सायबर गुन्हेगारी प्रकार – भाग १४
कित्येक वर्षांपासून कुठल्याही मिळत नसलेल्या माहितीपाशी आपले घोडे अडले की आपण गुगुल किंवा तत्सम सर्च इंजिनला शरण जातो आणि हवी असलेली माहिती मिळवितो. कदाचित घरातल्या कोणावर नसेल पण अशा हवी ती तात्काळ पुरविणाऱ्या सर्च इंजिनवर आपला गाढ विश्वास असतो. विशेषतः बँकिंग, मोबाईल नेटवर्क, इन्शुरन्स, ट्रॅव्हल, इ कॉमर्सशी संबंधित अडचण आली की आपण सर्च इंजिनवर कस्टमर केअर नंबर शोधतो आणि तिथे मिळालेल्या समाधानावर डोळेझाकपणे विश्वास ठेवून संबंधित पावले उचलतो. या आपल्या सर्च इंजिन गुलामगिरीचा फायदा सायबर गुन्हेगार उठवितात आणि आपल्याला त्यांच्या सापळ्यात अडकवितात. या पोस्टद्वारे याबद्दल सविस्तर जाणून घेऊयात.

ही फसवणूक कशी केली जाते?
▶️ सायबर गुन्हेगार बनावट वेबसाईट्स तयार करतात जी हूबेहूब मूळ संस्थेसारखीच दिसणारी असते.
▶️ या वेबसाईटना Google Ads आणि सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन (SEO) वापरून वर सर्च परिणामांत अगदी वर दर्शविले जाते जेणेकरून लोक त्यांचा वापर करतील.
▶️ या साईट्सवर दिलेला कस्टमर केअर नम्बरवर तुम्ही कॉल करता तेव्हा ते स्वतःला मूळ संस्थेचा अधिकृत प्रतिनिधी असल्याचे सांगतात.
▶️ तुमच्या समस्येचे आर्थिक समाधान देतांना ते तुम्हाला तांत्रिक कारणास्तव’ किंवा ‘रिफंड मिळण्यासाठी’ असं सांगून OTP, कार्ड नंबर, CVV, किंवा UPI PIN मागतात आणि तुम्ही ही माहिती देताच ते तुमच्या खात्यातून पैसे लाटतात.
झटपट समाधान शोधणारे ग्राहक, बँकिंग, टेलिकॉम, गॅस एजन्सी, किंवा इतर सेवांसाठी नंबर शोधणारे लोक अशा फ्रॉड्सला बळी पडतांना दिसतात.
हे टाळण्यासाठी आपण पुढील काळजी घेऊ शकतो.
काय काळजी घ्याल?
✅ अशी कस्टमर केअर मदत मिळविण्यासाठी नेहमी अधिकृत वेबसाइटचाच वापर करा.
✅URL मध्ये बेमालूमपणे केलेली अक्षरांची अदलाबदल फेक वेबसाईटवर घेऊन जाऊ शकते. सर्च परिणामांतून ओपन केलेल्या वेबसाईटच URL चे शब्द/स्पेलिंग मूळ वेबसाइटशी जुळते किंवा नाही ते तपासून पहा.
✅http ने सुरु होणाऱ्या वेबसाईट्स फेक असण्याची शक्यता असते हे लक्षात असू द्या.
✅OTP, पासवर्ड, CVV, UPI PIN अशी खाजगी माहिती कोणा अनोळखी व्यक्तीसोबत शेअर करू नका.
जर तुम्ही अशा फसवणुकीस बळी पडलात तर त्वरित १९३० या नम्बर वर कॉल करा किंवा https://cybercrime.gov.in वर तक्रार द्या.
निष्कर्ष: पहिलेच पाऊल सावधतेचे असू द्या!
सर्च इंजिनवर दिसणाऱ्या पहिल्या काही सर्च रिझल्ट्सवर लगेच विश्वास ठेऊन संपर्क करू नका. तो पडताळण्यासाठी थोडा वेळ जास्त घालवा, अधिकृत स्रोत तपासा. अशी सावधगिरी बाळगल्याने आपण फसवणुकीच्या जाळ्यात अडकण्यापासून स्वतःचं संरक्षण करू शकतो. सावध रहा, सुरक्षित रहा, सजग ग्राहक बना!
टीम SWS

