–

दिवाळीचा सण म्हणजे दिव्यांची रोषणाई, उत्साहाचे वातावरण आणि नवीन सुरुवातीचा सोहळा. धनत्रयोदशी किंवा धनतेरस हा दिवाळीचा दुसरा दिवस ! या दिवशी आपण धनाची देवता श्री लक्ष्मी आणि श्री कुबेर यांची पूजा तर करतोच शिवाय आरोग्याची देवता श्री धन्वंतरी यांचेही पूजन या दिवशी केले जाते.
श्री लक्ष्मीचे पूजन: श्री लक्ष्मी ही धनाची आद्य देवता मानतात आणि म्हणून आपल्याजवळ असणाऱ्या धनाचे पूजन या दिवशी केले जाते.
श्री कुबेर यांचे पूजन: श्री कुबेर हे केवळ संपत्तीचे संरक्षकच मानले जात नाहीत तर ते योग्य व्यवस्थापनाचे प्रतीकही आहेत.
श्री धन्वंतरी यांचे पूजन: धनत्रयोदशीच्या परंपरेमागे एक महत्त्वाचा आरोग्यविषयक संदेशही दडलेला आहे. आपण सर्व जाणतोच की “आरोग्यम धनसंपदा” अर्थात आरोग्य म्हणजेच खरे धन. एक संस्कृत सुभाषित आहे…
आरोग्यं परमं भाग्यं, स्वास्थ्यं सर्वार्थसाधनम्।
न आरोग्यं परं सुखं, न च धनं तद्विना लाभ्यम्॥
अर्थ: “आरोग्य हेच सर्वोच्च भाग्य आहे. आरोग्याशिवाय कोणतेही कार्य साध्य होत नाही. खरं सुख आणि संपत्ती दोन्ही आरोग्याशिवाय अपूर्ण आहेत.” आणि म्हणून आरोग्याची देवता श्री धन्वंतरी यांचेही पूजन या दिवशी केले जाते. या सणामागे एक प्रचलित कथाही आहे . इंद्राने जेव्हा असुरांना बरोबर घेऊन समुद्रमंथन केले, तेव्हा त्यातून चौदा रत्ने प्रगट झाली, त्यापैकी एक धन्वंतरी देवता आहे. म्हणून या दिवसास धन्वंतरी जयंती असे संबोधले जाते आणि या देवतेचे पूजन केले जाते.
धनत्रयोदशी : स्मार्ट गुंतवणुकीची सुवर्णसंधी
पारंपारिकपणे धनत्रयोदशीला सोने खरेदी करणे शुभ मानले जाते. पण आजच्या काळात गुंतवणुकीचे अनेक स्मार्ट पर्याय उपलब्ध आहेत, जे आपल्याला चांगला परतावा देऊ शकतात.
डिजिटल गोल्ड : प्रत्यक्ष सोन्याऐवजी तुम्ही डिजिटल गोल्डमध्ये गुंतवणूक करू शकता. यामुळे घरात सोन्याचे रक्षण अथवा चोरीची भीती राहत नाही. काही मल्टी एसेट अलोकेशन फंड हेही सोने, चांदी यांच्यासारख्या माध्यमांमध्ये गुंतवणूक करतात. दीर्घकालीन वृद्धी साध्य करण्यासाठी असे फन्ड्स विविध मालमत्ता वर्गांमध्ये (इक्विटी, कर्ज, सोनं/चांदी) गुंतवणूक करून परतावा देतात.
गुंतवणूक माध्यमात विविधता (Diversification) आणा: फक्त सोन्यातच नव्हे, तर आपल्या Risk Profile ला अनुसरून इक्विटी, म्युच्युअल फंड, बॉण्ड्स आणि इतर मालमत्तांमध्ये संतुलित गुंतवणूक केल्याने तुमचे पोर्टफोलिओ अधिक स्थिर आणि फायदेशीर बनू शकतो.
आरोग्य विमा: आजच्या काळात वैद्यकीय खर्च खूप वाढले आहेत. एक चांगली आरोग्य विमा पॉलिसी तुम्हाला या वाढत्या खर्चांपासून संरक्षण देते, जेणेकरून तुमचे उपचार पैशांमुळे थांबू नयेत. आरोग्य विम्याचा प्रीमियम भरून तुम्ही कर बचतीचा लाभ घेऊ शकता. आयकर कायद्याच्या कलम 80D अंतर्गत तुम्हाला करामध्ये सूट मिळते, ज्यामुळे हा एक दुहेरी फायद्याचा व्यवहार ठरतो.
धनत्रयोदशी हा आपल्या गुंतवणुकींचे पुनरावलोकन करून नवीन गुंतवणूक करण्यासाठी उत्तम दिवस आहे. SWS टीमकडून तुम्हाला आणि परिवारास समृद्धीदायी आणि आरोग्यदायी शुभेच्छा !!
टीम SWS

