सायबर गुन्हेगारी प्रकार – भाग १३
प्रगत तंत्रज्ञानाबरोबरच सायबर फसवणुकीचे नवनवीन प्रकारही समोर येत आहेत. आणि आता AI च्या प्रसारामुळे ते अधिक धोकादायक आणि गुंतागुंतीचे होत चालले आहेत. आज Voice Cloning Fraud बद्दल जाणून घेऊयात.
काय आहे Voice Cloning? Voice Cloning म्हणजे आपल्या ओळखीच्या व्यक्तीच्या आवाजाची हुबेहूब नक्कल करणे. Voice Cloning हे आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) वर आधारित तंत्रज्ञान आहे, ज्याद्वारे AI अल्गोरिदम दिलेल्या फक्त 30 सेकंदांच्या ऑडिओ क्लिपवरून त्यातील आवाजाची हुबेहूब नक्कल होऊन ऑडिओ आउटपुट तयार मिळते. म्हणजे त्या व्यक्तीसारखंच बोलणं, टोन, उच्चार आणि वेग यांचे हुबेहूब अनुकरण करता येणे आता शक्य झाले आहे. सोशल मीडिया, व्हॉट्सअॅप, यूट्यूब किंवा झूम कॉलवरून फसवणूक करणारे एखाद्याचा आवाज रेकॉर्ड करतात. आणि मग या क्लोन्ड आवाजाचा गैरफायदा घेत सायबर गुन्हेगारी घडते.

Voice Cloning फसवणूकीचे उदाहरण:
तुम्हाला तुमच्याच जवळच्या मित्राच्या आवाजात फोन येतो आणि त्याच्या घरातील कोणाचातरी रस्त्यावर मोठा अपघात झाल्याचे तुम्हाला तो (सायबर गुन्हेगार) सांगतो. तो तुम्हाला इमर्जंसी हॉस्पिटलायझेशनचे कारण सांगून तुमच्याकडे मोठ्या रकमेची मागणी करतो. तुम्ही आपलाच मित्र बोलतो आहे आणि तो संकटात आहे असे समजून आणि परिस्थितीचे गांभीर्य, तत्काळ मदतीची गरज ओळखून त्याला (सायबर गुन्हेगाराला) रक्कम ट्रांसफर करता आणि त्याच्या जाळ्यात फसून आपलेच कष्टार्जित पैसे गमावून बसता.
घरात एकटे राहणारे लोक, सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असलेले लोक, ज्या व्यक्तींच्या आवाजाचे क्लिप्स सार्वजनिक ठिकाणी उपलब्ध आहेत अशा व्यकती या प्रकारांना सर्रास बळी पडतांना दिसतात. कुटुंबीय, मित्र, नातेवाईक, सहकारी यांच्याशी असलेल्या तुमच्या भावनिक गुंतवणूकीचा गैरफायदा सायबर भामट्यांकडून घेतला जातो.
ही फसवणूक टाळण्यासाठी काय कराल?
१. कोणत्याही ‘तातडीच्या’ कॉलवर लगेच विश्वास ठेवू नका.
२. पैशाची मागणी करणारा कॉल आला असता लगेच ‘Pay Now Mode’ मध्ये न जाता दुसऱ्या माध्यमातून त्या व्यक्तीशी/ त्यांच्या घरातल्यांशी संपर्क साधून परिस्थीतीची खातरजमा करा.
३. AI च्या युगात व्हॉइस कॉलवरची ओळख ही सत्य ओळख नाही, हे लक्षात ठेवा.
४. अशा कॉल्सवर कधीही OTP, बँक डिटेल्स आणि UPI पेमेंट संबंधित माहिती शेअर करू नका.
५. AI Voice Cloning फसवणुकी बद्दल आपल्या कुटुंबियांना विशेषतः घरातील ज्येष्ठ नागरिकांना जागृत करा.
फसवणूक झाल्यास काय करावे?
१. तक्रार नोंदवा: सायबर गुन्हे विभागाकडे त्वरित तक्रार लेखी दाखल करा.अशी तक्रार http://www.cybercrime.gov.in या राष्ट्रीय सायबर सुरक्षा पोर्टलवर करता येते. तसेच १९३० या राष्ट्रीय सायबर सुरक्षा नम्बरवर देखील करता येते.
२. बँकेला कळवा: जर काही रक्कमेची फसवणूक झाली असेल, तर तुमच्या बँकेला त्वरित माहिती द्या. वेळेपूर्वी केलेली तक्रार बँक खात्यातून पुढे होणारे व्यवहार गोठविण्यास मदत करू शकते.

सारांश:
आजचा काळ तंत्रज्ञानाचा आहे, पण तंत्रज्ञान जितके सोयीचे आहे तितकेच धोकादायकही आहे. Voice Cloning Fraud ही अशीच सायबर लूट आहे, जी आपल्या आवाजाच्या माध्यमातून आपल्या भावनांना साद घालून आर्थिक घाव घालते आहे. तेव्हा सावध रहा, सजग रहा आणि इतरांनाही याबद्दल जागरुक करा.
टीम SWS

