एक दुर्लक्षित पण मौल्यवान लाभ

आजच्या डिजिटल युगात डेबिट/ATM कार्ड हे केवळ व्यवहाराचे साधन न राहता, विविध सुविधा पुरवणारे एक प्रभावी माध्यम बनले आहे. यातील एक महत्त्वाचा आणि बहुतांश लोकांच्या दृष्टिआड गेलेला लाभ म्हणजे मोफत जीवन/अपघाती विमा संरक्षण. बहुतेक बँका त्यांच्या डेबिट कार्ड धारकांना एक निश्चित रक्कमेचा मोफत अपघाती/ जीवन विमा देतात. त्यासाठी कोणताही प्रीमियम भरावा लागत नाही. जीवन / अपघाती विम्याची रक्कम मर्यदित जरी असली तरीही दुर्लक्षित करण्यासारखी नक्कीच नसते. मात्र या सुविधेची जाणीव नसल्यामुळे अनेक कुटुंबं ( अर्थात मृत व्यक्तीचे कुटुंबीय) या लाभापासून वंचित राहत असतात.
या ब्लॉगच्या माध्यमातून आपण या बाबत अधिक माहिती करून घेऊयात.
अशी विमा रक्कम साधारणपणे किती असते?
-जीवन विमा रक्कम: ₹ १ लाख ते ₹ ५लाखांपर्यंत.
-अपघाती विमा रक्कम: ₹ २ लाख ते ₹ १० लाखांपर्यंत.
(ही रक्कम बँक, कार्ड प्रकार आणि अटींनुसार बदलते.)
🧾 दावा करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे:
-मृत्यू प्रमाणपत्र
-डेबिट कार्डची प्रत
-मृत व्यक्ती व दावा करणाऱ्याचे ओळखपत्र
-नातेवाईक असल्याचा पुरावा
-बँकेने मागितलेली इतर कागदपत्रे
📝 दावा प्रक्रिया:
- बँकेला त्वरित कळवा: कार्ड धारण करणाऱ्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर शक्य तितक्या लवकर बँकेला माहिती द्या.
- कागदपत्रे सादर करा: आवश्यक कागदपत्रे बँकेच्या शाखेत किंवा ऑनलाइन पोर्टलद्वारे सादर करा.
- अतिरिक्त माहिती द्या: बँकेकडून अतिरिक्त माहितीची मागणी झाल्यास ती त्वरित पुरवा.
- दाव्याची प्रक्रिया: बँक तुमच्या दाव्याची पडताळणी करून विमा रक्कम मंजूर करेल.
मर्यादा आणि अटी:
-विमा मिळण्यासाठी त्या कार्डद्वारे नुकताच व्यवहार झालेला असावा. (३० ते ९० दिवसांत)
-बँकेने विमा सेवा सुरू ठेवलेली असावी.
-काही बँका कार्ड सक्रीय नसेल तर दावा नाकारतात.
-काही वेळा फक्त अपघाती मृत्यूसाठी कवच लागू असते.
लक्षात घ्या ! फक्त डेबिट कार्डचा विमा पुरेसा नाही!
-असा विमा संस्थांमार्फत कार्डच्या मार्केटिंगसाठी दिला जातो. त्यामुळे असा विमा मर्यादित असतो. कुटुंबाच्या गरजा भागवण्यासाठी अपुरा असू शकतो.
-आपल्या उत्पन्न, जबाबदाऱ्या, कर्ज व भविष्याच्या गरजा लक्षात घेऊन स्वतःहून जीवन व अपघाती विमा घेणे आवश्यक आहे.
-सुयोग्य विमा/गुंतणवूक सल्लागाराचा सल्ला घेऊनच स्वतःसाठी आणि कुटुंबियांसाठी विमा घेणे केव्हाही श्रेयस्कर असते.
👨💼 विमा सल्लागाराची गरज का?
-तुमच्यासाठी योग्य रक्कमेचा व योग्य प्रकारचा विमा निवडण्यात मदत करतात.
-अटी व शर्तींचे स्पष्टीकरण देतात.
-विमा घेताना किंवा दावा करताना तांत्रिक बाबी समजावून सांगतात.
-कुटुंबाला योग्य रक्षण मिळेल याची खात्री देतात.
👪 विमा व आर्थिक माहिती कुटुंबीयांशी शेअर का करावी?
-मृत्यू किंवा अपघातानंतर कुटुंबाला माहितीच नसेल, तर दावा होऊ शकत नाही
-कोणते विमे आहेत, कसे दावा करायचे, किती रक्कम आहे याची माहिती सपष्ट रितीने शेअर करणे गरजेचे आहे.
-Nominee ची माहिती अपडेट असणे अत्यावश्यक आहे.
निष्कर्ष:
डेबिट कार्डद्वारे मिळणारे जीवन व अपघाती विमा हे एक दुर्लक्षित पण मौल्यवान फायदे आहेत. बँकेच्या अटी व शर्तींनुसार मिळणाऱ्या या विम्याची मर्यादा निश्चित असते आणि तो केवळ प्राथमिक सुरक्षा पुरवतो. म्हणूनच, आपल्या गरजांनुसार स्वतंत्र व पर्याप्त विमा कवच असणे अत्यावश्यक आहे. यातूनच योग्य आर्थिक नियोजन, विमा सल्लागाराचे मार्गदर्शन आणि कुटुंबीयांशी आर्थिक माहितीची पारदर्शकता या गोष्टींचे महत्त्व अधोरेखित होते. आर्थिक सुरक्षेसाठी सजग रहा, माहितीपूर्ण निर्णय घ्या!
संबंधित शॉर्ट व्हिडिओ : https://youtube.com/shorts/5CTz0ONZ070
टीम SWS

