथे, तुला काही शिकवतो किंवा काही सांगतो, दाखवतो असं कोणी शब्दात म्हणत नाही, पण खूप काही बघायला मिळतं, अनुभवायला मिळतं आणि शिकायला तर मिळतंच मिळतं.

प्रसंग एक :
गोष्ट सात-आठ वर्षांपूर्वीची. जेव्हा गुगल किंवा फोन पे या अँप्सने एवढा दबदबा निर्माण केला नव्हता. गावाला पैसे पाठवण्यासाठी लोक सर्रास RTGS आणि NEFT वगैरे करत होते. एक तरुण घाईघाईत बँकेत शिरतो. पैसे आणि मनी ट्रान्सफरचा फॉर्म काऊंटरच्या आत सरकवतो. दोनतीन मिनिटं जातात. “कितने टाईम में पोहोचेगा पैसा?” त्या तरुणाचा घाई आणि काळजीयुक्त प्रश्न येतो. तो बराच अस्वस्थ दिसत असतो. “पैसा पहुंच गया.” एक सहज उत्तर. बँकेच्या कांऊंटरच्या आतल्या बाईकडून. आणि क्षणापुर्वीची अस्वस्थता चिंता काळजी दूर होत त्याच्या चेहेऱ्यावर समाधानाचं हसू पसरतं. ‘पैसा पहुंच गया’, या तीन शब्दांनी जणू जादू केलेली असते. तिकडे गावाला आई, बायको, दीदी कोणीतरी ATM मशीनपाशी खोळंबून पैशाची वाट बघत असतं आणि इथून पाठवल्या गेलेल्या चिमुटभर पैशात ओंजळभर कामं निपटावयाची असतात. शाळेची फी, दादी/माँचं औषध, घरात किराणा इतर काय काय !! पैसे एका मिन्टात पोचले ! मॅडमनी काहीतरी जादूची छडी फिरवून पैसे तीन मिनिटात त्या युपी बिहारच्या छोट्याशा गावी पाठवले सुद्धा असं वाटून मोठ्ठा शुक्रिया येतो. मॅडम गालातल्या गालात हसते, कारण तिने काहीच केलेलं नसतं, फक्त डेटा एन्ट्री करून Transmit बटण दाबलेलं असतं. असे खूप खूप थँक्यू आणि शुक्रिया मॅडमच्या खात्यात रोज रोज जमा होत जातात, अगदी ओझं होतील एवढे.
प्रसंग दोन :
जयकिशन अंकल वय ऐंशीच्या आसपास. बारीकशी अंगकाठी. सोनेरी फ्रेमचा चष्मा, हाफ स्लिव्ह्जचा शर्ट. अंकलचा पैसे विथड्रॉ करण्याचा पॅटर्न ठरलेला आणि चेकच्या मागे denomination लिहिण्याची सवय सुद्धा खूप ओळखीची. अंकल अगदी थोडे थोडे पैसे विथड्रॉ करतात. आज फक्त दोन हजारचा चेक असतो. अंकल फारसं बोलत नाहीत. मुक्याचं व्रत असल्यागत चेक सरकवतात आणि शांत उभे राहतात. अर्थातच denomination न बघताच त्यांना शंभरच्या वीस नोटा मिळतात. बाईने चेक पालटवून बघितलं सुद्धा नाही आणि बरोब्बर शंभराच्या नोटा दिल्या. त्यांच्या चेहऱ्यावर मंद स्मितहास्य उमटतं. त्यांना काहीच्या काही आश्चर्य वाटतं. “तुला कसं कळलं मला याच नोटा हव्या होत्या?”, उत्तरादाखल माझ्याकडून फक्त एक स्मायली जाते. मग मोठठं “थँक्यू बेटा” येतं. बेटाsss …आह ! मन भरून जातं त्या दोन अक्षरांनी. आशीर्वाद मिळवण्यासाठी प्रत्येक वेळी प्रत्यक्ष पाया पडावं लागत नाही, आशीर्वाद चालत येतात आपल्याकडे, जर आपलं भाग्य असेल तर. तो ‘बेटा’ शब्द आपण मनाच्या कुपीत अगदी जपून सांभाळून ठेवतो, अगदी आपल्या वडिलांच्या तोंडून आला असावा असा.
प्रसंग तीन :
आमचा उद्याचा ग्राहक. मोहित. वय दोन अडीच वगैरे. काऊंटरच्या आतून शेकहँड आणि फ्लाईंग किस नीट पोचत नाहीत म्हणून मग बाहेरून, आजीच्या कडेवरून ऑर्डर सुटते “तू बाहेर ये”. बँकवाली बाई चाळीशी पन्नाशीची. मात्र तिला या ऑर्डरसमोर मान तुकवावीच लागते. बँकवालीला काऊंटर सोडून बाहेर यावं लागतं. पण त्या पठ्ठ्याची सगळी गंमत स्वतःच्या आजीच्या कडेवरून. जेमतेम दोन वाक्यांचा संवाद, “तू बाहेर ये”. बँकवाल्या बाईने त्याच्या शूजचं त्याच्या वाटरबॅगचं कौतुक करणं वगैरे ओघाने येतंच आणि स्वारी खुश होते. काहीच स्पेशल किंवा Out of way न करता छोट्यांकडून गोड पापा मिळतो, मोठ्यांकडून भरभरून आशीर्वाद मिळतात आणि दिवस सुगंधी सुगंधी होऊन जातात.
गोष्टी छोट्याच असतात पण दिलके खूप खूप करीब असलेल्या. 💞

स्मिता गानू जोगळेकर.
9892551950
smita_dj@hotmail.com
