–
बँक म्हणजे माणसं, स्वभाव, भल्याबुऱ्या घटनांचे उत्पत्तीस्थान आणि अनेकानेक जीवंत अनुभव.
कॉम्प्युटर्स आणि ऑनलाईन बँकिंग यायच्या बरेच आधीचे दिवस, जेव्हा आमचा कर्मचारी चेकबुकच्या वीसच्या वीस चेक्सवर मॅन्युअली स्टॅम्प मारून देई. अर्जंट चेकबुक हवं असेल तर मोजून दहाव्या मिनिटाला चेकबुक मिळून जाई. क्लीअरिंग सारख्या गोष्टींना वेळ लागत असे पण याच मॅन्युअलचे बरेच फायदे आणि सुविधा सुद्धा होत्या.

आमच्या बँकेच्या कुलाबा मुंबई इथल्या नेव्हीनगर शाखेतल्या शिस्तीच्या आणि मनाने खूप खऱ्या ग्राहकांबरोबरचे ते दिवस फार सुंदर होते. आमचे अकाउंट होल्डर्स नेव्हीवाले. नवरे बरेचदा शीपवर किंवा अन्य ठाण्यांवर ड्युटीवर गेलेले आणि सारा संसार स्त्रिया सांभाळत असं वातावरण असे.
तर त्या दिवशीची गोष्ट. सकाळची गर्दी ओसरली होती. एक गोरटेली लहानखुरी स्त्री दुपारी आमच्या बँकेच्या शाखेत आली. माझा अतितत्पर मित्र प्रकाश याच्याकडे चेकबुक रिक्वेस्ट स्लीप दिली. त्याने स्लिप वरपासून खालपर्यंत बघितली आणि तो म्हणाला “इसपे नेगीसाहब के दस्तखत होने चाहिये”. हे ऐकताच त्या स्त्रीचा चेहरा खाडकन उतरला. नजर खाली वळली आणि ती अगदी गप्प होऊन गेली.
काही क्षण भयंकर सुन्न गेले. आणि ती क्षीण आवाजात म्हणाली “अब कहांसे लाऊ मै दस्तखत”.
आता पुढे काय घडणार …… या विचाराने आम्ही बाकीचे लोक प्रकाशच्या प्रतिक्रियेची वाट बघू लागलो.
प्रकाश हळवा होत म्हणाला “कोई बात नहीं, कल या परसो लाकर देना स्लिप, या फिर अगले हफ्तेभी चलेगा, जैसे ही पर्ची मिलेगी हम आपको चेकबुक दे देंगे”
आता मात्र तीचे डोळे भरून आले, घशात आवंढा दाटला आणि ती खोल आवाजात म्हणाली “वो तो गयेss” आणि दाटलेल्या आवंढ्यातून ती वाट काढत राहिली.
अशा परिस्थितीत काय करतात हे न सुचल्याने प्रकाश फक्त उठून उभा राहिला. त्याने पाण्याचा ग्लास आणून तिला दिला आणि म्हणाला “आप शांत हो जाईये, हम सब आपके साथ है, हमसे जो भी बन पाएगा वह सब हम करेंगे”
पूर्ण ब्रांच सुन्न झाली.
मग प्रकाशने ड्रॉवर उघडून दोनचार फॉर्म काढले, त्यावर कुठे कुठे सह्या करायच्या ते फुल्यांनी खुणा करून तिला समजावून सांगितलं. खरंतर ती काही ऐकण्याच्या मनःस्थितीत नसल्यासारखी हरवलेली होती.
प्रकाशने विचारलं “आप ठीक तो है?”
खाली मान घातलेली ती त्याच खोल आवाजात म्हणाली “हंsss”
शब्दांची जुळवाजुळव करत, धीर एकवटत जड आवाजात प्रकाश म्हणाला “डेथ सर्टीफिकेट आ जाए तब उसकी झेरॉक्स लेकर आ जाना, बाकी फॉर्म वगैरा हम भर देंगे. आप चिंता ना करें”
हे संवाद होईपर्यंत आम्ही सगळेच प्रकाशच्या टेबलापाशी जमून जमेल तसे तिचे सांत्वन करू लागलो. तिला काही कळतंच नव्हतं. आजच्या भाषेत तिला काही झेपतच नव्हतं. आणि काही मिनिटांनी तिला परिस्थितीचा उलगडा झाला. आता मात्र अगदी स्पष्ट आवाजात ती म्हणाली “सरजी जो आप समझ रहे है वैसी कुछ बात नही है”
प्रकाश म्हणाला “हम समझ सकते है”
“अरे सरजी …… आप बिलकुल गलत समझ रहे है. हमारे वो गये है शीपपर और अब सीधे चार महिने बाद लौटेंगे. चेकबुक नही मिला तो हम परेशान हो जाएंगे, कइयोंको चेक देने है … चेकबुक पूरा ही ख़तम हो गया है .. तो अब करें तो क्या करें? यही बात सोच कर हम चिंतामें खो गए और रो पडे”.
झाला प्रकार डोक्यात शिरायला दोनपाच मिनिटं गेली. अरे कर्माss, असा हा घोळ होता तर !!
आता ती रडायची साफ थांबली आणि आम्ही मात्र संभ्रमित …… या प्रकारावर हसावं, रडावं कि गप्प बसावं या विचारात बुडलेले आणि त्याही आधी आमचं तोंड कुठे लपवावं या विचाराने तर जास्तच.
पण या प्रसंगाने एक धडा नक्कीच दिला कि समोर मांडली जाणारी परिस्थिती आणि विषय नीट समजून घेतल्याशिवाय त्यावर तोडगा किंवा उपाय सुचवायला जाऊ नये. ग्राहक सेवा हे आपलं ब्रीद असलं आणि ते आपण जीवापाड पाळत असलो तरी …. अति घाई संकटात नेई … हेही लक्षात ठेवायला हवं. त्या दिवशीची गोष्ट तिथेच आणि थोडक्यात निपटली म्हणून ठीक , अन्यथा काय घडलं असतं …… !!

स्मिता गानू जोगळेकर.
9892551950
smita_dj@hotmail.com
