सायबर गुन्हेगारी प्रकार – भाग १२
ॲमेझॉन किंवा फ्लिपकार्ट सारख्या ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म वरून खरेदी करणाऱ्या ग्राहकांची संख्या ज्या प्रमाणात वाढते आहे, त्याच प्रमाणात ऑनलाईन खरेदीदारांची सायबर फसवणुक होण्याचे प्रमाणही वाढते आहे. ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म्सच्या ग्राहकांची आर्थिक लुबाडणूक करण्यासाठी सायबर गुन्हेगारांनी ‘डिलिव्हरी ओटीपी सायबर स्कॅम’ या प्रकाराचा शोध लावलेला आहे. त्याबद्दल सविस्तर जाणून घेऊयात.

काय आहे ‘डिलिव्हरी ओटीपी स्कॅम’ ?
१) ज्यांच्या घरी ऑनलाईन पार्सल्सची डिलिव्हरी नित्य नियमाने होत असते अशा ग्राहकांना आधी लक्ष्य केले जाते.
२) सायबर गुन्हेगारांचा साथीदार ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मचा पार्सल डिलिव्हरी बॉय बनून तुमच्या घरी येतो आणि तुमचे पार्सल स्वीकारण्यास सांगतो.
३) तुम्ही पार्सलवरील तपशील वाचून ती वस्तू तुम्ही ऑर्डर केलेली नसल्याचे त्याला सांगता. पण पार्सलवर असणारे नाव, पत्ता, फोन नंबर तुमचेच असल्याचे दाखवून तो तुम्हाला डिलिव्हरी घेण्यास भाग पडतो.
४) पार्सल स्वीकारण्यास तुम्ही पुन्हा पुन्हा नकार दिल्यावर तो तुम्हाला ‘आमच्या कॉल सेंटरवर कॉल करून ते पार्सल कॅन्सल केल्यास तो ते परत घेऊन जाईल’, अशी बतावणी करतो.
५) त्याचा पिच्छा सोडवण्यासाठी तुम्ही कॉल सेंटरला फोन करता आणि तिथून त्यांचा दुसरा साथीदार तुम्हाला डिलीव्हरी कॅन्सल करणेसाठी ओटीपी मागतो.
६) तुमच्या मोबाईलवर आलेला ओटीपी तुम्ही शेअर करताच, ती डिलिव्हरी कॅन्सल झालेली आहे असे सांगून डिलिव्हरी बॉय पार्सल परत घेऊन जातो.
७) डिलिव्हरी बॉयने काढता पाय घेताच काही वेळाने तुमच्या मोबाईलवर बँकेतून काही रक्कम काढली गेल्याचा SMS येतो. आणि तेव्हा तुम्हाला जाणीव होते की तुम्ही शेअर केलेला ओटीपी हा पार्सल कॅन्सलिंग साठी नसून बँकिंग व्यवहारासाठी होता.
याबाबतचा व्हिडिओ पाहण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा: https://youtu.be/sK2z9lcxQeY
या सायबर घोटाळ्यापासून स्वतःला सुरक्षित कसे ठेवावे?
१. स्रोत अनोळखी असल्यास व्यक्तिगत माहिती शेअर करू नका: फोन, ईमेल किंवा मेसेजच्या माध्यमातून बँक खात्याची माहिती, ओटीपी किंवा इतर गोपनीय माहिती देऊ नका.
२. पार्सल्स डिलिव्हरी / अनोळखी व्यकतीस किंवा त्यांनी सांगितलेल्या कॉल्सला प्रतिसाद देऊ नका: जर कोणी फोनद्वारे तुमची आर्थिक माहिती मागत असेल, तर ती देणे टाळा.
फसवणूक झाल्यास काय करावे?
१. तक्रार नोंदवा: सायबर गुन्हे विभागाकडे त्वरित तक्रार लेखी दाखल करा.अशी तक्रार http://www.cybercrime.gov.in या राष्ट्रीय सायबर सुरक्षा पोर्टलवर करता येते. तसेच १९३० या राष्ट्रीय सायबर सुरक्षा नम्बरवर देखील करता येते.
२. बँकेला कळवा: जर काही रक्कमेची फसवणूक झाली असेल, तर तुमच्या बँकेला त्वरित माहिती द्या. वेळेपूर्वी केलेली तक्रार बँक खात्यातून पुढे होणारे व्यवहार गोठविण्यास मदत करू शकते.
निष्कर्ष
या सायबर घोटाळ्यांपासून वाचण्यासाठी सतर्क राहणे हीच एकमात्र उपाययोजना आहे. सतर्क राहूनच आपण आपली आर्थिक व वैयक्तिक माहिती सुरक्षित ठेवू शकतो. ऑनलाईन खरेदीचा लाभ घेण्यासाठी त्याबाबतच्या तंत्रज्ञानाबद्दल जागरूक राहणे आवश्यक आहे. आपली सुरक्षा, आपल्या हातात आहे! तेव्हा सतर्क राहुयात आणि इतरांनाही करूयात.

सौ. लीना किशोर काळे,
सदस्य, मुंबई ब्रँच.

