–

संवाद १ )
सकाळची गर्दी सरून काऊंटर थोडा मोकळा झाला होता. आणि एक वादळ समोर येऊन उभं राहिलं.
“येssस …. बोलाsss.”
“मॅडम ….. मोबाईल नंबर दिलाय तरीही एसएमएस येत नाही, अकाऊंट बॅलन्स दिसत नाही.”
समोर एक वैतागलेला पोरसवदा ग्राहक उभा. थोडा चंचल अस्वस्थ. आधी सांगितलेलं वाक्य पुन्हा एकदा क्रम बदलून सांगून झालं.
मी म्हंटलं, “एक मिनिट….. नेमका प्रॉब्लेम काय आहे ते मी बघून घेते आणि काय झालंय….. काही डॉक्युमेंट हवंय का ते सांगते.”
“मॅडम, सगळे डॉक्युमेंट अकाऊंट उघडायच्या वेळेस दिले आहेत.”
मी म्हंटल ….”जरा थांब. मी बघते.”
पण त्याच्या जीवाला शांतता नव्हती. थोडं स्वगत बोलल्यागत तो पुन्हा पुन्हा तेच तेच बोलत होता.
‘हे होत नाही’ …’ते दिसत नाही’.. ट्यांव ट्यांव….!
“जssssरा थांब हंss” म्हणत मी स्क्रीन मधे डोकं घातलं.
“एसएमएस का बरं येत नाहीsss?” असं आता माझं स्वगत, त्याला ऐकायला जाईलसं म्हणत त्याचं अकाऊंट चेक केलं. काहीतरी बारीकसारीक गोष्ट मिसिंग होती. हवं ते करेक्शन केलं.
त्याला म्हंटलं, “हंss आता या नंबर वर एक कॉल करून बघ.”
“पण मॅडम …!!”
म्हंटल “कॉल कर तर …. एका मिनिटात तुला तुझ्या बॅलन्सचा मेसेज येईल.”
एखाद्या छोट्या मुलाच्या उत्सुकतेनं त्याने तो नंबर फिरवला, कॉल कट झाला आणि क्षणात त्याला मेसेज आला. त्याचा चेहरा फुलून गेला.
आपलाच अकाऊंट बॅलन्स बघून तो केवढा खुशीत आला. शेजारच्या ऑफिसरला कोपराने खुणावत मी म्हंटलं “Look at him. He is so happy seeing his own account balance, as if I have put some amount from my pocket into it.😇 “
त्याचं खुश होणं आम्ही आमच्यात भिनवत सुखावून हसत राहिलो. पोरानं माझं वाक्य ऐकलं. मघाची त्याची चिडचिड पार गुल झाली होती. तोही आमच्या हसण्यात दिलखुलास शामिल झाला. मघाच्या चिडचिडलेल्या हॅमरींग “देखो मॅडम…. लेकिन मॅडम” चं रूपांतर मऊशार “थँक्यू आंटी” मधे झाल्याचं त्याच्या नसेल पण माझ्या मात्र लक्षात आलं.
गोष्टी छोट्याच असतात पण सुकून देणाऱ्या💕
——————————————————————————-
संवाद २ )
आणि हा जणूकाही त्याचाच जुळा भाऊ.
“मैडम, मेरा ATM आया, पर पासकोड नहीं आया | “
“आपका मतलब है पासवर्ड नही मिला?”
“हां हां वहीच. वो पासवर्ड नही दिया आपने |”
“पासवर्ड हम देते नहीं है, आपने खुद जनरेट करना है |”
“हमको नहीं आता,आप जनरेट करो और हमें दे दो |”… (मला मुलींचे शाळेचे दिवस आठवले; क्राफ्टच्या तासाला फुलं, घर नि काय काय रात्री बसून आम्ही ‘जनरेट’ करायचो I mean बनवायचो आणि मुली ते शाळेत नेऊन मास्तरांना दाखवायच्या.)
तर म्हणे, ‘आप जनरेट करो और हमें दे दो |’
म्हंटलं, “भाईसाहब आप बगलवाले ATM में जाकर के खुद OTP जनरेट कर सकते है | “
तो : वो OPD हमें नही पता. आप हमारें साथ चलिये |
मी : नहीं नहीं हम ऐसा नही कर सकते |
तो : फिर ये ससुरा OPD का करे क्या और कैसे !
मी : (अजिबात थट्टा न करता) O P D नहीं भाईसाहब O T P . O…T…P….!
तो : हां वो जो भी है, हमें नहीं समझमें आता |(प्रेशर वाढत चाललेलं)
मग मी (पुन्हा एकदा मुलींना शिकवायचे तसं) शांतपणे त्याला OTP ची पूर्ण प्रोसीजर म्हणजे कार्ड खाचेत टाकण्या पासून म्हणजेच अगदी श्री पासून सुरुवात करत दोन वेळा हळूहळू सांगितली.
मी : अब जाके कोशिश किजीए | बिलकुल आसान है | जाईये. हिंदी भाषा वाला बटन दबाईए। सामने दिखने वाली लाइन पढते जाईये। केवल अपना मोबाईल हाथमें रखिये और फिर …… bla bla bla तिसऱ्यांदा पूर्ण तबकडी.
तो साशंक चेहऱ्यानं ATM त्या चौकोनात गेला खरा पण त्याचं जाताजाता बोललेलं वाक्य ऐकून एक खात्री पटली कि गडी कोणत्या तरी हॉस्पिटलमधे कामाला असावा.
तो बडबडत गेला “अब ये OPD का क्या नया झंझट लगाया है राम जाने”
मी माझ्या कामाला लागले. पुढचा OPD सॉरी …पुढचा अकौट होल्डर.
दहा मिन्टांनंतर तो OPD वाला आत आला.
मी ‘काय’ अशा अर्थाने भुवया उंचावल्या.
मैडम हो गया. 😃👍. चेहरा प्रसन्न हसरा.
मी : बनाया ना खुदसे OTP?
बिलकुल मैडमजी, ये OPD बनाना तो एकदम आसान निकला |
“OPD नहीं भाईसाहब OTP OTP !!” हे वाक्य मी गटकन गिळलं. आणि त्याला प्रोत्साहन दिल्यागत म्हंटलं “अब आप ही और चार लोगोंको ये समझा सकते है। है ना !
बिलकुल मैडमजी।
हुश्श…..त्याचा OTP झाला नशीब नाहीतर मला OPDमधे भर्ती करावं लागलं असतं.
गोष्टी छोट्या असतात पण गमतीशीर.
–

स्मिता गानू जोगळेकर.
9892551950
smita_dj@hotmail.com
