जोखीम क्षमतेला साजेसं नियोजनच फायदेशीर

आपल्या आयुष्यातील प्रत्येक महत्त्वाचा निर्णय हा आपण विचारपूर्वक घेतच असतो. मग तो करिअर निवडण्याचा असो किंवा घर अथवा गाडी घेण्याचा असो. या बाबतीत बरेचजण मित्रमंडळी / नातेवाईक यांचा सल्ला घेतात आणि बरेचदा त्यांचे पाहून Peer Pressure/ प्रभावाखाली करिअर/ घर/गाडी इ. निर्णय घेतांना दिसतात. परंतु आर्थिक नियोजन करताना आपण इतरांचे निर्णय पाहून किंवा ऐकून तसेच निर्णय घेणे मात्र योग्य नसते. या क्षेत्रात काम करत असतांना आम्ही बरेचदा हे पाहिले आहे की मित्र किंवा नातेवाईक अमुक एक गुंतवणूक माध्यम निवडतात म्हणून बरेचजण त्याच गुंतवणूक माध्यमाचा आग्रह धरतात आणि हा आंधळा पाठलाग बरेचदा नुकसानकारक ठरतो. आर्थिक नियोजन करताना Risk Profiling अर्थात जोखीम क्षमता तपासणे हे खूप महत्वाचे असते. हे एका उदाहरणातून समजावून घेऊ.
Risk Profiling करण्याची आवश्यकता
अथर्व आणि राहुल, दोघेही बालपणीचे मित्र. दोघांनी एकच अभियांत्रिकीची ब्रँच निवडून शिक्षण पूर्ण केले आणि सारखेच वर्क प्रोफाइल असणाऱ्या संस्थांमध्ये नोकरी घेतली होती. पण त्यांची आर्थिक परिस्थिती मात्र वेगवेगळी होती. अथर्वला वडिलोपार्जित घर, बऱ्यापैकी धनसंपदा चालून आलेली होती आणि पूर्वी आई-वडील नोकरी करणारे असल्याने त्यांची तितकीशी आर्थिक जबाबदारी अथर्ववर नव्हती. त्यामुळे तो गुंतवणूकीचे शेअर ट्रेडिंग सारखे अधिक जोखमीचे पर्याय निवडत असे. राहुलने मात्र विशेष आर्थिक पाठिंब्याविनाच आपल्या कारकीर्दीस सुरुवात केलेली होती. त्याच्यावर आई-वडिलांची, बहिणीची जबाबदारीही होती. स्वतःचे घर, लग्न इ. स्वप्नेही उराशी होती. तरिही राहुलने अथर्वच्या गुंतवणूक पॅटर्नला कॉपी करण्यास सुरुवात केली आणि कालांतराने मोठे आर्थिक नुकसान ओढवून घेतले. नुकसान तर अथर्वचेही झाले होते पण भक्कम आर्थिक परिस्थिती असल्याने त्याला नुकसानाची झळ कमी जाणवली मात्र राहुलला त्यातून बाहेर पडता पडता आपल्या जबाबदाऱ्या आणि स्वप्ने याना मुरड घालावी लागली.
वरील उदाहरणावरून आपल्या लक्षात येते की प्रत्येकाची उत्पन्नाची पातळी, जबाबदाऱ्या, खर्च आणि भविष्याची उद्दिष्टे वेगवेगळी असतात. म्हणूनच, दुसऱ्याच्या आर्थिक नियोजनाची/ गुंतवणूक माध्यमांची नक्कल करणे हे धोकादायक ठरू शकते. दैवाने प्रत्येकाच्या पदरात नशिबाचे/ कुटुंबाच्या स्नेहाचे/ जबाबदाऱ्यांचे/ आर्थिक प्रगतीचे / जीवनाच्या वाटचालीचे वेगवेगळे दान टाकलेले असते. तेव्हा एकासाठी Rich असणारे दैवाचे फासे दुसऱ्यासाठी मात्र Risk चे पडू शकतात. पण यातून निभावून नेण्यासाठी तुमचा आर्थिक सल्लागार तुम्हाला मदत करू शकतो.

निष्कर्ष
आर्थिक नियोजन हा पूर्णतः वैयक्तिक विषय आहे. Risk Profile / आर्थिक जोखीम क्षमता समजून घेतल्याशिवाय गुंतवणुकीचे निर्णय घेणे किंवा इतरांप्रमाणे माध्यमे निवडणे हे नुकसानकारक ठरू शकते. स्वतःच्या जोखीम क्षमतेनुसार योग्य नियोजन करणे आवश्यक आहे. आपल्या आर्थिक नियोजनासाठी तज्ज्ञ सल्लागाराची मदत घेणे सूज्ञपणाचे ठरते. तुमच्याशी सर्व बाबतीत चर्चा करून, योग्य असा आर्थिक नियोजनाचा आराखडा तयार करणे (Financial Plan) आणि शिस्तबद्धरीत्या (Disciplined Active Management) तो अंमलात आणणे (Execution) , हे आर्थिक सल्लागाराचे काम असते. तो तुमचे उत्पन्न, तुमची आर्थिक जोखीम घेण्याची क्षमता, आर्थिक जबाबदाऱ्या आणि भविष्यातील उद्दिष्टांचा विचार करून तुमच्यासाठी सर्वोत्तम गुंतवणुकीचा मार्ग सुचवत असतो. तेव्हा तज्ज्ञांच्या सल्ल्याने जोखीम क्षमता तपासून सुयोग्य आर्थिक नियोजन करणे आणि भविष्याची सुरक्षितता सुनिश्चित करणे केव्हाही उत्तम!

टीम SWS

(Source for All Blog Images: Social Media).
