–
चाकोरीतला बँकेतील काऊंटर तोच पण तरीही रोज नवा होऊन समोर येणारा. रोज जगण्याचे नवे पैलू दाखवून जाणारा. काहीतरी शिकवून जाणारा, नवी ऊर्जा देणारा. कधीतरी आपण छान मूड घेऊन बँकेत कामासाठी येतो पण असं काही घडतं कि स्वतःला आवरावं लागतं आणि कधी काही अजब आश्चर्यकारक समोर येतं कि आपण थक्क होऊन बघत राहतो, स्वतःला तपासून बघू लागतो.
डॅनियल, वय असेल वीस बावीसच्या आसपास, दोन्ही काखेत कुबड्या. अस्थिव्यंग आणि जोडीला काहीसे गतीमंदत्व सुद्धा. कधीकधी त्याच्या आईबरोबर यायचा. कधीतरी एकटा.

आज एकटा आला होता. त्याने कॅशिअरकडे जाऊन पैसे भरले. त्याच्या कुबड्यांच्या ठकठक आवाजावरून लगेच ओळखू आलं कि डॅनियल आला आहे. पैसे भरून झाल्यावर पासबुक एन्ट्रीसाठी तो माझ्यासमोर उभा राहिला. त्याला धड उभं राहता येत नव्हतं आणि हातातल्या पोतडीमधून काही काढायचं झालं तर एक कुबडी बाजूच्या व्यक्तीला धरायला सांगावी लागत होती. आई त्याच्या बरोबर असे तेव्हा हे काम ती करायची पण तो एकटा असेल तेव्हा त्याला हे कोणालातरी सांगावं लागे. म्हणून त्याला ताटकळत ठेवणं शक्य नव्हतं. काऊंटरला उभ्या आणखी दोघांना थोडं थांबायची विनंती केली आणि डॅनियलची पासबुक एंट्री आधी करून दिली .
मग तो म्हणाला, “ते महिन्या महिन्याचे पैसे भरतात ते कार्ड बावीस तारखेला संपतंय. नवीन कार्ड बनवायचंय”.
किती साधं सोपं वर्णन ते. ‘ओके रिकरींग संपतंय’, मी मनात म्हंटलं.
कार्डावर त्याला सेव्हिंग अकाऊंट नंबर टाकून सही करायला सांगितली आणि ते संपणारं म्हणजेच मॅच्युअर होणारं ‘कार्ड’ त्याच्याकडून घेऊन माझ्या ड्रॉव्हरमधे ठेवलं. नवीन रिकरींगसाठीचा ओपनिंग फॉर्म मीच भरून दिला.
म्हंटलं, “तू कुठे काम करतोस का?”
म्हणाला, “हो एक छोटंसं काम इथेच पुढच्या स्टेशनला मिळालं आहे पण आज मी एक्मे मॉलला इंटरव्ह्यू द्यायला चाललोय.”
मी: “एक्मे मॉललाssss?”
तो: “हो, त्यांना मी माझी माहिती दिली होती, आज इंटरव्ह्यू साठी बोलावलंय. कोणती बस तिकडे जाते तुम्हाला काही आयडिया आहे का?”
मी: अमुक अमुक नंबरची बस तिथे जाते पण थोडी लांब थांबते. पण तमुक नंबरची बस तुला मॉलच्या अगदी जवळ सोडेल. तू बसने जाणार आहेस?”
तो: “हो … आणखी काही ऑप्शन नाहीये.”
माय गॉड, बाहेर धो धो बरसणारा पाऊस, याच्या कुबड्या, थोड्या दूरच्या उपनगराच्या टोकाला असलेलं ते ठिकाण आणि हा असा मुलगा जाणार पब्लिक ट्रान्सपोर्टने !! मीच विचारात पडले.
मी: “आज मम्मी नाही आली का बरोबर?”
तो: “नाही तिची पण ड्युटी असते. आणि ती इथे बँकेत आली असती तरी इंटरव्यूहला मलाच एकट्याला जायचंय.”
पण डॅनियलच्या चेहऱ्यावर कुठे राग नाही, वैताग नाही, जणू पलीकडच्या गल्लीत मिर्ची-कोथिंबीर आणायला एखाद्या धाकट माणसाने जावं एवढ्या सहजतेने तो निघाला. एरव्ही ‘माझा नंबर, माझा नंबर’ करणारी सहा सात गिऱ्हाईकं आज मात्र समंजसपणे खोळंबली होती. खरंतर एवढा संयम दाखवल्याबद्दल मी त्यांना थँक्स म्हणायला हवं होतं. थम्सअपची खूण करत डॅनियलला म्हटलं, “मुला तू भारी आहेस, तुला इंटरव्ह्यूसाठी जोरदार बेस्ट ऑफ लक बरं का”.
“थँक्यू मॅम”, म्हणून तो छोटंसं हसला, पासबुक मोठ्या प्रयासाने त्याच्या सॅकमध्ये टाकलं आणि कुबडीचा ठकठक आवाज करत निघून गेला. काऊंटर ते मुख्य दार जेमतेम पाच पावलाचं अंतर, ते पार करायला त्याला बराच वेळ लागला. तो दिसेनासा होईपर्यंत मी त्याकडे बघत राहिले. तो मॉलला कसा आणि कधी पोहोचेल याचा मी विचार करत राहिले. पुढच्या माणसाचा अकाऊंट ओपनिंग फॉर्म समोर आला आणि मी भानावर आले. त्याच्या अडथळ्यांवर मत करण्याच्या जिद्दीला सलाम ठोकला, समजंसपणे संवाद ऐकणाऱ्या ग्राहकांच्या डोळ्यातही त्याच्याबद्दल अभिमान बघितला.
आजके दिन ‘जीना’ सिखानेवाले छोटे दोस्तके…डॅनियल के नाम, एक सलाम !!
–

स्मिता गानू जोगळेकर.
9892551950
smita_dj@hotmail.com
