सायबर गुन्हेगारी प्रकार – भाग ५
आजकाल शेअर बाजारातील गुंतवणूक आणि आर्थिक व्यवहार हे सर्व डिजिटल पद्धतीने पार पडण्याचा ट्रेंड दिसत आहेत. अनेक लोक स्मार्टफोन अॅप्स, ऑनलाइन ट्रेडिंग प्लॅटफॉर्म्स आणि सोशल मीडियावरून मिळणारे सल्ले या माध्यमातून आपले शेअर ट्रेडिंगचे व्यवहार पार पाडताना दिसत आहेत. वेळेची बचत करणारी माध्यमे सोयीची वाटू शकतील परंतु याच सोयीमागे अनेक धोकेही दडलेले आहेत. या सर्व डिजिटल माध्यमांचा वापर करून सायबर फसवणूक करण्याचे प्रमाणही खूप वाढले आहे. ऑनलाईन किंवा प्ले स्टोअर / अँप स्टोअर उपलब्ध असणारे अनेक बनावट अॅप्स, प्लॅटफॉर्म्स किंवा स्कॅमर्स व्यक्तींच्या माध्यमातून शेअर ट्रेडिंग स्कॅम्स घडत आहेत आणि लाखो लोकांना आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे. याविषयी अधिक माहिती करून घेऊयात.


शेअर ट्रेडिंग स्कॅम्समागील धोका कसा निर्माण होतो?
स्मार्टफोन्सद्वारे काम करणारी विविध शेअर ट्रेडिंग अॅप्स किंवा वेब प्लॅटफॉर्म्स बाजारात उपलब्ध आहेत. अनेक लोक याच अॅप्सद्वारे आपली शेअर गुंतवणूक करत आहेत. सायबर गुन्हेगार याचाच फायदा घेऊन बनावट अॅप्स तयार करतात आणि गुंतवणूकदारांना नफ्याच्या आमिषाने आपल्या माध्यमातून गुंतवणूक करण्याचे लालूच देतात. अशा बहुतांश अँप्समध्ये, गुंतवणूकदारांनी पुरविलेल्या माहितीच्या सुरक्षिततेसाठी कोणताही उपाय केला नसतो. ज्यामुळे त्यांची आर्थिक संवेदनशील माहिती (बँक डिटेल्स, पासवर्ड, OTP, पॅन कार्ड, इ. ) हॅकर्सकडे पोहोवली जाते. याच माहितीचा गैरवापर करून गुंतवणूकदारांच्या बँक खात्यातून पॆसे लांबवले जातात.
सायबर गन्हेगार कसे काम करतात?
१. सर्वप्रथम बनावट अँप/ वेब पोर्टल बनविले जाते (जे SEBI किंवा RBI द्वारे पुरस्कृत नसते) ज्यातून गुंतवणूकदारांची आर्थिक माहिती चोरता येऊ शकते.
२. नंतर या अँपचा वापर करण्यासाठी बाजारात जोरदार जाहिरात केली जाते. त्यासाठी काही वेळा सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्सची मदत घेतली जाते. काही इन्फ्लुएन्सर्स शेअर बाजाराविषयी टिप्स देतात आणि त्याद्वारे गुंवणूकदारांना झटपट श्रीमंत होण्याचे लालच दाखवत बनावट अँप/ वेब पोर्टल कडे वळवितात.
३. जाहिरातींमध्ये गुंतवणूकदारांना अनेक प्रलोभने दाखविली जातात. उदा. “ऑनलाइन ट्रेडिंग करा, वेळ वाचवा आणि नफा कमवा” / “नफा मिळवण्याच्या टिप्स” / “खुशखबर, आता करा दामदुप्पट तेही बसल्याबसल्या” अशा अनेक भुलविणाऱ्या आकर्षक ऑफर्स देऊन गुंतवणूकदारांचे लक्ष वेधून घेतले जाते.
४. अशा माध्यमांवर गुंतवणूकदार नोंदणी करतात आणि आपली आर्थिक संवेदनशील माहिती (बँक डिटेल्स, पासवर्ड, OTP, पॅन कार्ड, इ. ) सायबर गन्हेगारांकडे स्वःच सोपवितात आणि लुबाडले जातात.

अशा सायबर गन्हेगारीपासून कसे सुरक्षित राहावे?
१. केवळ अधिकृत अॅप्स/ वेब पोर्टल वापरा: शेअर ट्रेडिंगसाठी फक्त अधिकृत अशाच अॅप्स आणि वेबसाइट्सच वापरा जे SEBI किंवा RBI द्वारे पुरस्कृत असतात. इतर अनधिकृत किंवा अज्ञात अॅप्सपासून दूर राहाणेच उत्तम ! कोणतेही अॅप डाउनलोड करण्यापूर्वी, त्याचे रेटिंग आणि रिव्ह्यू तपासून पाहणे गरजेचे असते.
२. सुरक्षित पासवर्ड वापरा: तुमच्या शेअर ट्रेडिंग आणि बँकिंग अॅप्ससाठी मजबूत पासवर्ड वापरा. कमी सुरक्षित पासवर्ड (उदाहरणार्थ, जन्मतारीख किंवा वर्ष) वापरू नका. बँकिंग पासवर्ड/ OTP कोणाही बरोबर शेअर करू नका. ते वेळोवेळी बदलत रहा.
३. 2FA वापरा: अनेक अॅप्समध्ये टू-फॅक्टर ऑथेंटिकेशन (2FA) सुविधा असते ज्यामुळे आर्थिक व्यवहार करताना, ते करणाऱ्याची संमती घेतली जाते. तेव्हा ही सुविधा एनेबल करा.
४. प्रलोभने टाळा: सावध रहा ! आकर्षक ऑफर्सपासून दूर रहा. त्यातील तथ्यता/ विश्वसनीयता तपासा. हे फसवणुक होण्याचे संकेत असू शकतात.
५. आपल्या डिव्हाइसचे सेक्युरिटी सेटिंग्ज तपासा: आपल्या स्मार्टफोन आणि लॅपटॉपचे सेक्युरिटी सेटिंग्ज तपासा आणि ते अपडेट करा. अँटीव्हायरस सॉफ़्टवेअर आणि अँटी-मॅलवेयर सॉफ़्टवेअरचा वापर करून संशयित लिंक / साईटचे अलर्ट मिळविता येतात.
६. डिजिटल सुरक्षा बाळगा: अनोळखी स्रोत असणाऱ्या लिंकवर क्लिक करणे, प्रलोभने दाखविणाऱ्या इमेल्स किंवा SMS संदेशांना उत्तर देणे टाळा. जर तुम्हाला लिंक अथवा SMS/emails च्या स्रोताबाबत शंका वाटत असेल तर, संबंधित कंपनीच्या/बँकेच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन किंवा कस्टमर केअर नम्बरवर संपर्क साधून माहितीची पडताळणी करा. शेअर ट्रेडिंग करतांना सुरक्षित नेटवर्कचा वापर करा.
७. आर्थिक सल्लागाराची मदत घ्या: आर्थिक गुंतवणूक करण्यासाठी कोणत्याही डिजिटल अँप/ पोर्टल / अल्गोरिदम पेक्षा, तुमच्या गरजा आणि अडचणी ओळखून त्यावर संवेदनशील मित्राप्रमाणे विश्वसनीय सल्ला आणि सेवा देणाऱ्या आर्थिक सल्लागाराची मदत घ्या.असा सल्लागार तुच्या बदलत्या गरजांप्रमाणे / कौटुंबिक किंवा वित्तीय परिस्तितीशी सुसंगत सल्ला तुम्हाला देत असतो. कुठल्याही डिजिटल सेवेपेक्षा असा हितचिंतक सल्लागार असणे केव्हाही श्रेयस्कर.
फसवणूक झाल्यास काय करावे?
१. तुमच्या बँक खात्यांची सुरक्षा करणारी माहिती बदलाः जर तुम्हाला शंका असेल की तुमचे खाते किंवा अॅप हॅक केले गेले आहे, तर त्वरित तुमचे पासवर्ड बदला आणि तुमच्या बँकेत कळवा आणि आर्थिक व्यवहार होणे थांबवा.
२. तक्रार द्या: सायबर क्राइम्सची तक्रार पोलीस विभाग किंवा सायबर क्राइम पोर्टलवर नोंदवा. अधिकृत पोर्टलवर https://cybercrime.gov.in/तक्रार नोंदवून तुम्हाला त्वरित मदत मिळू शकते. या संदर्भात १९३० हा २४x ७ उपलब्ध असणारा हेल्पलाईन नंबर आहे.
३. तुमचे डिव्हाइस तपासा: तुमच्या स्मार्टफोन किंवा लॅपटॉपची सुरक्षा तपासा. अधिक नुकसान टाळण्यासाठी संशयित अँप आणि संबधीत फाईल्स अनइंस्टाल करा.
निष्कर्ष:
शेअर ट्रेडिंग आणि सायबर फसवणुकीच्या घटनांपासून सुरक्षित राहण्यासाठी तथ्यहीन प्रलोभनांना बळी न पडणे आणि जागरूक राहून आपल्या आर्थिक माहितीची सुरक्षितता जपणे आपल्याच हातात आहे. तेव्हा सतर्क राहुयात !

