–

त्याने माझा हात फटकन झिडकारला.पब्लिक प्लेस हो. चार लोक चमकून बघू लागले. शेवटी मी म्हंटल जाऊ दे, आता हे प्रकरण इथेच मिटवलेलं बरं. म्हंटल ठीक आहे तू म्हणशील तसं. आणि मी माझ्या मार्गाला लागले.
मुंबई उपनगरातली सकाळ. लोकलने कुठेतरी जायचं होतं. तिकीट काढायचं होतं. पण दोन पैकी एक तिकीट विंडो बंद त्यामुळे उरलेल्या विंडोवर मारुतीच्या शेपटासारखी भली मोठी रांग. माझा नंबर वीस पंचविसावा वगैरे. दोन फुटावर मशीन पण माझ्या कार्डात भूत शिरलेलं. बॅलन्स असूनही कार्ड रीड करायला मशीन नकार देत होतं. तर मी चेहरा लांब करून रांगेत उभी. तेवढ्यात पंकजभाई किरीटभाई महेसभाई पैकी काहीतरी नाव असलेला एक आमच्या बँकेतील ग्राहक ‘भाई’ मशीनपाशी आला. त्याचं लक्ष माझ्याकडे गेलं.
क्या जवू छे? (कुठे जायचंय)
अमुक अमुक स्टेशन.
लावो हुं काढी आपू. (द्या मी काढून देतो तिकीट)
अरे वा सरस. (अरे व छानच)
सिंगल के रिटन
रिटन.
खुटखुट….. मी स्लॉट मधलं तिकीट उचललं आणि दहाची नोट त्याच्या समोर धरली.
त्याने माझ्याकडे एक लूक टाकला.
भाई लई लो. (पैसे घ्या)
ना ना राखो. ( नाही नको … ठेवा)
अरे भाई लो.
ना किधु ने नथी जोईता. राखो तमे. (म्हंटल ना नकोयत म्हणून)
अरे पण.
किधु ने खोटी वात ना करो… (म्हंटल ना, काहीही बोलू नका) म्हणत त्याने चक्क माझा हात ढकलला..पब्लिक प्लेस हो. चार लोक चमकून बघू लागले. शेवटी मी म्हंटल जाऊ दे आता हे प्रकरण इथेच मिटवलेलं बरं. म्हंटल ठीक आहे तू म्हणशील तसं. आणि मी माझ्या मार्गाला लागले.
हा एक आणि असे आणखी एकशे एक किस्से.
जवळजवळ सतरा वर्ष. साधारण दहाबारा चौरस किलोमीटरच्या परिघातल्या तीन ब्रॅंचेस, त्याही घराच्या आसपास. आणि भर मार्केटमध्ये आमची ब्रांच. त्यामुळे प्रत्येक चौकात, बाजारात, बागेत, स्टेशनवर कोणी ना कोणी भेटतंच रहायचं. फळवाली उर्मिला, किराणावाला, प्लॅस्टिकच्या छुटपूट वस्तू विकणारा, टेलर, रिक्षावाले, शिक्षक, डॉक्टर सर्व स्तरातले. आर्थिक सामाजिक भावनिक सर्वच.
मार्केटला जावं तर प्रत्येक दुकानात एक तरी ओळखीचा चेहरा असणारच. यांना ठाऊक असायचं की मॅडम पैशासाठी कधीच घासाघीस करत नाही, भाव पाडून मागत नाही, वजनात तोलमाप करत नाही किंवा कशाचे किती पैसे लावले म्हणून विचारत नाही. किती झाले, अमुक एवढे असं विक्रेत्याने म्हंटल्यावर तेवढे पैसे शांतपणे देते. माल घेऊन गेल्यानंतर कटकट तक्रार नाही.
आज फळं ताजी नाहीयेत आज घेऊ नको म्हणून हक्काने सांगणारी उर्मिला, रोडवर उभा राहून कंगवे विकणारा इस्माईलभाई, ज्याची रोजची कामे शे दोनशे सुद्धा असेल नसेल, तो दोन कंगवे घेतल्यावर एकाच कंगव्याचे पैसे दे म्हणणारा, अमुक वस्तू आज नाहीये ऊद्या मुलाबरोबर बँकेत पाठवून देतो म्हणणारा राजूभाई, नोटबंदीमध्ये रात्री नऊ वाजता घराच्या पायरीपाशी आणून सोडणारा आणि पैसे मना करणारा आमचा रिक्षावाला साबीरभाई, अगदी हॉटेलमधून पार्सल आणून देणारा मिचमिच्या डोळ्याचा कमल, रस्त्यात कुठेही भेटला तर आवर्जून सायकल थांबवून अभिवादन करणारा….. एक एक चेहरा समोर येतो.
आबू अंबाजीला दर्शनाला गेल्यावर परतताना खास स्मितासाठी प्रसादाचा वेगळा बॉक्स आणणारे हरेनभाई, काश्मीरला जाऊन आल्यावर चिमुकली केशर डबी हातावर टेकवणारे गजानन काका, वाझ अंकलच्या ख्रिसमस केकबद्दल तर खूपदा लिहिलं आहे, किंवा एरव्ही अगदी म्हणजे अगदीच अबोल असणारे मिस्टर शहा सॅटिनच्या बोटभर पाऊचमधली सुगंधी पुडी हातात ठेवत, हे इथे मिळत नाही, फक्त अमुक ठिकाणी मिळतं, कपड्याच्या कपाटात ठेवा असं बारीक आवाजात म्हणतात…… यातल्या कोणीच कधी बँकेच्या कामासंदर्भात स्पेशल फेव्हरची अपेक्षा केली नव्हती, ना मी कधी त्यांच्याकडच्या व्यवहारात सूट किंवा डिस्काउंट मागितलेला.
दहा रुपये देऊ केले म्हणून रागावणारा, स्टेशन वर भेटलेला भाई खरंतर ज्याचं मला नाव सुद्धा माझ्या लक्षात नाही.
मुंबई सोडून नाशिकला आलो आणि हीच सगळी ‘माझी’ माणसं मला दुरावली. कल्पनेनं सुद्धा वाईट वाटतं. प्रश्न दोन पाच किंवा दहा रुपयांचा नसतो प्रश्न शब्दापलीकडच्या नात्याचा असतो. तू मला आवडतो किंवा मला तुझ्याबद्दल खूप प्रेम वाटतं, आदर वाटतो असं शब्दात सांगणं दिखाऊ दांभिक असू शकतं पण हे असं बहेन, भाभी, ताई, दीदी म्हणत बँकवालीला थेट आपल्या मनात जागा देणं खूप खरं खूप निर्मळ असतं.
तुम्हा सगळ्यांना खूप मिस करते रे मी, उर्मिला, इस्माईलभाई, राजूभाई, केशव, फुलवाला प्रकाश, चहावाला पप्पू किंवा रमेशभाई आणि पंकज किंवा किरीट किंवा सुनील अनिल भाई सारखे कितीतरी.
प्रॅक्टिस अँड लॉ ऑफ बँकिंग असतं तसं प्रॅक्टिस अँड लॉ ऑफ जगणं सुद्धा असतं.
जगण्याचे आखून दिलेले नियम वेगळे असतात आणि प्रत्यक्ष जगणं ….खूप वेगळं. खूप मोहक जिवंत रसरशीत …आठवणी जागवणारं आणि आठवणींची उब सुद्धा देणारं.

स्मिता गानू जोगळेकर.
9892551950
smita_dj@hotmail.com
