सायबर गुन्हेगारी प्रकार – भाग ६
विशिंग हा शब्द Voice आणि Phishing या दोन शब्दांच्या संयोगातून तयार झालेला आहे. हा एक सायबर फसवणुकीचा प्रकार असून यात फसवणूक करणारे सायबर गुन्हेगार दूरध्वनी (फोन कॉल.. म्हणून Voice Phishing ) द्वारे स्वतःला एखाद्या प्रतिष्ठित संस्थेचा कर्मचारी, बँकेचा प्रतिनिधी किंवा सरकारी अधिकारी असल्याचे भासवून आपल्याकडून आर्थिक गोपनीय माहिती मागवतात आणि त्याचा गैरवापर करून ती देणाऱ्या व्यक्तींची आर्थिक फसवणुक करतात. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने याबाबत वेळोवेळी चेतावणी दिली आहे, तरीही जागरूकतेच्या अभावामुळे आणि फसवणूक करणाऱ्यांच्या प्रगत युक्त्यांमुळे अशा घटनांमध्ये वाढ होत आहे.
यात सायबर गुन्हेगार तुमच्या ऑनलाईन हालचालींवर नजर ठेवून असतात. तुमची सोशल मीडियावर असणारी प्रतिभा तुमच्या आर्थिक स्तराविषयी आडाखे बांधण्यासाठी सायबर गुन्हेगारांना मदत करत असते. तुम्ही सोशल मीडियावर, मेसेंजिंग अँपवर किंवा इतर डिजिटल माध्यमांद्वारे जी काही पावले उचलत असतात तिची टेहळणी सुरु असते. तुमच्याद्वारे ऑनलाईन चालणारा संवाद / एखाद्या संस्थेबद्दल किंवा प्रॉडक्टबद्दल फीडबॅक अथवा तक्रार / एखादा आर्थिक व्यवहार करण्यासंबधी प्राथमिक स्टेप्स इ. कृतींवर सायबर गुन्हेगार लक्ष ठेवून असतात. त्या कृतींचे विश्लेषण करून आणि त्याद्वारे तुम्हाला फोन कॉल करून तुमची आर्थिक फसवणूक केव्हा आणि कशी करता येईल याची ते वाटच बघत असतात. अशा बहुतांश कॉल्सची भाषा अर्जन्सीची (तत्काळ कृती करण्याची ) , लोभ दाखविण्याची किंवा भय दाखविण्याची असते.
उदाहरणार्थ
१) सायबर गुन्हेगार फोन कॉल द्वारे स्वतःला बँक अधिकारी / सरकारी प्रतिनिधी / सेवा पुरवठादार / तक्रार निवारण अधिकारी असल्याचे सांगत तुमच्याकडून तुमचे बँक खात्याचे तपशील किंवा OTP मागतात ज्याचे रूपांतर नंतर आर्थिक फसवणुकीत होते.
२) तुम्ही सोशल मीडियावर सिंगापूर ट्रिपविषयी चर्चा करत असाल तर ती सुवर्णसंधी बघून एखाद्या नामांकित प्रवास कंपनीचा प्रतिनिधी असल्याचे सांगत तुम्हाला फोन येतो आणि प्राथमिक माहिती देऊन एखाद्या बनावट लिंकद्वारे पेमेंट करायला सांगण्यात येऊ शकते.अशा लिंकमार्फत तुमचे नेटवर्क किंवा डिव्हाईस हॅक करून तुमचे बँक खात्याचे तपशील किंवा OTP चोरू चोरले जाऊ शकतात ज्याचे रूपांतर बँकेतून पैसे लुटण्यात होते.
३) सायबर गुन्हेगार फोन कॉल द्वारे काही प्रॉडक्ट किंवा सेवांविषयी माहिती देऊन भरघोस सूट किंवा आकर्षक बक्षिसे मिळवून देण्याची लालूच दाखवितात आणि पेड रजिस्ट्रेशन किंवा तत्त्सम आर्थिक कृती करण्यास भाग पाडतात.
४) सायबर गुन्हेगार फोन कॉल द्वारे तुम्ही तत्काळ पेमेंट केले नाही तर एखादी सेवा (बँकींग / वीज पुरवठा / इंटरनेट इ.) खंडित करण्याविषयी धमकवितात.
विशिंगचे परिणाम : विशिंगचे परिणाम गंभीर असू शकतात:
१. आर्थिक नुकसान संभविते: पीडित व्यक्तीला त्यांच्या बँक खात्यातील बचत गमवावी लागू शकते.
२. विश्वासाला तडा: या प्रकारांमुळे सरकारी संस्था / बँक / दूरसंचार कंपन्या इ. च्या नावाने फसवणूक केली जात असल्याने अशा संस्थांवरील किंवा त्यांच्या डिजिटल सेवांवरील जनतेचा विश्वास कमी होण्यास सुरुवात होते आणि प्रायव्हेट एजेंट किंवा तत्सम संस्थांचे फावते. फिजिकल सेवांवरील ताण वाढीस लागतो.
३. मानसिक आरोग्याची क्षती: अशा प्रकरांना बळी पडल्यामुळे (विशेषतः ज्येष्ठ नागरिक) चिंता आणि अपराधीपणाची भावना वाढीस लागते. आत्मविश्वास कमी होतो. त्यामुळे क्रयशक्ती कमी होते.
फसवणूक झाल्यास काय करावे?
१. तुमच्या बँक खात्यांची सुरक्षा करणारी माहिती बदलाः जर तुम्हाला शंका असेल की तुमचे खाते किंवा अॅप हॅक केले गेले आहे, तर त्वरित तुमचे पासवर्ड बदला आणि तुमच्या बँकेत कळवा आणि आर्थिक व्यवहार होणे थांबवा.
२. तक्रार द्या: सायबर क्राइम्सची तक्रार पोलीस विभाग किंवा सायबर क्राइम पोर्टलवर नोंदवा. अधिकृत पोर्टलवर https://cybercrime.gov.in/तक्रार नोंदवून तुम्हाला त्वरित मदत मिळू शकते. या संदर्भात १९३० हा २४x ७ उपलब्ध असणारा हेल्पलाईन नंबर आहे.
३. तुमचे डिव्हाइस तपासा: तुमच्या स्मार्टफोन किंवा लॅपटॉपची सुरक्षा तपासा. अधिक नुकसान टाळण्यासाठी संशयित अँप आणि संबधीत फाईल्स अनइंस्टाल करा.
निष्कर्ष:
विशिंग हा भारतातील एक वाढता धोका आहे, परंतु जागरूकता असल्यास आणि सतर्कता बाळगल्यास हा धोका टाळता येऊ शकतो. कॉल्सवर दाखविलेल्या गेलेल्या धमकीस अथवा प्रलोभनांना बळी न पडता आपल्या आर्थिक माहितीची सुरक्षितता जपणे आपल्याच हातात आहे. तेव्हा अशी काळजी घेऊन विशिंगला विलिन्गली गुडबाय करूयात.

