–आम्हा नित्य दिवाळी ..
बँकरसाठी रोजच दिवाळी असते. माणसांची स्वभावांची अनुभवांची नात्यांची. जगण्याच्या तऱ्हा अनुभवायच्या असतील तर लोकसंपर्काच्या जागी असण्यासारखे दुसरे भाग्य नाही. वयाप्रमाणे, मानसिकतेप्रमाणे, सोशल-स्टेटस प्रमाणे, आर्थिक स्थितीप्रमाणे बदलत जाणारा ग्राहक आणि प्रत्येक दिवशी नवे जगणे सांगून जाणारा नवीनतम दिवस.
अशिक्षीत ग्राहकाला ‘सिस्टम बंद है’, ‘कनेक्टीव्हीटी नही है’, ‘अकाऊंट इनऑपरेटीव्ह हो गया’, ‘एखादी गोष्ट ऍक्टिव्हेट करून घे’ असे सांगण्यापेक्षा ‘थोडी देर के लिये मशीन बंद है’, ‘बहोत दिनसे इस्तेमाल नही किया इसलिये खाता अभी रुका हुवा है’ वगैरे ‘त्यांच्या’ भाषेत सांगितल्या तर त्या सोप्या वाटतात. बँकेचे नियम, कार्यपद्धती युक्तीने मांडाव्या लागतात.

एक वयस्कर ग्राहक माऊली आली. खात्यात किती पैसे आहेत, व्याज किती मिळाले या चौकशा केल्या. खात्यात साठ और चार, चौशष्ठ हजार रुपये आहेत असं सोपं करून सांगितलं. ती म्हणाली, ‘या पैशाचं काय करू?’ मग तिच्या गरजा काय वगैरे विचारून थोडे पैसे फिक्स्ड डिपॉझिट मध्ये टाकण्याचा सल्ला दिला. आधीची तिची सव्वा लाखाची रिसीट मला स्क्रीन वर दिसत होती. कुठेच नॉमिनेशन नव्हते. तिला सांगायचं तर होतं, परंतु माऊलीचं वय सेन्सिटिव्ह. मुळात नॉमिनेशन म्हणजे ‘तुम्ही गेल्यानंतर तुमचे पैसे कोणाला मिळतील’ हे सांगणं. ऐकायला सोपं वाटतं, परंतु त्यांचा शारीरिक, मानसिक अवस्थेचा विचार करता ते त्यांचा गळी उतरवणं अवघड. ‘आपण गेल्यानंतर काय’, हा विचार खरं तर प्रत्येकाच्या मनात असतो. पण जणू तो बोलून दाखवल्याने ‘तो’ नकोसा क्षण लगेचच येऊन उभा ठाकेल अशी भीती दबा धरून बसलेली असते. काही विचारी लोक वगळता ‘काय घाई आहे यासाठी’, असे म्हणणारेच अधिक.
मी नेहमीप्रमाणे स्वतःचं उदाहरण देत गप्पांचा नादात, माझे पैसे मी काही मुलांच्या नावे, कुटुंबियांच्या नावे कसे ठेवते ते तिला सांगितलं. तिच्या दृष्टीने मी तरुणच होते. म्हणजेच जर ही बँकवाली बाई या वयात ते ‘मेरे बाद क्या’ वालं लिहून ठेवू शकते तर आपण सांगायला काहीच हरकत नाही. आणि तिने चटकन मुलीच्या नावाच्या नॉमिनेशन फोर्मवर सह्या केल्या. वर म्हणाली “हां ना बेटा, इन्सान का क्या भरोसा. आज है कल कुछ भी हो सकता है ।”चला माझा निशाणा बरोबर लागला होता. मग थोड्या घरगुती चौकशा करून तिला रिलॅक्स केलं. हेच जर ‘आप मरनेके बाद आपका पैसा किसको देना है?’ विचारलं असतं तर आजीबाई सैरभैर झाली असती.
असेच एक रिटायर्ड आजोबा आले. काही पैसे मुलांना वाटून टाकले; येणारे काही पैसे पण देऊन टाकणार असं म्हणाले. पुन्हा एकदा थेट सल्ला न देता माझं स्वतःचं उदाहरण देत म्हंटल “आमच्या आईचे आलेले पैसे ती आम्हा भावंडांना देत होती, पण आम्हीच म्हंटल हे पैसे तुझ्यासाठी ठेव. हवं तर आमच्या नावाने नॉमिनेशन कर, कारण या रिसीटचा आधार काय असतो हे ती रिसीट दुसऱ्याकडे गेल्यावर कळतं.” आजोबांनी ‘माझी मुलं अशी नाहीतच मुळी’ असे काहीसे भाव दर्शवले, मात्र पुढच्या महिन्यात येऊन चक्क नॉमिनेशन करून गेले. भरभरून दुवा देऊन गेले. अशा बऱ्याच आजीआजोबांच्या प्रेमळ दुवा आजवर मिळाल्या आहेत.
छोटीछोटी काम करणारे कामगार/कारागीर अगदी छोट्या रकमा जमा करतात. ते शंभर-पाचशे रुपये किती मोठे आहेत ते बँकरने त्यांना जाणवून द्यायचं असतं. करोडोच्या गिऱ्हाईकांपाठी धावायला मोठी कमर्चाऱ्यांची फौज असते पण छोट्या ग्राहकांसाठी कोणी उभं राहत नाही . यांच्या पैशाची क्रयशक्ती बाजारात फार नसली तरी जगण्यासाठी लागणारी ऊर्जा त्यात ठासून भरलेली असते. मानवी मनाचा, नातेसंबंधांचा विचार करत, पगाराच्या पलीकडे जात बँकिंग करायचे असते. ग्राहक पैशाचे व्यवहार करण्यासाठी बँकेत येत असला तरीही त्या प्रत्येक पै सोबत जोडलेले भावनिक व्यवहार समजून घेणं, ग्राहकाच्या मानसिकतेचा विचार करणं प्रत्येक बँकरचं कर्तव्य आहे.आणि हे केलं तर प्रत्येक दिवस दिवाळीदसरा होऊन येतो.

स्मिता गानू जोगळेकर.
9892551950
smita_dj@hotmail.com
