सायबर गुन्हेगारी प्रकार – भाग ८
राजला कामानिमित्त नेहमीच विमान प्रवास करावा लागत असे. असेच एकदा एरपोर्टवर विमानाची वाट पाहत असताना त्याला त्याच्या फोनवरून काही कामे हातावेगळी करायची होती. तिथे दिसत असलेल्या ‘Airport_Free_WiFi’ या नेटवर्कला त्याने कनेक्ट केले आणि आपली कामे करू लागला. हे सामान्य वाय-फाय नव्हते. तिथेच उपस्थित असणाऱ्या एका सायबर गुन्हेगाराने त्याच्या इंटरनेट नेटवर्कचे नाव एरपोर्टचीच सुविधा असावे असे दिलेले होते आणि त्याने राजचा फोन हॅक करून त्यातील आर्थिक डेटाचा गैरवापर करून राजला लुबाडले.
हीच आहे कन्सेप्ट Evil Twin Phishing ची. हा एक सायबर फसवणुकीचा प्रकारअसून हॅकर्स खरे/योग्य वाटावे अशा नावाने फसवे (Evil) वाय-फाय नेटवर्क तयार करतात (Twinning Original Network). लोक या खोट्या नेटवर्कला जोडले जातात आणि हॅकर्सना त्यांच्या डिव्हाईसचा ताबा घेऊन त्यांच्या संवेदनशील माहितीपर्यंत (उदा. पासवर्ड, बँक डिटेल्स) सहज पोहचता येते.

Evil Twin Phishing कसे रोखावे ?
१. संवेदनशील व्यवहारांसाठी सार्वजनिक WI-FI टाळाः सार्वजनिक वा फ्री असणारे WI-FI नेटवर्क सायबर गुन्हेगारांकडून पसरविले जाळे असू शकते. कितीही चांगला स्पीड मिळत असला तरीही अशा नेटवर्कला कनेक्ट करणारे टाळा.
२. आपण वापरत असलेल्या नेटवर्कचे तपशील तपासा: आपापल्या नेटवर्कला जोडण्यापूर्वी, नेहमी नेटवर्कचे नाव (एस. एस. आय. डी.) दोनदा तपासा आणि WI-FI सेवा देणाऱ्या संस्थेबरोबर पडतांळून बघा. सायबर गुन्हेगारांकडून पुरविले जाणाऱ्या नेटवर्कचे नाव तुमच्या नेहेमीच्या नेटवर्क सारखेच दिसते. तेव्हा स्पेलिंगमधील छोटासा फरक, स्मॉल / कॅपिटल लेटर्स मधील फरक तपासा.
३. VPNs (Virtual Private Networks) चा वापर करा: VPN तुमच्या इंटरनेट रहदारीला सुरक्षित करते, ज्यामुळे तुम्ही फसव्या नेटवर्कशी जोडले गेलात तरीही हल्लेखोरांना डेटा चोरणे कठीण होते.
४. Two-Factor Authentication (२FA) चा वापर करा: तुमच्या बँकिंग खात्यांसाठी सुरक्षिततेचा अतिरिक्त स्तर जोडा (पासवर्ड आणि OTP). याने तुमच्या ओळखीशी (Identity) तडजोड केली गेली तरीही अनधिकृत वापर रोखता येऊ शकतो.
५. सिक्युरिटी सॉफ्टवेअरचा वापर करा: संभाव्य धोके शोधण्यात आणि रोखण्यासाठी तुमच्या डिव्हाइसवर अँटीव्हायरस आणि अँटी-मालवेअर सॉफ्टवेअरचा वापर करा. हे सॉफ्टवेअर वेळोवेळी अपडेट करून घ्या.
६. ऑटो कनेक्ट WIFI फिचर डिसेबल करा: आपल्या डिव्हाईसवरील WIFI ला ऑटो कनेक्ट करणारे फिचर बंद केल्यास तुमचे डिव्हाईस फ्री, पब्लिक WIFI ला कनेक्ट होणार नाही आणि संभाव्य धोका टळू शकेल.
Evil Twin Phishing चा बळी ठरलात तर काय करावे ?
१.तात्काळ WIFI डिसकनेक्ट करा: तुम्ही बनावट नेटवर्कशी जोडले गेल्याचे तुम्हाला वाटत असल्यास, लगेच वाय-फाय बंद करा.
२. पासवर्ड बदला: संशयास्पद नेटवर्कशी जोडले गेल्यांनतर,वाय-फाय बंद करा आणि आपले बँकिंग पासवर्ड बदला.
३. आर्थिक व्यवहारांवर लक्ष ठेवाः कोणत्याही असामान्य व्यवहारांची वेळेवर दखल घेण्यासाठी तुमच्या बँक विवरणपत्रांवर आणि खात्यांच्या हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवा. गरज पडल्यास बँक व्यवहार गोठवा.
४. बँकेला संपर्क साधाः पुढील अनधिकृत व्यवहार रोखण्यासाठी संभाव्य उल्लंघनाबद्दल तुमच्या बँक आणि क्रेडिट कार्ड कंपन्यांना कळवा. गरज पडल्यास बँक व्यवहार गोठवा
५. तक्रार द्या: सायबर क्राइम्सची तक्रार पोलीस विभाग किंवा सायबर क्राइम पोर्टलवर नोंदवा. अधिकृत पोर्टलवर https://cybercrime.gov.in/तक्रार नोंदवून तुम्हाला त्वरित मदत मिळू शकते. या संदर्भात १९३० हा २४x ७ उपलब्ध असणारा हेल्पलाईन नंबर आहे.
निष्कर्ष
Evil Twin Phishing आजच्या सायबर गुन्हेगारी लँडस्केपमध्ये चतुरपणे रचलेले जाळे आहे. ते कसे चालते हे समजून घेऊन आणि प्रतिबंधात्मक उपायांचा अवलंब करून तुम्ही या फसव्या हल्ल्याला बळी पडण्याची तुमची जोखीम लक्षणीयरीत्या कमी करू शकता. याबद्दल माहिती ठेवा, सतर्क रहा आणि डिजिटल जगात सुरक्षितपणे नेव्हिगेट करण्यासाठी आपल्या सायबर सुरक्षेला प्राधान्य द्या !

