सायबर गुन्हेगारी प्रकार – भाग ११
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (PM-KISAN) ही केंद्र सरकारची एक महत्त्वाची योजना आहे. या योजनेचा उद्देश्य शेतकऱ्यांना आर्थिक स्थिरता देणे आणि त्यांचे उत्पन्न वाढविण्यास मदत करणे हा आहे. या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना वर्षाकाठी केंद्र सरकारकडून ₹ ६,००० ची आर्थिक मदत दिली जाते, जी तीन हप्त्यांमध्ये (₹२,००० प्रति हप्ता) थेट त्यांच्या बँक खात्यात जमा केली जाते. या योजनेत सरकारकडून आतापर्यंत १८ हप्ते जमा करण्यात आले आहेत आणि आता १९ वा हप्ता कधी देण्यात येणार आहे याची शेतकर्यांना प्रतिक्षा आहे. मात्र ही गोष्ट सायबर गुन्हेगारांच्या नजरेतून सुटलेली नाही आणि कष्टकरी शेतकरी वर्गाचा पैसाही लाटण्याचा नवीन सायबर फ्रॉड पुढे आलेला आहे. नाशिक जिल्ह्यातील अनेक शेतकर्यांची या माध्यमातून फसवणूक झाल्याचे समोर आले आहे.

कशी होत आहे फसवणूक ?
अनेक शेतकर्यांना त्यांच्या मोबाईलवर प्रधानमंत्री किसान योजनेचा हफ्ता आल्याचा मेसेज येतो ज्यात एक लिंक दिली जात आहे. त्या लिंकवर क्लिक केल्यानंतर एक APK फाईल मोबाईल डिव्हाइसवर डाऊनलोड होते. असे होताच मोबाईलमध्ये विशिष्ट प्रोगाम ॲक्टिव्ह होतो आणि टप्प्याटप्प्याने योजनेशी संलग्न केलेल्या बँक खात्यातील रक्कम, मोबाईलवर येणाऱ्या OTP मार्फत काढून घेण्यात येत आहे. म्हणजेच त्या APK फाईलच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे मोबाईल हॅक होत असून त्यातील आर्थिक माहितीचा गैरफायदा घेत सायबर गुन्हेंगारांकडून अनेक शेतकर्यांच्या बँक खात्यातून पैसे लुटण्यात येत आहेत.
याबाबत माहिती देणारा युट्युब व्हिडीओ : https://www.youtube.com/watch?v=C89mGOJrHcQ
असे होऊ नये म्हणून काय काळजी घ्यावी?
१. शेतकऱ्यांनी अनोळखी स्रोतांकडून येणाऱ्या लिंक्सवर क्लिक न करण्याची काळजी घेणे जरुरी आहे. कोणत्याही लिंकवर क्लिक करण्यापूर्वी ती लिंक अधिकृत स्रोताकडून आलेली आहे किंवा नाही ते तपासून घ्यायला हवे.
२. APK फाईलच्या माध्यमातून मोबाईल हॅक करण्याची क्लुप्ती सायबर भामटे कोणाच्याही बाबतीत वापरू शकतात आणि म्हणून आपण सर्वानीच वरील काळजी घ्यायला हवी.
३. आपल्या नात्यातील/ ओळखीतील सर्व शेतकरी बंधू-भगिनींना या संदर्भांत जागरूक करायला हवे.
याद्वारे आर्थिक फसवणूक झाल्यास काय करावे?
१. तात्काळ बँकेशी संपर्क साधा: तुमच्या बँकेला त्वरित कळवा आणि तुमचे खाते आर्थिक व्यवहारांसाठी तात्पुरते ब्लॉक करा.
२.तक्रार द्या: सायबर क्राइम्सची तक्रार पोलीस विभाग किंवा सायबर क्राइम पोर्टलवर नोंदवा. अधिकृत पोर्टलवर https://cybercrime.gov.in/ तक्रार नोंदवून तुम्हाला त्वरित मदत मिळू शकते. या संदर्भात १९३० हा २४x ७ उपलब्ध असणारा हेल्पलाईन नंबर आहे.
३. सर्व पासवर्डस बदला: तुमच्या सर्व खात्यांचे पासवर्डस बदला आणि मजबूत पासवर्ड तयार करा.
४. डिव्हाइस स्कॅन करा: तुमच्या मोबाईल फोनची सुरक्षा तपासा. अधिक नुकसान टाळण्यासाठी संशयित फाईल्स डिलीट करा.
ता. क. PM-KISAN योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी PM-KISAN पोर्टलवर नोंदणी करणे आवश्यक आहे. अधिक माहिती व अर्जासाठी: https://pmkisan.gov.in
– सायबर सुरक्षा आणि जागरूकता यासाठी प्रयत्नशील: टीम SWS

