–
समोरचा ग्राहक कितीही चिडलेला असेल तरी काऊंटरच्या आतल्या व्यक्तीने स्वतःचं मनःस्वास्थ्य टिकवून ठेवणं ही बँकरसाठी मोठी कसोटी असते. आणि असे अनुभव नेहमीच येत राहतात. आलेला ग्राहक कुठले कुठले ताणतणाव घेऊन येतो ठाऊक नसतं. तो चिडला आणि आपणही चिडलो तर शब्दाला शब्द लागतो, वातावरण गढुळतं. त्यामुळे आपण शांत राहणे हा एकाच पर्याय उरतो.

तर त्या दिवशी जोशीकाका बँकेत आले तेच ताणलेला चेहरा घेऊन. पैसे काढायचे होते. अनेकदा वयस्कर व्यक्ती ऑनलाईन व्यवहार करत नाहीतच पण एटीएम वगैरे वापरायला सुद्धा घाबरतात. ते ब्रांचमध्ये येऊनच पैसे काढतात. यांचं योग्य प्रबोधन केलं जातंच. तरीही काही ग्राहक नाही तर नाहीच ऐकत.
असो, तर जोशीकाका आले. काऊंटर क्लार्ककडे टोकन मागितलं. टोकन घेताना त्यांचं काहीतरी बिनसलं. दोनचार शब्द जास्तीचे बोलले गेले. ते झालं. काका पैसे घ्यायला कॅशिअर कडे गेले. ‘अमुक डिनॉमिनेशनच्या एवढ्या आणि तमुकच्या तेवढ्या नोटा द्या’, अशी मागणी केली. कॅशिअरने त्याच्याकडे असलेल्या डिनॉमिनेशनचे पर्याय समोर ठेवले. झालं! तिथे नोटा मनासारख्या मिळाल्या नाहीत म्हणून शब्दाला शब्द लागला. एकेक दिवस कोणाकोणासाठी जणूकाही त्रासाचाच उगवून येतो. काका पासबुक प्रिंट करायला गेले. तरुण ग्राहक ऑनलाईन स्टेटमेंट काढून घेतात पण वयोवृद्ध मंडळी पासबुक सोडायला तयार नसतात. आणि प्रत्येक ट्रान्झॅक्शन नंतर पासबुक भरायला उभे राहतात. काऊंटरवरची व्यक्ती त्यांना समजावून सांगते कि पाचसहा ट्रान्झॅक्शन झाली कि एकदम एंट्री करा, पण नाही. वृद्धत्व म्हणजे दुसरं बालपण याची प्रचिती पदोपदी येत राहते. तर पासबुक प्रिंटिंगला नेमका नवीन मुलगा बसलेला आणि टेक्निशियन प्रिंटरचं नुकतंच काहीतरी काम करून गेलेला. पासबुक प्रिंटींग तिरपं आलं म्हणून आणखी चिडचिड झाली.
मी हे सगळं बघत होते. पस्तीस वर्षाच्या अनुभवी नजरेने जाणलं कि काकांचं काहीतरी बिनसलेलं आहे आणि घरचा राग इथे निघतोय. वास्तविक बँकेतले कर्मचारी त्यांच्या नेहमीच्या पद्धतीनेच व्यवस्थित काम करत होते. पण होतं कसं कि कावीळ झालेल्याला सगळं पिवळं दिसतं म्हणतात तसं एकदा डोक्यात राग घेऊन आलेल्या माणसाला समोरचं सगळंच चुकीचं वाटू लागतं.
तर काकांना बसायला सांगितलं. आधी लहान मुलासारखं हुप्प करून नको म्हणाले. म्हंटल, “अहो बसा दोन मिनिटं”. बसले एकदाचे. चपराश्याकरवी पाण्याचा ग्लास मागवला आणि म्हंटल, “काय झालं काका, तुम्हाला शंभरच्या नोटा बदलून देऊ का?” म्हणाले, “काही नको. मिळाल्येत त्या ठीक आहेत”. “बरं, पासबुक रीप्रिंट करून देऊ का?” , “हंsss”. म्हणत त्यांनी पासबुक पुढे सरकवलं. पासबुक प्रिंट होईस्तोवर गप्पागप्पांमध्ये त्यांच्या मनातलं बरंच काही काढून घेतलं. घरी काहीतरी अगदी किरकोळ घडलं होतं. मुलं -नातवंडं येणार म्हणाली पण आली नाहीत, कसलंसं औषध पूर्ण संपेपर्यंत काकू काही बोलल्या नाहीत, बाहेरच्या खोलीतली ट्यूबलाईटच बंद पडली..वगैरे. खरंतर बँकवाल्यांचा त्यात काही संबंध नव्हता पण वड्याचं तेल वांग्यावर निघावं तसं झालं होतं.
पासबुक प्रिंट झालं. ते काकांच्या हाती देत म्हंटल, “बघा आता नीट आलंय का?” छान नीट प्रिंट झालेलं पासबुक घेताना काकांचा चेहरा निवळला. आणि शांत बसल्यामुळे त्यांचं त्यांना उमगलं असावं कि आपण दोघाचौघांवर उगाचच चिडलो. म्हंटल, ” बसा दोनपाच मिनिटं आणि मग जा”. निघताना काका शांत होते. चेहऱ्यावर हास्य होतं. “बरं येतो”, म्हणत काका त्यांची झोळी आणि पासबुक घेऊन उठले. म्हंटल, “ते पासबुक आधी नीट पिशवीत ठेवा”. लहान मुलागत ते म्हणणं ऐकत त्यांनी पासबुक पिशवीत टाकलं. दारावरच्या सेक्युरिटी गार्डला सुद्धा “येतो रे, येईन पुन्हा पंधरा दिवसांनी पेन्शन काढायला”, म्हणत ते त्याच हसऱ्या मुद्रेने बाहेर पडले.
म्हंटल तर काहीच घडलं नव्हतं. एक ग्राहक बँकेत आला आणि गेला. पण म्हंटल तर बरंच घडलं होतं, एका माणसाचा आत्मा शांत आनंदी होऊन तो माणूस बँकेबाहेर पडला होता. एका बँकरसाठी ही फार मोठी गोष्ट घडली होती. हाती आलेला आनंद आणि समाधान महिनाअखेर हाती येणाऱ्या पगारापेक्षा खूप जास्त मोलाचे होते.

स्मिता गानू जोगळेकर.
9892551950
smita_dj@hotmail.com
