प्रा. सौ.गौरी पिंपळे

अर्थव्यवस्थेची व्याप्ती मोजण्याचं प्रमाण हे जीडीपी – ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट या संकल्पनेमध्ये मांडलं जातं. जीडीपीचं समीकरण हे खालील प्रमाणे आहे.
GDP = C + I + G + (X- M)
C = Consumption
I = Investment
G = Government Expenditure
X = Export
M = Import
आता या समीकरणाप्रमाणे देशात एकूण ग्राहकांकडून वेगवेगळ्या प्रकारची खरेदी किती होते म्हणजेच Consumption किती होतं आणि त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारची देशांतर्गत गुंतवणूक (Investment ) किती आहे, सरकारचा एकूण खर्च (Government Expenditure ) आणि त्याच्यानंतर देशाच्या एकूण निर्यातीमधून एकूण आयात वजा करून जे उत्तर मिळेल समीकरण मिळेल ते आधीच्या बेरजेत मध्ये मिळवलं जातं. यात महत्त्वाची गोष्ट अशी असते की जेव्हा नागरिकांचं उपभोगासाठी खरेदी करणे वाढतं तेव्हा गुंतवणूक ही कमी होते आणि सरकारी खर्च वाढल्यानंतर त्याच्यामुळे वेगवेगळ्या प्रकारच्या रोजगाराच्या संधी उपलब्ध होतात आणि त्यामुळे नागरिकांच्या हातात खेळता पैसा वाढतो आणि हा पैसा जर गुंतवणुकीकडे नाही वळवला तर तो पैसा पूर्णपणे उपभोग घेण्याकडे वळतो म्हणजे पर्यायाने Consumption वाढतं.
आज आपण जागतिक आकडेवारी पाहिली तर अमेरिकी नागरिकांचा बचत दर हा ४. ६% आहे. म्हणजे अमेरिकेतील नागरिक एकूण उत्पन्नाच्या ४. ६% बचत करतो. याचाच अर्थ असा की अमेरिकन नागरिक हा एकूण उत्पन्नाच्या ९५. ४% खर्च करतो. हा बचत दर सरासरी आहे. म्हणजे काहीजण याच्यापेक्षा कमी बचत करतात. जगाचा सरासरी बचत दर २८. २% इतका आहे तर भारतीय नागरिकांचा सरासरी बचत दर हा ३०. २% इतका आहे. जितकी बचत जास्त तितक्या त्या देशात देशांतर्गत गुंतवणूक जास्त. त्यामुळे बचत ही गुंतवणुकीवर थेट परिणाम करणारा घटक आहे.वरती GDP चं जे समीकरण पाहिलं त्यातील Consumption हे नागरिकांच्या एकूण खर्चावर अवलंबून आहे. अमेरिकेसारख्या उपभोगाला प्राधान्य देणाऱ्या देशात नागरिकांचं Consumption हे अर्थात जास्त आहे. जगाच्या लोकसंख्येपैकी ४% लोकसंख्या अमेरिकेत आहे आणि ही४% लोकसंख्या जगातील ३२% इतकं Consumption करते. म्हणजे विचार करा किती पटीने जास्त अमेरिकन जनता उपभोग घेते. इतरांनी अमेरिकेला जास्तीत जास्त वस्तू पुरवठा करायचा आणि त्याबदल्यात इतर देशांनी अमेरिकन डॉलर जमा करायचे. याचा परिणाम अमेरिकेचा GDP आकडा मोठ्या प्रमाणात वाढला. ४% असलेले लोक जर ३२% वस्तू वापरत असतील तर किती पटीने आकडा वाढतो हे लक्षात घ्यायला हवं.म्हणजे तसं बघितलं तर लोकसंख्या जास्त असलेल्या देशाचा GDP हा जास्त असला पाहिजे. पण तसा तो नाहीये.
याची बरीच कारणं आहेत. एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी की संपूर्ण जागतिक अर्थव्यवस्था ही डॉलरकेंद्री असल्यामुळे प्रत्येक गोष्टीचं मूल्यमापन हे ‘ डॉलर’ मध्ये केलं जातं. हे अमेरिकेसाठी योग्य आहे पण इतर देशांनीही सगळं मूल्यमापन ‘डॉलर ‘ मध्येच करायचं हे कितपत योग्य आहे? कारण इतर देशांनी निर्यात प्रधान अर्थव्यवस्था बनण्यासाठी आपल्या चलनाचं अवमूल्यन केलेलं आहे. निर्यातीमुळे डॉलर्स मिळतील आणि आपल्याकडे रिझर्व्स जास्त राहतील या हेतूने. आणि हे खरं सुद्धा आहे. पण याचा फायदा अमेरिकेला जीडीपीच्या दृष्टीने सर्वात मोठी अर्थव्यवस्था म्हणून राहण्यासाठी होतो. कसा? ते आपण बघूया.
अमेरिकेत एक मेथीची जुडी २ डॉलरला मिळते. तीच मेथीची जुडी भारतात २० रुपयाला मिळते.डॉलर- रुपया दर ८६ रुपये प्रति डॉलर असा आहे. रुपयांमध्ये अमेरिकेतील मेथीची जुडी १७२ रुपयांना झाली आणि भारतातील मेथीची जुडी ही ०. २३ डॉलरला पडते.असंच प्रत्येक गोष्टीबद्दल आहे. भारतात बाटलीबंद पाण्याची किंमत २० रुपये आहे. अमेरिकेत बाटलीबंद पाण्याची किंमत १.५ डॉलर म्हणजे १२९ रुपये आहे. हा फरक Cost of Living मुळे येतो. याचाच अर्थ भारतातील राहणीमान हे खर्चिक नाही.( अपवाद रिअल इस्टेट.) हा जो किमतीतील फरक आहे त्यामुळे भारतातील Consumption चे मूल्य हे अमेरिकेतील Consumption मूल्यापेक्षा कमीच राहणार. वरील उदाहरण बघितलं तेच पुढे बघू.१० पाण्याच्या बाटल्या खरेदी केल्या गेल्या तर त्याचं मूल्य अमेरिकेत १५ डॉलर्स आणि भारतातील २. २ डॉलर्स. म्हणजे Consumption सारखंच आहे. पण चलन दरातील असलेला फरक त्यामुळे भारतातील मूल्य हे कमी आहे. हेच इतर देशांच्या बाबतीतही लागू होतं.
भारतासारख्या देशामध्ये आजही आठवडी बाजार भरतात. तसेच वेगवेगळ्या ठिकाणी यात्रा/जत्रा असतात. यांचा टर्नओवर किती याची अधिकृत आकडेवारी मिळावी अशी व्यवस्था इथे नाही. त्यामुळे त्याचं ही मूल्यमापन जीडीपी कक्षेच्या बाहेर राहतं.एखादं कुटुंब शेतीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचं धान्य, भाजीपाला पिकवतं आणि त्यातला बराचसा भाग हा घरासाठी वापरला जातो. उरलेला विक्री करतो. त्याने घरासाठी ठेवलेला उत्पादनाचा भाग हा जीडीपी कक्षेमध्ये येत नाही. एखादी स्त्री कॉर्पोरेट मध्ये जॉब करते आणि १५/२० लाख ‘ पॅकेज ‘ घेते , हे जीडीपी कक्षेमध्ये येतं पण त्याच वयाची दुसरी उच्चशिक्षित स्त्री ही घरात राहून मुलांवर उत्तम संस्कार करते, आई/ वडील/ सासू/ सासरे यांच्या जबाबदाऱ्या पार पाडते. थोडक्यात समाजासाठी/ राष्ट्र बांधणी साठी ती योगदान देते. तिचं काम जीडीपी मूल्यमापनात येत नाही. सगळ्या गोष्टी फक्त आणि फक्त Monetary Terms मध्ये बघितल्याने पाश्चिमात्य राष्ट्रांनी Individualism ला अतिमहत्व देऊन जीडीपीचे अमेरिकेचे आकडे मात्र वाढवले. आज तसं बघितलं तर अमेरिकेचे एकूण कर्ज हे जीडीपी च्या १२४% आहे म्हणजे अमेरिकी अर्थव्यवस्था ही बाकीच्या जगाकडून कर्ज घेऊन टिकून आहे.
सांगायचा मुद्दा हा की जीडीपी वरून अर्थव्यवस्थेची क्रमवारी ठरते पण ती संकल्पना किती पोकळ आहे हे याच्यावरून दिसून येईल. मुळात जीडीपी ही संकल्पना १९३४ साली अस्तित्वात आली. त्याचबरोबर ग्रॉस नॅशनल प्रॉडक्ट – GNP या संकल्पनेचा सुद्धा उदय झाला. GNP मध्ये संपूर्ण देशातील एकूण उत्पादन विचारात घेतलं जातं. १९९० पर्यंत अमेरिका GNP चे आकडे प्रसिद्ध करत होती.पण पेट्रो डॉलर उदयाला आल्यानंतर हळूहळू करून अमेरिकेचं उत्पादन क्षेत्र हे इतर देशांकडे विशेषतः चीन, जपान अशा देशांकडे वळलं आणि त्यांनी चलनाचं अवमूल्यन केल्याने अमेरिकेला वस्तू उत्पादित करण्यापेक्षा डॉलर प्रिंट करणं हे जास्त स्वस्त झालं. आणि अमेरिका फक्त जीडीपीचे आकडे प्रसिद्ध करायला लागली.

साधारण दहा, पंधरा दिवसांपूर्वी अमेरिकेतील एक संशोधक संस्था अटलांटा यांचा एक अहवाल प्रसिद्ध झाला. त्यात त्यांनी मार्च २०२५ मध्ये संपणाऱ्या नवीन वर्षातील पहिल्या तिमाहीसाठी अमेरिकेचा जीडीपी वाढीचा दर हा (- २.४) % असा प्रसिद्ध केला. या कालावधीसाठी हाच दर आधी ३.९% इतका अपेक्षित होता. अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या सतत बदलणाऱ्या धोरणांमुळे अर्थव्यवस्था वाढीच्या दरात ६.३% इतकी घसरण आहे म्हणजे अमेरिकी अर्थव्यवस्था Recession कडे जाईल याचे स्पष्ट संकेत आहेत.त्यातच गेल्याच आठवड्यात अमेरिकेच्या डिपार्टमेंट ऑफ गवर्नमेंट एफिसियन्सी (DOGE) चे प्रमुख एलॉन मस्क यांनी ट्विटर वर (X प्लॅटफॉर्मवर) असं ट्विट केलं होतं की जीडीपी समीकरण नव्याने तयार करण्याची गरज आहे. त्याच्यावरच्या इतर लोकांच्या प्रतिक्रियांना उत्तर देताना मस्क यांनी असंही विधान केलं की ‘ Keynes was great evil ‘. अर्थशास्त्रामध्ये दोन थिअरी महत्वाच्या आहेत त्यातली एक स्मिथ थिअरी – जनक ॲडम स्मिथ आणि दुसरी केनेशियन थिअरी – जनक जे एम केन्स. जे एम केन्स हे अमेरिकेवर प्रचंड प्रेम असलेले ब्रिटिश अर्थशास्त्रज्ञ. या महाशयांचं योगदान असं आहे की दुसऱ्या महायुद्धानंतर जागतिक अर्थव्यवस्थेची घडी बसवताना अमेरिकेला इतकं महत्व दिलं की त्यामुळे अमेरिका महासत्ता बनली. आज त्याच केन्स यांना एलॉन मस्क जर evil म्हणत असतील तर आश्चर्यच आहे. त्यामुळे जीडीपीचे नवीन समीकरण कसे असेल आणि केन्सला नाकारणाऱ्या या अमेरिकेचे अर्थशास्त्रातील नवीन ‘डॅडी ‘ कोण हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल.

प्रा. सौ.गौरी पिंपळे,
अकाउंटन्सी आणि अर्थशास्त्राच्या अनुभवी प्राध्यापिका
संपर्क: gauripimple123@gmail.com
पोस्ट लिखाण तारीख: १४/०३/२०२५
आर्थिक क्षेत्राशी संबंधित प्रा. गौरी यांचे युट्युब चॅनेल : https://www.youtube.com/channel/UCNPa2VX5FyXvhafI7OjYBnA
